🟣🟠🔵🟤⚪🟣🟡🔴
पुंगाव (तालुका राधानगरी) येथे दिवाळी दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. मोलमजुरी करून स्वतःचा संसार स्वाभिमानाने सांभाळणारे संजय कांबळे आणि सुरेखा कांबळे हे दांपत्य एका भयाण अपघातात मृत पावले आणि त्यांच्या चारही मुली अनाथ झाल्या. हातावर पोट असणाऱ्या घरातील दोन्ही कर्तीसवरती माणसं काळाने ओढून नेली आणि चार मुलींच्या आयुष्याचा आधार अचानक नाहीसा झाला.
आई-वडिलांच्या पंखाखाली सुरक्षित आयुष्य जगणाऱ्या त्या मुलींच्या डोक्यावरून एका क्षणात दोघांचंही छत्र हरवणं ही कल्पनाच मनाला सहन होत नाही. वर्तमानपत्रात आलेली ही बातमी वाचून सगळ्यांचाच जीव हळहळला. त्यांच्यावर कोसळलेला दुःखाचा डोंगर कोणीच आपल्या खांद्यावर घेऊ शकणार नाही. मात्र ते दुःख आपल्याकडून थोडं हलकं करता येईल का या उद्देशाने शिक्षक समिती राधानगरीने निधी संकलन करण्याचं ठरवलं आणि शिक्षक स्त्री असो की पुरुष त्याला आईचं काळीज असतं याचा दाखला तुम्ही सर्वांनी दिलात. अगदी चार-पाच दिवसातच त्या मुलींसाठी 60,000 रुपये इतकी रक्कम आपण सर्वांनी जमा केलीत.
आज तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मेंगाणे साहेब, विस्तार अधिकारी आयरे साहेब, राज्यनेते जोतीराम पाटील गुरुजी, जिल्हाध्यक्ष प्रमोदजी तौंदकर सर यांच्यासह शिक्षक समिती राधानगरीचे कार्यकारणी सदस्य आणि कार्यकर्ते ही मदत ठेव पावतीच्या स्वरूपात त्यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी पुंगावमध्ये उपस्थित होते.
आपण सर्वांनी त्यांना केलेली मदत त्यांच्या आयुष्याला उभारी देण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल. त्यासोबत शिक्षक समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक विजय पाटील सर यांनी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या मोठ्या मुलीला मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे.
भविष्यात असा दुर्दैवी प्रसंग कोणावरही येऊ नये आणि त्यासाठी मदत गोळा करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तशी वेळ आलीच तर आपण पुन्हा एकदा सगळे याच संवेदनशीलतेने एकत्र याल याची खात्री बाळगतो.
*आपले,*
*अध्यक्ष, सरचिटणीस*
*सर्व कार्यकारीणी*
*शिक्षक समिती राधानगरी*
(मदत स्वीकारणाऱ्या डोळ्यांतलं दुःख दिसू नये म्हणून हा फक्त मदतीच्या हातांचा फोटो पाठवतोय. आपल्या सर्वांचे देणारे हात नेहमी बळकट राहोत ही शुभकामना.)
0 Comments