" सडे" ता. पोलादपूर जि.रायगड
✍️ आपल्या प्राथ.शिक्षक मित्राचे अनुभव अवश्य वाचा....
~~~~~~~ *srk* ~~~~~~~
🏠 सडे,ता.ता.पोलादपूर गावाचे नाव ऐकून दचकलात ना?? बरोबर मलाही या गावाचे नाव ऐकून हसायला आले होते.पहिल्यांदाच ऐकले होते.फेब्रुवारी १९९३ साली मला कोकण निवड मंडळाचा प्राथमिक शिक्षक म्हणून आदेश आला होता.त्याकाळी फक्त १० वी पास वर शासनाला शिक्षक भरती करायची होती.जेव्हा आदेश आला तेव्हा मी चाळीसगाव येथे महाविद्यालयात शिक्षण घेत होतो.प्राथमिक शिक्षक म्हणून आदेश आल्यामुळे मला खूप आनंद झाला.मी मुलाखतीसाठी ठाणे येथे गेलो,माझी तोंडी परिक्षा झाली.आणि मी घरी आलो.काम होईल की, नाही ही भिती होतीच.सुदैवाने साधारण आठ दिवसांत मला रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात सडे या गावातील जि.प. शाळेत हजर होण्या बाबतचा आदेश आला.मला व माझ्या परिवाराला याचा खूपच आनंद झाला.मित्र मंडळीही खुश झाली.मग मी नंतर शाळेच्या गावी निघण्याची तयारी केली.एका दिवसांत पोहोचणे शक्य नव्हते.मीही गाव सोडून एवढ्या लांब गेलो नव्हतो.पण निश्चय केला.पोलादपूर तालुका नेमका कुठे आहे, इकडून तिकडून चौकशी केली.कधीही गाव सोडून मी बाहेर गेलो नव्हतो.पण नोकरी लागल्याचा आनंद होता. *माझे गाव, शिरसगाव ता चाळीसगाव जि जळगाव.*
🚌 मी एके दिवशी मी एकटा माझ्या गावावरुन नाशिकला आलो.तिथे माझे आतेभाऊ महसूल खात्यात ( जिल्हाधिकारी कार्यालय) नोकरीला होते. *श्री रमेश शिरसाठ त्यांचे नाव.* ते आमचे दाजीच आहेत.श्री शिरसाठ दाजी हे माझे आदर्शच आहेत.वेळोवेळी त्यांनी मला अनमोल असे मार्गदर्शन व मदतही केली आहे त्यांना मी माझा आदेश दाखवला त्यांनाही खूप आनंद झाला,आईने घरुन मला एक चादर एका वायरच्या पिशवीत टाकून दिली होती.दोन गणवेश या व्यतिरिक्त काहीच नव्हते.श्री शिरसाठ दाजी यांच्या कडे नाशिकला मी एक मुक्काम केला.त्यांच्या सौ.नी एक जुना तवा माझ्या पिशवीत घालून दिला.आणि पोलादपूर येथे जात असतांना दाजींनी मला ५००/ रु.दिले.व त्यांचा आशिर्वाद घेऊन मी पोलादपूरला जाण्यास निघालो.निघण्याआधी पोलादपूर येथे जाण्यासाठी नाशिकहून बस आहे का,याची चौकशी मी आधी केलेली होतीच.सायंकाळी साडे चार वाजता " नाशिक रत्नागिरी" ही बस होती.नाशिकहून बसले की,पोलादपूरला जाता येईल.अशी माहिती मला मिळाली होती.साडे चारला बसचा प्रवास सुरू झाला.सर्व काही नविन.कारण मी पहिल्यांदाच एवढ्या लांब चाललो होतो.साधारण १२ तासांचा प्रवास करुन मी पोलादपूर येथे रात्री दोन वाजेच्या सुमारास उतरलो.सर्वत्र सामसूम, पोलादपूर बस स्टॅण्ड वर मी आणि इतर दोन प्रवासी होते.पुढे बस रत्नागिरीच्या दिशेने निघून गेली.तिथेच वेळ घालवला दोन तीन बस लागलेल्या होत्या.मी त्यांचे बोर्ड बघू लागलो.एका बसवर समोर सडे नावाची पाटी दिसली.खूप आनंद वाटला दिवस उगवला.तशी गर्दी वाढू लागली.हाॅटेल्स सुरु झाले.वहातूक सुरु झाली पेपरवाला एक बाबा पेपर पेपर म्हणून ओरडू लागला.मी त्याला विचारले ही बस किती वाजता निघेल? त्याने मला बसची निघण्याची वेळ सहाची सांगितली.आजू बाजूचे डोंगर बघून मी मनातून हादरुन गेलो.प्रचंड घाबरलो.तालुक्याचे ठिकाण असे आहे तर गाव कसे असेल?? पण एक आनंद होता.
⛳ *मुघलांच्या काळात ज्या शिवरायांनी महाराष्ट्रासाठी संघर्ष केला.कोकणावर शिवरायांनी जीवापाड प्रेम केले.अशा राजाच्या पवित्र भूमीत माझी नेमणूक झाली.*
मी स्वत:ला धन्य समजू लागलो.या विचारातच मी बसमध्ये बसलो.बस निघाली.डोंगर द-या,घाट असा मार्गक्रमण करीत बस पक्क्या रस्त्यावरुन एका कच्च्या रस्त्यावरून धावू लागली.सर्वत्र धुरळा,सर्व प्रवासी त्यांच्या गावी उतरुन गेले.मी एकटाच बसमध्ये होतो.सडे गावाला जात असतांनाच एक मोठा डोंगर लागला या डोंगरावरुन बस धावू लागली.बस डोंगरावरुन खाली घसरते की, काय?अशी भिती वाटू लागली.आजूबाजूला हिरवागार निसर्ग बघून मन हरखून गेले.थोड्याच वेळात बस गरकन फिरुन एका मंदिराजवळ थांबली.गाव आले म्हणून मला कन्डक्टरने सांगितले.बसमधून खाली उतरलो.साधारण ५०/६० कुटुंब असलेले गाव.बसमध्ये येत असतांनाच तिथे गुरुजी असतील का? कुठले असतील? कसे असतील? याचा विचार माझ्या डोक्यात होताच.बसमधून उतरल्यावर एक बाबा खाली उभे होते.त्या बाबांकडे बघून मी मनातून घाबरून गेलो.कारण त्यांनी कंबरेला लंगोटी गुंडाळलेली होती.व एक भला कोयता कंबरेला खोचलेला होता.ते दृश्य पाहून मनात धस्स झाले,"कोण पाव्हण" म्हणून त्यांनी माझी चौकशी केली.मी गुरुजी म्हणून इथे आलो आहे.असे मी भित भितच त्यांना सांगितले.इथे पवार गुरुजी आहेत की,असे ते बोलले.त्यांनी समोरच्या घरातून एका लहान मुलाला झोपेतून उठवले व नविन गुरुजींना पवार गुरुजींच्या घरी घेऊन जा असे सांगितले.डोळे चोळीत तो मुलगा पुढे चालू लागला,त्याच्या मागे मी चालू लागलो.जवळच घर होते.पवार गुरुजींच्या घरी मी गेलो गुरुजी झोपलेले होते.मुलाने आवाज दिला गुरुजी उठले,मुलगा निघून गेला.गुरुजींची खोली म्हणजे आजूबाजूला अर्धवट भिंती व समोर कुडाची भिंत.गुरुजींनी माझी चौकशी केली.तुम्ही कुठले म्हणून मीही त्यांना विचारले.मी धुळ्याचा असे त्यांनी सांगितले.मला फार बरे वाटले.कारण जोडीदार भागातले होते.आंघोळ, चहा,नाश्ता झाला.कोण आले म्हणून शेजारीच रहाणारे मुक्ता आई,व रामचंद्र बाबा माझ्या चौकशी साठी आले.आम्ही आहोत घाबरायचे नाही.असा त्यांनी मला धीर दिला.मला बरे वाटले.शेजारचे दगडू दादा,भिमा वहिनी.यांनी सर्वांनी मला आधार दिला.शाळेची वेळ झाली.आज नविन गुरुजी आले आहेत म्हणून सर्वच मुले लवकर आली.मुलांनाही आनंद झाला,गावकरीही खुश झाले.शाळा भरली पवार गुरुजींनी मला माझी ओळख मूलांना करुन दिली.
🛕शाळेच्या समोरच एक गाव देवीचे मंदीर आहे,तसेच शाळेच्या थोडं पुढे गेल्यावर गावकीची विहीर आहे.येणारे जाणारे सर्वजण माझ्याकडे बघत होते काही लोक चौकशी करत होते.जवळच *बोरघर ही आमची केंद्रशाळा होती.* सडे गावाला संपूर्ण डोंगराचा वेढा होता.गाव डोंगराच्या पायथ्याशी होते.समोरच शिवरायांचा " कागोरीगड" होता.अनेक पर्यटक या ठिकाणी यायचे. *शिवरायांचे जीवन, केलेला संघर्ष,गड किल्ले कोकणात गेलेल्या शिवाय आपल्याला समजणार नाही.शाळा अतिशय सुंदर होती.* ४० विद्यार्थी चौथी पर्यंत शाळा होती.माझे सहकारी पवार गुरुजी हे एक उत्तम स्वयंपाकी होते.मला मात्र यातले काहीच येत नव्हते.त्यांनी स्वयंपाक केला की,जेवण झाल्यावर मी अंधारात जाऊन भांडी घासून घ्यायचो.गुरुजी मग शेजारच्या आजी आजोबांकडे जाऊन बसायचे.मग नविन गुरुजी कसे आहेत?? याबाबत व इतर विषयांवर त्यांची चर्चा व्हायची.शेजारचे दगडू दादा,त्यांची पत्नी माझी चौकशी करायचे.शेजारची मुक्ता आई व बाबा आमच्या वर मुला प्रमाणे माया करायचे.पवार गुरुजी व मुक्ता आईची एकदा गुप्त चर्चा झाली,की नविन गुरुजींना या खोलीत एकटे राहू द्या व गावात तुम्ही दुसरी खोली घ्या.मला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती.एके दिवशी जेवण झाल्यावर त्यांनी मला दुसरीकडे खोली घ्यायची आहे असे सांगितले.मी तर हादरुनच गेलो.कारण मला स्वयंपाक बनवता येत नव्हता.शेवटी माझा नाइलाज झाला.मी गुरुजींना सांगितले की,ठिक आहे आपण दुसरी खोली घेऊ शकता. नविन गुरुजी स्वावलंबी हा त्यामागचा त्यांचा उद्देश होता,माझ्याकडे पुरेसे भांडे नव्हते.गुरुजींनी मला त्यांच्या उधारीवर एक पलंग व काही भांडी घेऊन दिली.नंतर पगार झाल्यावर मी ते पैसे देवून टाकले.हळूहळू जेवण बनवायला शिकलो.काही वेळा शेजारच्या आजी जेवण बनवून द्यायच्या.माझ्या घराच्या बाजूला दगडू दादा रहायचे तेही माझी चौकशी करायचे,त्यांना तीन मुले दोन मुंबईत कामाला तर एक रमेश नावाचा गावी शाळेत जायचा त्याला सर्व लाडाने " भाऊ" म्हणत.हा भाऊ माझ्या खोलीत नेहमी येऊन बसायचा.गप्पा करायचा.तो माझा मित्रच होता.अडी अडचणीत तो मला खूप मदत करायचा.
👧🏻 माझ्या कडे माझी " भिमाबाई" नावाची विद्यार्थीनी पाणी भरायला होती.तिचे आई वडील मला त्यांच्या घरातलेच समजायचे.ही भिमा थोडी लहरी होती.आणि तेवढीच प्रेमळही होती.कधी कधी ती आठ दिवस पण यायची नाही.मला रोज पाणी आणून द्यायची कपडे धुवायची,दळण दळून आणणे.अशी कामे ती करायची,तिला मी दर महिन्याला पैसे देऊ करायचो,पण ती व तिचे आई-वडील माझ्याकडून पैसे घ्यायचे नाहीत.मग मी मात्र तिला घेऊन पोलादपूरला जायचो व तिला कपडे,लेखन साहित्य व तिला जी वस्तू लागेल ती घेऊन द्यायचो.दरम्यानच्या काळात मी मुलांना मनापासून अध्यापन करायचो.माझे विद्यार्थी तसे हुशारच होते.सडे गावातील ७०% लोक हे कामा धंद्या निमित्त गुजरात व मुंबई या ठिकाणी असत.बैल दिवाळी,अखंड हरिनाम सप्ताह,तसेच लग्न कार्य,व सुखदुःखाच्या वेळेस ही सर्व मंडळी गावी यायची.शाळा,तसेच गुरुजींच्या अडी अडचणी बाबत चर्चा करायचे.काही दिवसांनी श्री पवार गुरुजी यांची बदली नाशिकला झाली, त्यांच्या जागी इंद्रसिंग पावरा म्हणून नविन जोडीदार आले.त्यांचेही मला सहकार्य लाभले.रमेश साळेकर,बाळा साळेकर,चंद्रकांत साळेकर,तुका,नारायण विठ्ठल साळेकर इ.त्यावेळचे माझे मित्र होते.त्यांनीही मला अतिशय सहकार्य केले.
👳🏼♂️ या गावात एक अतिशय चांगले असे व्यक्तीमत्व होऊन गेले ते म्हणजे *भैरु बुवा,* देवाचे नाव घ्यायचे,साधे भोळे,मनात काही कपट नाही.येता जाता माझी विचारपूस करायचे,मी या गावात पहिल्यांदा जेव्हा बसमधून खाली उतरलो.तिथे सकाळी सकाळी कंबरेला कोयता बांधून,लंगोट लावून ज्यांनी माझे स्वागत केले ते हेच सद्गृहस्थ.तसेच *"लक्ष्या" नावाचा एक अवलिया या गावात होता.* त्याचे लग्न झालेले नव्हते.काहीसा वेडसर असलेला हा माणूस सारखी बडबड करत रहायचा.शेवटी त्याचे लग्न झालेच नाही.कुठेही भेटला तरी माझ्याशी व्यवस्थित बोलायचा.पण मला बायको करायची आहे असे नेहमी सांगायचा.दुर्दैवाने आज लक्ष्या आपल्यात नाही.पण त्याचा एक दुर्मिळ फोटो मी जीवापाड जपून ठेवला आहे.तो फोटो मी मुंबईच्या मंडळी पर्यंत पोहोच केला आहे.असे हे आगळेवेगळे गाव.या गावाच्या अनेक आठवणी सांगण्या सारख्या आहेत.या गावातील मंडळीने कधी जातीभेद केला नाही.आजूबाजूच्या गावांमध्ये जात पात मानणारे लोक होतेच.पण मला गावात तसे काही जाणवले नाही *मला या गावातील लोकांनी कधी "जात " विचारली नाही.याचा मला खूपच अभिमान आहे.* आज मागे वळून पाहतांना माझे सर्व विद्यार्थ्यी / विद्यार्थींनी चांगल्या पदावर काम करत आहेत.याचा मला अभिमान आहे.मी आता नाशिक जिल्ह्यात काम करतोय.पण या गावाला विसरलो नाही आजही माझे विद्यार्थी/ विद्यार्थ्यीनी मला आवर्जून फोन करतात,माझी विचारपूस करतात.माझे त्यावेळचे सर्व मित्र मला फोन करुन चौकशी करतात.खूप बरे वाटते. *शिवरायांच्या भूमीत व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाडच्या चवदार तळ्याच्या भूमीत मी नोकरी केली याचा मला गर्व आहे.* सहज आठवले म्हणून लिहावेसे वाटले.
*✍️ श्री.भगवान शामराव गरुड ( प्राथमिक शिज्ञक) नाशिक*

0 Comments