*❒♦वीरांगणा झलकारी♦❒*
━═•●◆●★●◆●•═━
●जन्म :~ २२ नोव्हेंबर १८३०
(भोजला - झांसी)
●वीरमरण :~ ४ एप्रिल १८५८ झांसी
१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात अनेक स्त्रियांनी पराक्रम गाजविला होता. त्यात झलकारी या तरुणीचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. ती राणी लक्ष्मीबाईची दासी नव्हे तर सहकारी होती. राणी लक्ष्मीबाईने तयार केलेल्या महिला सेनेची ती प्रमुख होती. आपल्या राणीला वाचविण्यासाठी तिने आपल्या प्राणांचे बलिदान करून झाशीला वेढा देणाऱ्या सर ह्यू रोज ला सुद्धा चकित केले होते.
मूलचंद ने आपल्या लेकीला तिरंदाजी, घोडेस्वारी, शस्त्र संचालन चांगल्या रीतीने शिकविले. ती शरीराने दणकट व धाडसी होती. आकर्षक डोळे, सुंदर चेहरा, भव्य कपाळ यामुळे तिचे सौंदर्य खुलून दिसायचे. त्यांनी आपल्या लाडक्या मुलीचे पालन-पोषण मुलासारखेच केले. जंगलात स्वैरपणे हिंडणे, फुले, फळे, सरपण आणणे तिला आवडायचे. शिकार करण्यासाठी ती पटाईत होती.
एके दिवशी झलकारी गाईगुरांना जंगलात चरायला घेऊन गेली होती. अचानक जंगलातून एका चीत्त्याने तिच्यावर झडप घातली. तिने बाजूला होऊन आपल्याला लाठीने चीत्त्याच्या नाकावर जोरात टोला हाणला. त्यासरशी तो चिता बेशुद्ध होऊन पडला. झलकारीने चित्त्याला आपल्या काठीने इतके बदडून काढले की त्या माराने तो मरण पावला. या घटनेने जो तो तिचे कौतुक करू लागला.
एके रात्री गावच्या मुखियाच्या घरावर चोरांनी दरोडा घातला. लोक आरडाओरडा करू लागले. ते ऐकून झलकारी आपली लाठी घेऊन धावून गेली. चोरांच्या पाठीवर जोरजोराने लाठीने रट्टे लगावले. तेव्हा लोकही धावून आले. चोर जीव घेऊन पळून गेले. मुखीयाने तेव्हापासून झलकारीला आपली मुलगीच मानले. तिच्या बहादुरीची चर्चा सर्वत्र होऊ लागली.
राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील तरुण गोलंदाज पूरणचंद याने झलकारीशी लग्न करायचे असे तिच्या वडिलांना सांगितले. तो सुद्धा उमदा व सुंदर तरुण होता. झलकारीच्या आई-वडिलांना तो पसंत पडला. त्याच्याशी लग्न झाले. गावच्या मुखीयाने तिच्या लग्नात गाव भोजन दिले. पुरणचंद झलकारीला घेऊन राणी लक्ष्मीबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी राणीच्या महालात गेले. दोघांना आशीर्वाद व भेटही दिली. राणीला झलकारी पसंत पडली. झलकारी ला राणीने आपल्या महालात नोकरी दिली. राणीच्या इतर दासींनी राणीला झलकारीच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या. राणीने झलकारीला स्त्रियांची सेना उभारण्यास व त्यांना शस्त्र संचालनाचे प्रशिक्षण देण्यास सांगितले. झलकारीच्या प्रयत्नाने राणीचे स्त्री सैन्य उभे राहिले. तेच राणीचे *'दुर्गा दल'* होय.
राणीचे पती गंगाधरराव यांनी त्यांच्या निधनापूर्वी दामोदर नावाचा मुलगा दत्तक घेतला होता. तो इंग्रज सरकारने नामंजूर केला व झांशीचे राज्य खालसा करण्यासाठी इंग्रज अधिकारी पाठविला. तेव्हा त्याला राणीने स्पष्ट शब्दात सांगितले "मै मेरी झांसी नही दुंगी." तो अधिकारी परत गेल्यावर इंग्रजांनी आक्रमण करून झाशीचा किल्ला ताब्यात घ्यायचे ठरविले. सर ह्यू रोज हा मोठा सैनिक घेऊन आला व त्याने झाशीच्या किल्ल्याला १९ मार्च १९५८ रोजी वेढा दिला. त्या आधी राणीने युद्धाची तयारी करूनच ठेवली होती. वेढा पडल्याचे पाहून राणीने किल्ल्याच्या व शहराच्या तटावर जातीने फिरून युद्धाचा बंदोबस्त केला.
२३ मार्च १८५८ रोजी इंग्रजांनी किल्ल्यावर तोफांचा मारा सुरु केला. किल्ल्याच्या तटावरून राणीचे गोलंदाज आपल्यात तोफांतून इंग्रज सैन्यावर आग ओतू लागले. दुलाजी ठाकूर हा गोलंदाज इंग्रजांना फितूर झाला. तो इंग्रज सैन्यावर गोळाबारी न करता मोकळ्या जागांवर तो तोफगोळे सोडू लागला. शहराच्या तटांच्या गुप्त वाटाही त्याने इंग्रजांना दाखवील्या. इंग्रजांच्या तोफगोळ्यांनी शहरात ठिकाणी आगी लागल्या. दुलाजी ठाकूरची फितुरी व करतूत झलकारीने राणीच्या कानावर घातली. अटितटीचा प्रसंग पाहून राणीने आपल्या सैन्यातील प्रमुख योध्द्यांची बैठक घेतली. पुढे काय करावे ? हा गंभीर प्रश्न होता. त्या बैठकीत झलकारी आली. तिने फितुरी झाल्यामुळे इंग्रज सैन्य शहरात शिरले आहे. ते किल्ल्यात शिरले तर समोरासमोर लढावे लागेल. त्यात आपला निभाव लागणार नाही असे सांगितले.
राणीने झलकारी ला विचारले, "आता यावर उपाय काय? तेच तर ठरवायचे आहे." त्यावर झलकारी म्हणाली, "बाईसाहेब, अशा परिस्थितीत तुम्ही किल्ल्याबाहेर निघून गेले पाहिजे. शत्रुला चकविण्यासाठी मी तुमचा वेष अंगावर घालून काही शिपायांसह किल्ल्याच्या बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करीन. शत्रू मला राणी समजून माझ्या पाठीमागे धावेल. तुम्ही दुसऱ्या बाजूने गुप्तपणे सैन्याच्या तुकडीसह किल्ल्यातून निघून जावे आणि सुरक्षित ठिकाणी जाऊन पुन्हा नव्याने सैन्य संघटीत करावे.
सर्वांना योजना पसंत पडली व तिच्या बुद्धीचे कौतुकही वाटले. झलकारीने राणीचा वेष धारण केला व घोड्यावर स्वार होऊन काही सैनिकांनीशी ती किल्ल्याबाहेर पडली. त्यानंतर राणी लक्ष्मीबाई निवडक योद्ध्यांसह किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूने साधारण वेशात काल्पीच्या मार्गाने निघून गेली. झलकारीला इंग्रज सैन्याने राणी समजून घेरले. दुलाजी ठाकराच्या एका माणसाने तिला लगेच ओळखले. तिने त्याच्या अंगावर आपल्या बंदुकीतून गोळी झाडली. घोडा हल्ल्याने नेम चुकला व त्या गोळीने एका इंग्रज सैनिकांचे प्राण घेतले. सर ह्यू रोजला त्या फितुराने सांगितले की, ही राणी नसून तिची दासी झलकारी आहे. तेव्हा रोज ने तिला दम देत म्हटले, " तू राणीचा वेष घेऊन आम्हाला धोका दिला आहेस. आमच्या एका सैनिकाला तू मारले आहेस. मी तुला जिवंत सोडणार नाही." नंतर झलकारी ने बेधडकपणे रोज ला सांगितले," मार मला गोळी, मी तयार आहे." तेव्हा एक इंग्रज अधिकारी म्हणाला, "पागलच दिसत आहे." त्यावर ह्यू रोज गंभीरपणे उत्तरला, "भारतात जर अशा एक टक्का स्त्रीया असल्या तर सर्व इंग्रजांना या देशातून पळून जावे लागेल." ह्यू रोजने झलकारी ला एका तंबूत सक्त पहा-यात ठेवले. पण ती वाघीण पिंजऱ्यात कशी राहणार? रात्री सारे पहारेकरी झोपले. तेव्हा हळूच ती तंबू बाहेर पडून किल्ल्यात चपळाईने निघून गेली.
सकाळी लवकर उठून जनरल आपल्या दुर्बिणीतून किल्ल्याच्या तटावरील तोफांच्या मोर्चा कडे पाहिले. तेव्हा तो अतिशय आश्चर्यचकित झाला. एका बुरुजावर झलकारी तिच्या नवऱ्याबरोबर तोफा व्यवस्थित लावत होती. त्याने लगेच त्या तंबूत जाऊन पाहिले. तो सारे शिपाई झोपलेले असून झलकारीचा तंबूत मागमूसही नव्हता.
लगेच युद्ध सुरू झाले. काही वेळाने एक गोळी सूं सूं करीत आली व पूरणचंदच्या छातीतून आरपार निघून गेली. पूरणचंद खाली कोसळला. तेव्हा झलकारीने तोफेतून गोळा सोडला. त्याने अनेक इंग्रज सैनिक ठार झाले. इंग्रज सेनेतून एक गोळा आला आणि त्या गोळ्याने झलकारीच्या शरीराचे तुकडे-तुकडे होऊन वर उडाले. रक्ताचा सडा पडला. आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी धैर्याने, प्राणपणाने लढणारी एक मागासवर्गीय तरुणी इतिहासात आमर झाली. या वीरांगनेला अंतःपूर्वक प्रणाम !
*धन्य ती वीरांगना झलकारी..!!*
झलकारी बाईची महानता पाहून त्यांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या नावावर भारत सरकारने २२ जुलै २००१ रोजी डाक तिकिट जारी केले.
0 Comments