*कांताबाई सातारकर यांचा अल्पपरिचय.*
जन्म. १५ ऑक्टोबर १९३९ गुजरातमधील बडोदा जिल्ह्यातल्या टिंबा या छोट्याशा गावी
कांताबाई सातारकर या प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री होत. दगडखाणीत काम करणाऱ्या साहेबराव व चंद्राबाई या दांपत्याच्यापोटी कांताबाईंचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबात तमाशा नव्हता. तसेच तमाशाशी कुणाचा संबंधही नव्हता. त्यांचे वडील गुजरातमधून मूळगावी साताऱ्याला आले. तेव्हा कांताबाई बालपणी मैत्रीणींसोबत नृत्य करायच्या. साताऱ्यातील विविध मेळ्यातील नृत्याची त्या नक्कल करायच्या. त्यातूनच त्यांचा नृत्य आणि तमाशाकडे कल वाढला. पुढे साताऱ्यातील सर्जेराव अहिरवाडीकर यांच्या तमाशात त्यांनी काम सुरू केलं. बघता बघता कांताबाई सातारकर हे नाव गाजू लागलं.
कांताबाईंनी पुण्या-मुंबईतही तमाशाचे खेळ केले. वयाच्या अकराव्या वर्षी अहिरवाडीकर यांच्या तमाशाच्या माध्यमातून तमाशा रंगभूमीवर पदार्पण, यानंतर वगसम्राट बाबुराव पुणेकर यांच्या तमाशात काम करीत या क्षेत्रातील त्यांनी असंख्य बारकावे अभ्यासले. पण आयुष्यात जे काही करायचे ते भव्यदिव्य करायचे हे स्वप्न घेऊन १९५३ च्या सुमारास एकटीने मुंबई गाठली. पण फक्त एक दिवस दादू इंदुरीकर यांच्या तमाशात काम करून नंतर दुसऱ्याच दिवशी तुकाराम खेडकर यांच्या तमाशात काम करायला सुरुवात केली. इथूनच त्यांच्या कलाजीवनाला कलाटणी मिळाली. कांताबाई आणि खेडकर या जोडीने रायगडाची राणी अर्थात पन्हाळगडचा नजरकैदी, पाच तोफांची सलामी, महारथी कर्ण, हरिश्चंद्र तारामती, जय विजय, गवळ्याची रंभा आदी धार्मिक, सामाजिक वगनाट्यात काम केलं. तमाशात गाजलेली ही जोडी पुढे आयुष्यताही एक झाली. त्यांनी तुकाराम खेडकर यांच्याशी विवाह केला. पुढे त्यांना अनिता, अलका, रघुवीर व मंदाराणी अशी चार अपत्ये झाली. मुंबईतला गिरणी कामगार तर या जोडीचा अभिनय बघण्यासाठी पुन्हा पुन्हा हनुमान थियेटरला जायचा.
१९६४ मध्ये त्यांच्यावर मोठा आघात झाला. येवला तालुक्यातील एका गावात तमाशा सुरू असताना अचानक तुकाराम खेडकर यांची तब्येत बिघडली. त्यामुळे उपचारासाठी पुण्याला नेत असताना खेडकरांचे निधन झाले. पती गेल्यानंतर त्या एकट्या पडल्या. त्यांचं नशीब फिरलं. एवढेच नव्हे तर त्यांना पतीच्याच तमाशातून बाहेर पडावे लागले होते. दोन वर्षापूर्वी तब्बल ७० वर्षे तमाशा कला क्षेत्रात मोठं योगदान दिल्याबद्दल त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. संगमनेरमधील एका भव्य कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. या कार्यक्रमाला अनेक बडे नेते उपस्थित होते.
तमाशा क्षेत्रातील योगदानासाठी राज्य सरकारने २००५ मध्ये त्यांना पहिला ‘विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरवलं होतं. दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या आवारात तंबू टाकून सिने, नाट्यसृष्टीतील मान्यवरांसाठी तमाशा सादर करण्याचा पहिला बहुमानही त्यांना मिळाला होता. कांताबाईंच्या तमाशाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे संपूर्ण कुटुंब आजही एकत्र राहून तमाशा रंगभूमीची सेवा करीत आहे. त्यांचे चिरंजीव कलाभूषण रघुवीर खेडकर, मुली अनिता, अलका, मंदाराणी, नातू मोहित व अभिजित, नातसून अमृता, नात पूजा, जावई दीपकराव मेंगजी, गोतान्बर सौन्दाडेकर, राजेश खोल्लम असा संपूर्ण परिवार तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहे. संतोष खेडलेकर यांनी कांताबाई सातारकर यांचे 'वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर' या नावाने चरित्र लिहिले आहे.
कांताबाई सातारकर यांची गाजलेली वगनाट्य.
रायगडची राणी, गवळ्याची रंभा, गोविंदा गोपाळा,१८५७ चा दरोडा, तडा गेलेला घडा, अधुरे माझे स्वप्न राहिले, कलंकिता मी धन्य झाले, असे पुढारी आमचे वैरी, डोम्या नाग अर्थात सख्खा भाऊ पक्का वैरी, कोंढाण्यावर स्वारी, पाच तोफांची सलामी, महारथी कर्ण, हरिश्चंद्र तारामती, जय विजय.
कांताबाई सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
*#संजीव_वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

0 Comments