ऑनलाइन प्रशासकीय कामांच्या ताणामुळे शिक्षक प्रशासकीय व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर
खुलताबाद (छत्रपती संभाजीनगर) : प्रतिनिधी
शिक्षकांवरील वाढत्या ऑनलाइन प्रशासकीय कामांचा भार कमी करून त्यांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा, या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शिक्षक व मुख्याध्यापकांनी प्रशासकीय व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शिक्षकांची नियुक्ती प्रामुख्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे,प्रभावी अध्यापन करणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे या मूलभूत उद्देशाने करण्यात आलेली आहे. मात्र सध्या अध्यापनाव्यतिरिक्त विविध प्रकारची माहिती संकलित करणे, वारंवार ऑनलाइन माहिती भरणे, विविध ॲप्स व लिंकद्वारे माहिती सादर करणे तसेच सततच्या ऑनलाइन सूचनांचे पालन करणे यामुळे शिक्षकांच्या मूळ अध्यापन कार्यावर परिणाम होत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
अनेक प्रशासकीय कामांसाठी शिक्षकांना स्वतःचा मोबाईल,इंटरनेट डेटा तसेच वैयक्तिक वेळ खर्च करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रशासकीय माहिती भरणे व ऑनलाइन अहवाल सादर करण्यासाठी शिक्षकांचा मोठा वेळ खर्च होत असून,त्याचा अप्रत्यक्ष परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर होत असल्याचेही समितीने निदर्शनास आणून दिले आहे.
या पार्श्वभूमीवर शिक्षकांवरील अनावश्यक प्रशासकीय व ऑनलाइन कामाचा भार कमी व्हावा आणि शिक्षकांना त्यांच्या मूलभूत अध्यापन कार्यासाठी पुरेसा वेळ मिळावा,या भूमिकेतून जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या समन्वयाने प्रशासकीय व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील शिक्षक व मुख्याध्यापक प्रशासकीय व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडले असल्याची माहिती शिक्षण विभागाला देण्यात आली आहे.
दरम्यान,हा निर्णय कोणत्याही अधिकारी, कर्मचारी अथवा प्रशासनाच्या विरोधात नसून शिक्षकांच्या मूळ अध्यापन कार्याचे संरक्षण, अनावश्यक ऑनलाइन प्रशासकीय कामाचा भार कमी करणे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य देणे या उद्देशाने घेण्यात आल्याचे समन्वय समितीने स्पष्ट केले आहे.
शिक्षकांना अध्यापनाचे काम प्रभावीपणे करता यावे यासाठी अनावश्यक ऑनलाइन माहिती संकलन,वारंवार येणाऱ्या लिंक, ॲप्स तसेच विविध प्रशासकीय संदेशांचा भार कमी करण्याबाबत योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती,जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या निवेदनावर
डी.पी जाधव,शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर,राजेश हिवाळे,राजेश भुसारी, दीपक पवार,सचिन वाघ, राजू बोराडे,अमोल एरंडे, प्रवीण वाघमोडे,राजेश पवार,नितीन नवले,मनोज खुटे,प्रशांत हिवर्डे,रंजीत राठोड, सतीश कोळी,गणेश शेळके, किशोर वेताळ,महेंद्र बारवाल,विश्वनाथ काळे, संजू देवरे,मोईन शेख, सचिन मुंजाळ,अनिल दाणे मोहम्मद अजहरोद्दीन सह विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, शिक्षकांच्या ऑनलाइन प्रशासकीय कामांच्या प्रश्नावर संघटनांनी एकत्रित भूमिका घेतल्याचे या निवेदनातून स्पष्ट झाल्याचे शिक्षक समितीचे प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी यांनी कळविले आहे.
0 Comments