'माझा ध्यास- माझा श्वास' हा प्रभाकर आरडे यांच्या संघटनात्मक लढा आणि विचार यांचे सचित्र दर्शन घडवणारा ग्रंथ प्रकाशित झाला आहे. हे चरित्रात्मक आत्मकथन 'अक्षर प्रकाशन' आजरा यांनी प्रकाशित केले आहे. २४० पृष्टसंख्येचा हा ग्रंथ विशिष्ट ध्येयाने, ध्यासाने माणूस किती कार्यरत राहतो, याचे अनुकरणीय उदाहरण आहे. कार्याचा ध्यास हाच जीवनाचा श्वास होत असलेचा प्रत्यय प्रभाकर आरडे यांचे आत्मकथन आणि विचार वाचताना आपणास नक्कीच येईल, असे वाटते.
खरंतर देशाचा विकास निर्देशांक हा त्या देशाच्या जीडीपी (Gross Domestic Product) वरून ठरवतात. परंतु भौतिक विकासाच्या या निर्देशांकाबरोबर आणखी एक कसोटी देशाच्या विकास मूल्यांकनासाठी असावी असे वाटते. ज्या देशात विद्वान, ज्ञानी लोकांची संख्या अधिक असेल तो देश खऱ्या अर्थाने विकसित म्हणावा लागेल. महाराष्ट्रातील विद्वान, ज्ञानी आणि कर्तृत्वशील व्यक्तींपैकी प्रभाकर आरडे हे एक व्यक्तिमत्त्व होय.
कोणत्याही विशिष्ट वर्ग समूहाचे नेतृत्व करताना माणसे दोन प्रकारे नेतृत्व करताना दिसून येतात. पहिल्या प्रकारचे नेतृत्व हे समाजातील राजकीय व्यक्तींच्या आश्रयाने, आधाराने लाभलेले असते. तर दुसऱ्या प्रकारचे नेतृत्व हे स्वयंभू असून ते अभ्यासाने कष्टसाध्य केलेले असते. प्रभाकर आरडे हे शिक्षक आणि शिक्षण या क्षेत्रातील दुसऱ्या प्रकारचे नेतृत्व आहे, असेच आपणास दिसून येते. विशेषतः त्यांच्या आयुष्यात तीन भूमिका प्रकर्षाने दिसून येतात. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे ते राज्याध्यक्ष होते. या दोन्ही भूमिका कृतिशील कार्याच्या होत्या. हे कृतिशील कार्य ज्या भक्कम पायावर उभे होते ती विचारशीलता त्यांनी ' आरडंट व्ह्यू ' या साप्ताहिकाच्या संस्थापक आणि संपादक भूमिकेतून मांडली आहे. गेली ३१ वर्षे ते सातत्याने या माध्यमातून निर्भीडपणे लिहिताहेत. तथापि स्वतःचे आत्मकथन लिहावे असा विचार त्यांच्या विनम्र वृत्तीला कधी शिवला नाही. प्रकाशक सुभाष विभुते यांच्या आग्रहावरून त्यांनी 'माझा ध्यास- माझा श्वास' या ग्रंथाचे लेखन केल्याचे ते नमूद करतात.
तीन भागात या ग्रंथाची मांडणी केली आहे. वेळोवेळची प्रासंगिक छायाचित्रे ग्रंथात योग्य जागी मांडली आहेत. जुन्या स्मृतींना उजाळा देणारी ही छायाचित्रे भूतकाळ अक्षरशः जिवंत करतात. मुखपृष्ठावरील प्रभाकर आरडेंची ध्येयासक्त छबी मन वेधून घेते. पहिल्या भागात प्रभाकर आरडे यांचे आत्मकथन आहे. अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी आपला जन्म, प्रतिकूल परिस्थिती याचे वर्णन केले आहे. सुरुवातीचा काही भाग वगळता प्रभाकर आरडे यांनी आपल्या कौटुंबिक सुखदुःखाबद्दल फारसा उल्लेख केलेला दिसून येत नाही. त्यांनी आपले जीवन जणू काही सार्वजनिकच बनवून टाकले आहे ! आत्मकथनातील त्यांचा प्रवास हा आश्चर्यचकित करणारा आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतच संघर्षाची बिजे रुजली जातात, हे वास्तव सत्य आहे. भारत स्वतंत्र झालेल्या वर्षात प्रभाकर आरडेंचा जन्म गवंडीकाम करणाऱ्या अत्यंत सामान्य कुटुंबात झाला. परिस्थिती अत्यंत प्रतिकूल; त्यामुळे अकाली प्रौढत्व येणे सहाजिकच होते. शिकत शिकत छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्या. हॉटेलमध्ये साधी साधी कामेही केली. शिक्षक म्हणून नोकरी लागली. मुलतः अन्यायाविरुद्ध चीड असणारा स्वभाव असल्याने शिक्षण, शिक्षक आणि बालक यांच्याबद्दलची अनास्था आणि अन्याय याविरुद्ध छोट्या-मोठ्या आंदोलनात सहभागी होण्यास सुरुवात केली. वर्तमानात जे शिक्षक सातवा वेतन आयोग घेऊन अगदी सुख समृद्धीचे आयुष्य जगत आहेत, त्यांना जी सुरक्षितता आणि स्वास्थ्य मिळत आहे; त्यामागे ज्या लोकांचा मोठा वाटा आहे त्यात प्रभाकर आरडे हे अग्रणी आहेत. हे त्यांच्या आत्मकथनातील सांगण्यावरून लक्षात येते. ही खरी गोष्ट आहे की शिक्षक सेवाशर्ती, सेवा शाश्वती, वेतनमान, हक्काच्या रजा, बँकेत खात्यावर थेट वेतन, निवृत्ती वेतन अशा सुविधांसाठी प्रभाकर आरडे आणि त्यांच्या सर्व साथीदारांनी खूप कष्ट सोसले आहेत. ' निर्धन हो या धनवान, सबको शिक्षा एक समान ' अर्थात Common Schooling (समान शिक्षण) हे आरडे यांनी आपले इतिकर्तव्य मानले. त्यासाठी शासन दरबारी सातत्याने भूमिका मांडली. शिक्षक समिती या संघटनेचे
' अन्यायाची चीड, न्यायाची चाड ' हे ब्रीद ते अक्षरशः आपल्या आचरणातून जगताना दिसतात. ' आरंडट व्ह्यू ' या साप्ताहिकात त्यांनी स्वतःचे आग्रही मत अर्थात आरडेंचा दृष्टीकोन स्पष्टपणे वारंवार मांडला आहे. अभ्यासू वृत्ती असलेने त्यांना स्वतःचे कार्यकर्ते सन्मान देतातच. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने तर त्यांना राज्याध्यक्ष पद बहाल केले. शिक्षक सोसायटीत ते तीन वेळा सभापती झाले. राज्यभर त्यांनी विविध दौरे केले. फोरम फॉर राईट टू एज्यूकेशनची लढाई ते सातत्याने लढले. शिक्षणातील कंत्राटीकरण व कंपनीकरण या विरोधात त्यांनी आवाज उठवला. विश्वासराव चव्हाण, प्रा. संभाजीराव जाधव, ल.रा.हजारे, वसंतराव वैद्य, रामभाऊ परुळेकर, देवाजी गांगुर्डे अशा साथीदारांनी त्यांना मोलाची मदत केली. तथापि विरोधी संघटनांचे कार्यकर्तेही त्यांना आदराची वागणूक देत. भा.वा.शिंपी गुरुजी यांच्या मृत्यूनंतर त्यांनी गुरुजींचे वीस हजार फोटो कार्यकर्त्यांना वाटले. त्यांच्या पत्नी कलावतीना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली. हे आरडेंच्या स्वभावाचे वेगळेपण आहे. मागास विद्यार्थ्यांना निळ्या रंगाचा गणवेश शासनाने जाहीर केला तेव्हा विद्यार्थ्यात विषमतेची भावना रुजू नये म्हणून आंदोलन केले आणि शासनाला हा निर्णय रद्द करण्यास भाग पाडले. अशा कितीतरी प्रसंगातून आणि समस्यांतून प्रभाकर आरडे आपला संघर्ष जारी ठेवतात. आज वयाच्या त्र्याहत्तरीतही ते शिक्षण आणि शिक्षक हक्कासाठी आग्रही भूमिका मांडतात. शिक्षण कार्याचा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नाही.
मुलाखतीतून त्यांनी आपले अंतरंग उलगडले आहे. शिक्षण, बालक आणि शिक्षक यांच्याबद्दलची अनास्था त्यांना सतत सलत असलेचे ते मुलाखतीत स्पष्ट करतात. तसेच सुमारे ४५ अग्रलेखांचा संग्रह या ग्रंथात समाविष्ट केल्याने आरडेंचा शिक्षण आणि समाजविषयक दृष्टीकोन समग्रपणे दृष्टिपथात येतो.
'माझा ध्यास- माझा श्वास' या ग्रंथाची निर्मितीही कल्पकतेने केली आहे. कलाशिक्षक मिलिंद यादव यांनी मुखपृष्ठावर मांडलेली प्रभाकर आरडे यांची छबी ध्येयासक्त माणसाचे दर्शन घडवते. बाजूला असलेली घंटी वाचकांना प्रभाकर आरडे हे खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रातील 'जागले' आहेत, असाच निर्देश करताना दिसते. शब्द आणि चित्रांचा सुयोग्य संगम प्रस्तुत ग्रंथात साधला गेला आहे. परिशिष्टात प्रभाकर आरडे यांचा जीवन परिचय देऊन काल सुसंगतता साधली आहे. नव्या पिढीच्या शिक्षकांनी प्रभाकर आरडे यांचा ध्येयपूर्तीसाठीचा संघर्ष समजून घ्यायलाच हवा. तो सर्वांसाठी अनुकरणीय आणि पथदर्शी आहे. प्रस्तुत ग्रंथ नव्या शिक्षकांना नवी दृष्टी देणारा ठरेल अशी आशा वाटते.
✍ *विश्वास सुतार,* कोल्हापूर
(९४२०३५३४५२)
पुस्तक- माझा ध्यास.. माझा श्वास..
लेखक- प्रभाकर आरडे
प्रकाशक- अक्षर प्रकाशन संस्था, आजरा
पृष्ठे- २४० मूल्य- रु.१२५/-
संपर्क - ७०५७९२८०९२

0 Comments