मराठ्यांच्या सत्तेला,
वैभवाला साजेशी त्यांची गादी असली पाहिजे या हेतूने थोरले बाजीराव पेशवे यांनी पुण्यामध्ये मुठा नदीच्या काठावर एक भव्य आणि सुरक्षित वास्तू बांधायचे ठरवले व 10 जानेवारी 1730 रोजी त्यांनी या वास्तूचा भूमिपूजन समारंभ केला.
ही जागा त्यावेळी पुणे कसब्यात मोडत होती व या जागेभोवती मातीची भिंत बांधलेली होती त्यावेळी या जागेत फक्त काही कोळी व कोष्टी वास्तव्य करून असत.
बाजीराव पेशव्यांनी या लोकांना, मंगळवार पेठेत पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्या व 5 एकर क्षेत्रफळाची ही जागा आपल्या ताब्यात घेतली.
बाजीराव पेशव्यांच्या स्वभावानुसार त्यांनी ही वास्तू बांधून घेण्याचे काम अतिशय जलद गतीने पूर्ण करून घेतले व फक्त 2 वर्षात मराठी सत्तेला व वैभवाला साजेसा होईल असा आतल्या बाजूस 3 चौक असलेला एक दुमजली आलिशान प्रासाद तयार झाला.
याच वर्षात म्हणजे शनिवार 22 जानेवारी सन 1732 रोजी बाजीरावांनी या वास्तूचा वास्तुपूजन समारंभ साजरा केला.
हा प्रासाद बांधण्यासाठी 16110 रुपये खर्च आला व वास्तुपूजेनिमित्त 15 रुपये आठ आणे ब्राम्हणांना दक्षिणा देण्यात खर्च करण्यात आले.
बाजीरावांच्या जीवनशैली प्रमाणे हा प्रासाद साधा पण उठावदार होता. फक्त दिवाणखाना मात्र शोभिवंत वस्तूंनी सजवलेला होता.
बाजीराव पेशव्यांचे चिरंजीव बाळाजी बाजीराव यांनी 1750च्या आसपास या प्रासादात बरेच बदल केले व अनेक नवीन इमारती बांधल्या हे करताना त्यांनी किती पैसा खर्च होईल किंवा वेळ लागेल याचा विचार केला नाही.
या बदलांनंतर शनिवारवाडा एका भव्य आणि सौंदर्यपूर्ण दिमाखाने ओळखू जाऊ लागला.
आपली सत्ता व वैभव यांचे हा वाडा एक साक्ष आहे या कल्पनेने या पेशव्यांनी वाड्यातील बदलांच्यात जातीने लक्ष घातल्याने, शनिवारवाडा अत्यंत प्रेक्षणीय व देखणी अशी एक वास्तू बनला.
नंतर 1780 च्या सुमारास सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात नाना फडणवीस यांनी नवीन खोल्या, दिवाणखाने, गॅलर्या व टॉवर आणि कारंजी बांधली व शनिवारवाडा, महाराष्ट्र आणि हिंदुस्थानावर सत्ता गाजवणार्या पेशव्यांच्या रुबाबाला व इतमामाला साजेसा होईल,
याचे जातीने प्रयत्न केले.
दिवाणखाने किंवा दरबार महाल हे अतिशय सुंदर फर्निचर व पडदे यांनी सजवलेले असत.
जिन्नसखाना या महालात, परदेशी व मुगल पद्धतीची तैलचित्रे, निरनिराळ्या परदेशी व देशातल्या लोकांकडून मिळालेल्या भेटवस्तू कलात्मक रित्या मांडून ठेवलेल्या असत, या शिवाय निरनिराळी घड्याळे,
खेळणी, दुर्मिळ हत्यारे वगैरे वस्तूही नीट जपून ठेवलेल्या असत.
खेळणी, दुर्मिळ हत्यारे वगैरे वस्तूही नीट जपून ठेवलेल्या असत.
हे सगळेच महाल इतके सुंदर सजवलेले असत की ते पहाणारा दर्शक विस्मित होत असे.
मराठी दफ्तरात दुर्दैवाने या प्रासादाबद्दल फारसे काही लिहिलेले नाही.
परंतु पेशव्यांना भेटायला आलेल्या काही युरोपियन पाहुण्यांनी पेशव्यांचा थाटमाट आणि वैभव कसे होते आणि आपण काय पाहिले याचे बारकाईने वर्णन करून ठेवलेले असल्याने आज आपणाला त्याची थोड्या प्रमाणात कल्पना येऊ शकते. पेशव्यांचा हा अत्यंत सुंदर व भव्य शनिवारवाडा, 1827 मध्ये लागलेल्या एका महाभयंकर आगीत
जळून पूर्णपणे नष्ट झाला. ही आग 7 दिवस भडकलेली होती.
एरवी सर्व बाबतीतील रेकॉर्ड अतिशय अचूकरित्या ठेवणाऱ्या इंग्रज राज्यकर्त्यांनी या बाबतीतील कोणतीही माहिती कधीच जाहीर केली नाही. ही आग कशामुळे लागली? ती विझविण्याचे काय प्रयत्न केले? या संबंधी कोणतेही रेकॉर्ड अस्तित्वात आहे असे वाटत नाही. शनिवारवाडा, पेशवे यांच्याबद्दल पुष्कळ लिखाण उपलब्ध आहे. परंतु या कोणत्याही पुस्तकात या आगीचे कोणतेही कारण कधीच देण्यात येत नाही. असे म्हणतात की शनिवार वाड्याला आग इंग्रजांनीच लावली. आधीची 150 वर्षे स्वराज्यात, स्वातंत्र्य अनुभवलेल्या, महाराष्ट्रातील व विशेषत: पुण्यातील जनतेला, इंग्रजी अंमल व पारतंत्र्य हे कधीच सहजपणे मान्य होण्यासारखे नव्हते. आपला अंमल चालू झाल्यावर दशक उलटले तरी मराठी माणूस इंग्रजी अंमलाच्या विरुद्धच आहे याची पुण्यातील इंग्रज शासनाला बहुदा जाणीव असावी. पेशव्यांच्या मराठी साम्राज्याची आठवण जोपर्यंत शनिवारवाडा दिमाखाने उभा आहे तोपर्यंत मराठी मनातून कधीही जाणार नाही हे त्यांनी ओळखले असावे आणि म्हणूनच अत्यंत गुप्तपणे त्यांनी
मराठ्यांच्या अस्मितेची ही खूण, नष्ट करण्याचा डाव आखला असावा.
पेशव्यांची ही अत्यंत सुंदर, दिमाखदार आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची असलेली वास्तू, जळून नष्ट होण्याचे दुसरे कोणतेही कारण तरी दिसत नाही.
जागर इतिहासाचा हिस्ट्री महाराष्ट्र

0 Comments