📒पहिला नकाशा कोणी बनवला?📒

📒 पहिला नकाशा कोणी बनवला?📒
********************************
नकाशा ही आपल्या इतक्या परिचयाची बाब झाली आहे, की नकाशाशिवाय आपण कुठंही पाऊल टाकण्याची कल्पनाच करू शकत नाही. आता तर संगणकावर जगाच्या कोणत्याही भागाचा नकाशा मिळण्याची सोय झाली आहे. आपल्याला माहिती असलेला पत्ता नुसता संगणकाला सांगायचा, की थोड्याच वेळात तो त्या विभागाचा नकाशा रस्त्यांच्या नावासकट आपल्यापुढे सादर करतो. जीपीएस प्रणालीमुळे तर धावत्या मोटरगाडीतही आता नकाशा उपलब्ध होतो आहे; आणि जसजशी ती मोटार मुक्कामाच्या दिशेनं आगेकूच करत राहील तसतसा तो नकाशा पुढे सरकत मुक्कामाच्या दिशेनं प्रस्थान करू लागतो. अतिपरिचयादवज्ञा असं झाल्यामुळेच, नकाशा तयार करायला किती कष्ट पडत असतील याची आपल्याला कल्पना येत नाही. म्हणूनच जगातला पहिला नकाशा इजिप्तमध्ये आजपासून चार हजार वर्षांपूर्वी बनवला गेला होता हे ऐकून आपल्याला आश्चर्यचकित व्हायला होतं. त्या काळात इजिप्तमधले शेतकरी आपल्या शेताच्या सीमारेखा व्यवस्थित आखून घेत आणि मग राजा त्या सीमारेखा त्या संपूर्ण प्रदेशातल्या नकाशावर कोरून टाकी. कोरणं भागच होतं कारण हे नकाशे मातीच्या तुकड्यावर रेखाटून भट्टीत तो तुकडा भाजला जाई. त्यातूनच मग तो दीर्घकाळ उपयोगी पडणारा नकाशा तयार होई. इजिप्तमधील उत्खननांमध्ये अशा कित्येक मातीच्या नकाशांचे अवशेष मिळालेले आहेत; पण ते कोणी तयार केले याविषयी त्यांच्यात काहीही माहिती मिळत नाही. त्यामुळे ते आद्य नकाशाकार अनामिकच राहिले आहेत. म्हणूनच पहिला नकाशा बनवण्याचं श्रेय ग्रीक तत्त्वेता एरेस्टोस्थेनसला दिलं जातं. इसवी सनापूर्वी २७६ मध्ये त्यानं पृथ्वीच्या परीघाचं जवळजवळ अचूक मोजमाप केलं होतं. त्याच्या पद्धतीमुळेच दक्षिणोत्तर अंतर अचूक मोजणं शक्य झालं होतं. खरं तर त्याच्याही चारशे वर्ष आधी अनाक्सिमॅन्डर या एका ग्रीकानंच जगाचा नकाशा बनवला होता; पण त्याच्या मते पृथ्वी दंडाकार असल्यामुळे आता त्या नकाशाचा फारसा विचार केला जात नाही. एरॅस्टोस्थेनसन मात्र पृथ्वी गोलाकार असल्याचं दाखवून दिलं होतं. त्यामुळे त्याच्या नकाशाला मान्यता दिली जाते. त्याच सुमारास हिप्पार्कसनं पृथ्वीचे समान भाग करण्यासाठी अक्षांश आणि रेखांश संकल्पना उद्घोषित केली. टॉलेमीनं तेच सूत्र पुढे चालवत अक्षांश- रेखांश या समांतर रेषा दाखवणारा पहिला नकाशा तयार केला. अर्थात, हा त्यावेळी ज्ञात असलेल्या जगाचा नकाशा होता. त्यामुळे त्यात उत्तर वा दक्षिण अमेरिका खंडांचा समावेश नव्हता. त्यानंतर साहजिकच परिस्थिती बदलली; आणि जगाचा नकाशा नव्यानं तयार केला गेला. नकाशांचं संकलन असलेला पहिला ग्रंथ बेल्जियममधील अॅन्टवर्प शहरातील अब्राहाम ऑरटेलियसनं १७५० तयार केला. पहिला आधुनिक नकाशाकार म्हणून त्याचीच गणना आता केली जाते. तरीही पहिला अधिकृत अॅटलास बनवण्याचं श्रेय त्याला दिल जात नाही. ते जातं गेरार्डस मोटर याच्याकडे. त्यानं पहिला तपशीलवार ग्रंथ तयार केला. त्याच्या पहिल्याच पानावर त्यानं ग्रीक पुराणातली कथेमधल्या अॅटलासनं तोलून धरलेल्या पृथ्वीचे चित्र दिलं होत. त्यांना नकाशाच्या संकलनांना 'अॅटलास' म्हणण्याचा प्रघात पडला.

डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातुन
📗📕📒📕📗📘📙📔📒📕📗
📱🎴 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🎴📱

Post a Comment

0 Comments