कथा- @घराणं#

घराणं (भाग 1)

संकलन-@सतीश#कोळी@खुलताबाद#

रत्नपारखी घराण्यात मुलगी देण्यासाठी मुलीच्या पालकांची चढाओढ चालत असायची, याला कारणही तसंच होतं. रत्नपारखी घराण्यात काही पिढ्यांपासून कुणी अज्ञात व्यक्तीने घालून दिलेले नियम हे पुढील पिढ्यांनी तंतोतंत पाळले होते. घरातल्या स्त्रीला उच्च सन्मान दिला जावा, घरातली कामं स्त्री आणि पुरुष दोघांनी मिळून करावी, घरातील सर्व सदस्यांनी महिन्याला एक ठराविक रक्कम घरातील ज्येष्ठ स्त्री कडे सुपूर्द करून त्याची गुंतवणूक दीर्घकाळासाठी केली जावी, घरात धार्मिक वातावरण असावं आणि सोबतच आधुनिक गोष्टीही आत्मसात केल्या गेल्या पाहीजेत, कुटुंबात कितीही संख्या असली तरी प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य जपलं गेलं पाहिजे, कुणावरही कुणीही सक्ती करणार नाहीच पण सोबतच आपल्या मर्यादा प्रत्येकाने ओळखाव्या आणि तशी वागणूक ठेवावी असे काही कडक नियम घराण्यात घालून दिले गेलेले.

"ऋग्वेद... तुझ्या घरी कधी सांगणार तू आपल्या लग्नाचं??"

"आमच्या घरात कुणी प्रेमविवाह केलेला नाही गं.."

"मला नाही वाटत पण की तू सांगितल्यावर ते नाही म्हणतील, रत्नपारखी घराणे म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य अभेद्य ठेवणारं म्हणून परिचित आहे.."

"चांगली ओळखतेस माझ्या घराण्याला..तुझं म्हणणं खरं आहे, पण व्यक्तिस्वातंत्र्याचा गैरवापर केला जाणार नाही याची काळजी घेणंही आमची तितकीच जबाबदारी आहे..."


"यावेळी तुझं मन जबाबदारी आणि भावना यात अडकून गेलं आहे, हरकत नाही..आपल्या कुटुंबाची आणि त्याच्या तत्वांची अभेद्यता कायम राखणं हे तुझं परम कर्तव्य आहे, तू त्यालाच प्राथमिकता दे..मी वाट बघेन.."

असं म्हणत शुभदा तिथून निघून गेली..ऋग्वेदला क्षणभर वाटलं की आपल्या घराण्याला शोभेल अशीच आहे ही, इतका समजूतदारपणा असलेली ही शोधून सापडणार नाही, पण घरात कुणीही प्रेमविवाह केलेला नसताना मी असं सांगणं म्हणजे .

ऋग्वेद या गोष्टीला तात्पुरता पूर्णविराम देतो..

सध्या या कुटुंबात रत्नपारखी पिढीचे वारस..
सर्वात मोठे विनायक, नंतर सुभाष आणि लहान परशुराम असे तीन भाऊ. तिघांना 2-2 अपत्य होती. विनायक ला 2 मुलं, सुभाषला 2 मुली, परशुराम ला एक मुलगा अन एक मुलगी होती. सर्व मुलं मोठी झालेली, विनायकच्या दोन्ही मुलांचं लग्न झालं होतं. त्यांच्या बायकाही सुसंस्कृत होत्या, घराण्याला साजेश्या अश्या मुली दिगंबर आजोबांनी शोधून काढलेल्या...दिगंबर म्हणजे या तिनही मुलांचे वडील, घरातील ज्येष्ठ...त्यांच्या अर्धांगिनी काही वर्षांपूर्वीच गेल्या..पण दिगंबरने घराण्याची जबाबदारी दोन्ही बाजूंनी सांभाळली. एकीकडे मुलांची लग्न जमवण्यातही ते धावपळ करत आणि दुसरीकडे खरेदीसाठी सुनांची हौस पूर्ण करण्यातही लक्ष देत. कावेरीची कमी ते अजिबात जाणवू देत नव्हते.

लहान भाऊ परशुराम यांचा मुलगा, ऋग्वेद..त्याची बहीण शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेली होती. ऋग्वेद एका मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. डॉक्टरकी शिकून प्रख्यात सर्जन व्हायचं त्याचं स्वप्न होतं.


रत्नपारखी घराण्याची ओळख दूरवर पसरलेली होती, पण हे सगळं एकाएकी झालं नव्हतं. या घराण्याला एक दैवी आशीर्वाद होता. त्यांच्या देव्हाऱ्यात लाल कपड्यात गुंडालेलेली एक आयताकृती आणि बऱ्यापैकी जाडजूड वस्तू असायची. घरात एखादी नवीन सून आली की तिला नेहमी प्रश्न पडे, पण सुभाषची बायको त्यांना बजावून सांगे,

"हे आपल्यामागच्या तिसऱ्या पिढीतील एका स्त्रीने हे आपल्याला दिलं आहे, रोज त्याची पूजा करायची पण ते कधीही उघडायचं नाही.."

सुनाही गपचूप ते ऐकत अजून प्रश्न विचारत नसत. जसं सांगितलं गेलं तसं त्या करत. एकदोन वेळा ती वस्तू चोरी व्हायचेही प्रयत्न झाले होते, पण वेळीच लक्षात आल्याने ती वस्तू आजही शाबूत होती. मध्यंतरी अशी अफवाही पसरलेली की त्यात अब्जाबधीचा खजिना लपलेला आहे. त्यामुळे नातेवाईकांपैकी बऱ्याच लोकांचा डोळा त्यावर होता. एवढंच नाही तर या वस्तूमुळे घरात इतका पैसे आहे अशी सर्वांची समजूत होती.

रत्नपारखी घराण्याचा टेक्सटाईल चा मोठा उद्योग होता. हा व्यवसाय अगदी रुळला होता, घरबसल्या लाखो रुपये अगदी आयते जमा व्हायचे. पण दिगंबर आजोबांनी कुणालाही ऐतखाऊ व्हायची संधी दिली नाही. ती रक्कम विनायकाची बायको जानकीकडे ते देत असत आणि तिच्याकडे त्यांची गुंतवणूक करण्याची जबाबदारी असायची. प्रत्येकजण काहींना काही व्यवसाय करत होता. जानकी प्रत्येकाला व्यवसायासाठी ठराविक रक्कम देत असे, आणि त्याच्या पुढे पैशाला पैसा जोडत व्यवसाय उभा करायचा असा नियम असल्याने सर्वजण कष्ट करत असत. रत्नपारखी घराण्यात सून आणण्यासाठी एकच नियम असे, मुलीला घरकाम आलं नाही तरी चालेल पण मुलगी कर्तृत्ववान असावी, शून्यातून विश्व उभं करण्याची धमक तिच्यात असावी अन लाथ मारिन तिथे पाणी काढीन अशी तेजस्वी असावी. अश्या मुली फार कमी होत्या पण दिगंबर आजोबांनी मेहनत घेऊन असे हिरे घरी आणले होते. त्यामुळेच जानकीचं स्वतःचं ऑफिस होतं जिथे अकाउंट अन इतर व्यवहार बघितले जायचे. सुभाषची पत्नी रेखाच्या नावावर 3-4 कपड्यांची दुकानं होती जे ती चालवत असे, परशुराम ची बायको मेघना हिचं स्वतःचं गॅरेज होतं. ती स्वतः पदर खोचून गाड्या दुरुस्त करत असे. दिगंबर आजोबांची अशीच एकदा हायवे वर गाडी बंद पडलेली असताना मेघना तिथे आली होती अन काही क्षणात गाडी दुरुस्त केली होती..बाजूला माझं गॅरेज आहे, थोडावेळ येऊन आराम करा असे ती म्हणाली अन दिगंबर आजोबांनी तिथेच पक्क केलं की ही माझ्या घरची सून हवी. मेघनाची जात पात अन घराणं बघण्याची गरजच नव्हती, कारण

रत्नपारखी कुटुंबात जात, धर्म पाहून लग्न न करण्याची अन केवळ कर्तृत्व बघून मुलगी स्वीकारायची रीत होती.

तीन पिढी मागील ती स्त्री कोण होती? कसला खजिना तिने मागे सोडला होता? काय होतं त्यात? शुभदा या घरात येईल का? आणि येऊन तिला ते रहस्य उलगडेल का? वाचा पुढील भागात..
--------------------------------------
घराणं (भाग 2)


दिगंबर पंतांनी आपल्या धाकल्या मुलासाठी, परशुराम साठी मेघनाला निवडलं होतं, लग्नानंतर 3 वर्षांनी ऋग्वेदचा जन्म झाला आणि 2 वर्षांनी वीणा जन्माला आली. घराण्यात सर्वात लहान म्हणून वीणा विशेष लाडकी. तीही मेघना सारखी तडफदार, स्वाभिमानी आणि साहसी होती. म्हणूनच तिने पायलट बनण्याचं स्वप्न बघितलं होतं, त्याच्याच शिक्षणासाठी ती बाहेरगावी शिकायला होती.

विनायकचे दोन्ही मुलं टेक्सटाईल बिझनेस मध्ये महत्वाची भूमिका बजावत होते, दोघेही बोर्ड ऑफ डिरेकटर्स मध्ये होते. मोठा मुलगा दिवाकर, त्याची बायको रश्मी ही एक बॅडमिंटनपटू होती आणि धाकल्या दिवकरची बायको एक चित्रकार होती.


दिगंबरांच्या मधल्या लेकाला 2 मुली, आर्या आणि स्वरा..दोघीही खूप हुशार अन चुणचणीत होत्या. घरात या दोघींच्या हसण्याने घर अगदी प्रफुल्लित होत असे.

घरात अशी 13 माणसं रहात होती, पण कधीही कुरबुरी ऐकू आल्या नाहीत. एकत्र कुटुंबात असूनही कुरबुर नाही अशी शक्यता कमीच असते, पण हे शक्य करून दाखवलं तेही या घराण्याच्या एका नियमाने.. नियम असा होता की

"स्वैपाकघर हे बाईच्या एकटीचं आणि हक्काचं असावं..त्यात दुसऱ्या कुणी लुडबुड केलेली कुठल्याही बाईला आवडत नाही..वस्तूंची मांडणी, त्यांची ठेवण हे ज्या त्या स्त्रीची स्वतःची आवड असते, त्यात 2 डोकी एकत्र आली की चवच बिघडते..नात्याचीही अन पदार्थाचीही.."


त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचे स्वैपाकघर वेगळे होते. म्हणजे घरात जवळपास 5 स्वैपाकघर होती, आणि एकूण वाडा हा प्रशस्त होताच..पण अजूनही घरी नव्या सुना आल्या की त्यांना त्यांच्या पसंतीचं स्वैपाकघर बनवून घेण्याची मुभा असायची त्यासाठी आजूबाजूला बरीच जमीन शिल्लक ठेवली होती.

एकाच घरात राहूनही स्वतःची स्पेस मिळायला हवी, हा विचार 3-4 पिढ्यांपूर्वी कसा केला गेला असेल?? कुठल्या स्त्रीने हे नियम घालून दिले असतील हा प्रश्न सर्वांना होताच. घरात सर्वात ज्येष्ठ म्हणजे दिगंबरपंत. पण त्यांनाही आपल्या आपल्या पनजीआजी सोडून इतर कुणी आठवत नसे. त्यामुळे ती स्त्री एका रहस्यातच अडकून राहिली.

दिगंबरपंतांच्या कंपनीला आता शाळा कॉलेज मधील युनिफॉर्म चीही ऑर्डर मिळाली होती. शहरातील प्रसिद्ध कॉलेज सावित्रीबाई मेमोरियल आर्टस् कॉलेज मधून ऑर्डर येताच दिगंबरपंत खूप खुश झाले. कारण त्यांनी याच कॉलेज मधून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. या निमित्ताने कॉलेजमध्ये चक्कर मारुयात या विचाराने त्यांनी ड्रायव्हरला आर्टस् कॉलेजमध्ये गाडी वळवायला लावली.


गेटजवळ गाडी उभी करताच आत त्यांना मुख्य प्रवेशद्वाराजवळ जमलेली गर्दी दिसली.

"सखाभाऊ, काय गोंधळ आहे बघता का जरा??"

ड्रायव्हर गाडीतून उतरून बघतो, तोवर कॉलेजच्या स्टाफला आणि प्रिंसिपल ला दिगंबरपंत येण्याची खबर मिळालेली असते. स्टाफ लागलीच त्यांच्या स्वागताला गर्दीतून वाट करत बाहेर जातो..

दिगंबरपंतांना गर्दीतून वाट काढत स्टाफ मेम्बर्स घेऊन जात असतात...त्यांना धक्का लागू नये म्हणून आजूबाजूला काही शिक्षक आणि सिक्युरिटी गार्ड ने घेराव घातलेला असतो. दिगंबरपंत एकंदरीत हे काय चालले आहे याचा अंदाज घेत असतात. ते प्रिंसिपल ला विचारतात..

"कसला गोंधळ आहे सर हा??"

"मुलांचा अति जोश..अजून काय.."

"म्हणजे??"

"शैक्षणिक फी वाढवली म्हणून आंदोलन करताय..काही नाही, 2 दिवस दमतील नंतर आपोआप आपापल्या कामाला लागतील.."

त्यांचं हे बोलणं आंदोलनाच्या मध्यावर दिगंबरपंतांच्या जवळच टेबलवर उभ्या असलेल्या मुलीला ऐकू जातं..आंदोलनात ती मुख्य असेल असं वाटत होतं..


"सर...आम्ही मागे हटणार नाही...तुम्ही अनधिकृत पणे फी वाढवली...आमच्यासाठी नाही पण जी मुलं दुरून इथे येतात, घरची परिस्थिती नसताना हॉस्टेल, कँटीन ची फी भरतात आणि वर ही वाढवा फी भरतात, त्यांच्यावर अतिरिक्त भार टाकून तुम्ही शिक्षणाच्या मूलभूत हक्कावर गदा आणत आहात.. शिक्षण माणसासाठी किती महत्वाचं आहे हे तुमच्याशिवाय अजून कोण सांगू शकेल??"

"हे बघा...वाढीव फी ही शैक्षणिक उपक्रमाचाच एक भाग आहे, तुम्ही निरर्थक आंदोलन करत आहात.."

ती मुलगी खिशातून एक कागद काढते..

"मी पूर्ण होमवर्क करून आलीये सर..यावर सर्व फीज ची सर्व माहिती आहे...कितीही वाढवलं तरी तुम्ही सांगितलेली नवीन फी याच्या चारपट आहे.."

समोर पुरावा बघताच प्रिंसिपल घाबरतात..

"दिगंबरपंत तुम्ही या आत.यांच्याशी मी नंतर बोलतो.."

दिगंबरपंत त्या मुलीच्या शौर्याने अन तडफदार बोलण्याने भारावून जातात. आत ऑफिसमध्ये बसताच दिगंबरपंतांना त्यांच्या कॉलेजचे दिवस आठवतात. प्रिंसिपल समोर येऊन बसतात

"सर ती मुलगी खरं बोलत आहे का??"

प्रिंसिपल विषय बदलतात, काही औपचारिक बोलणं झाल्यावर दिगंबरपंत तिथून निघतात. त्यांचं लक्ष पायऱ्यांचा जवळील एका भिंतीवर गेलं, तिथे असलेली झाशीच्या राणीची मूर्ती अजूनही तशीच होती. पण येता जाता पायऱ्यांवरून उडणाऱ्या धुळीमुळे तिच्यावर धूळ बसायची अन ती तसबीर पुसट व्हायची. दिगंबरपंत कॉलेजला असताना ती तसबीर नेहमी स्वच्छ करत. इतर मुलं त्यांना हसायची पण दिगंबरपंत दुर्लक्ष करायचे.

आजही त्यावर धूळ साचून ती पुसट झाली होती, दिगंबरपंत खिशातून रुमाल काढत त्या तसबीरीकडे जायला निघताच ती आंदोलन करणारी मुलगी तिथे येऊन खिशातला स्कार्फ काढते अन ती तसबीर स्वच्छ करते. दिगंबरपंत एकदम चमकतात. त्यांना त्या मुलीत साक्षात स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. लागलीच ऋग्वेदसाठी तिचा विचार मनात घोळू लागतो. तिथून जाणाऱ्या एका विद्यार्थ्याला ते विचारतात..

"या मुलीचं नाव काय??"

"ती?? कॉलेजची आन बान अन शान...शुभदा नारायणकर..."

क्रमशः
--------------------------------------
घराणं (भाग 3)
-

दिगंबरपंत घरी जातात, सुभाषची बायको रेखा देवपूजा करत असते. या घरात आल्यापासून देवपूजा नेहमी तीच करत असायची, तिला पाहून दिगंबरपंत म्हणायचे,

"अहो दुसऱ्यांनाही पुण्य मिळु द्या की.."

"काय बाबा, सवय झालीये मला..देवपूजा केल्याशिवाय चैन पडत नाही.."

"आता नवीन सुनबाई आली की करू दे तिलाच.."

हे ऐकताच रेखा चमकते, देवपूजा दुसरं कुणी करणार हे तिला सहन होणार नव्हतं..

"सुनबाई?? कोण??"

"सांगतो..ऋग्वेद... मेघना..परशुराम.. खाली या.."

सर्वजण आपापल्या खोलीतून बाहेर आले.

"मी ऋग्वेद साठी एक मुलगी बघितली आहे, आपल्या घराला शोभेल अशी कर्तृत्ववान मुलगी आहे ती..."

ऋग्वेद आजच दिगंबरपंतांना शुभदाविषयी सांगणार होता..पण त्या आधीच हे ऐकून त्याला धक्का बसला. आणि आता जर सांगितलं तर दिगंबरपंतांना वाईट वाटेल असा त्याने विचार केला.

"बोलणी करून आलात का तुम्ही??" परशुराम ने विचारलं...

"नाही, फक्त मुलगी पाहिलीये...पण माहिती काढून तिच्या घरच्यांपर्यंत नक्की पोचतो लवकरच.."

कोण मुलगी असेल अशी? ऋग्वेद ला प्रश्न पडतो..

"बाबा मुलगी कुणीही करा, पण देवपूजा मात्र मीच करणार.." रेखा म्हणते,

"बरं बाई...कुणाचं काय तर कुणाचं काय.."

दिगंबरपंत शुभदा च्या घराण्याची माहिती काढतात, एका मध्यस्थीला पकडत दिगंबरपंत रावसाहेबांच्या घरी पोहोचतात. शुभदाने सांगितल्याप्रमाणे चार कंपन्यांचे मालक असलेल्या रावसाहेबांचे घर श्रीमंतीला शोभेल असे होते. चकचकीत फर्निचर, रंगेबेरंगी काचेची तावदाने, शुभ्र पडदे, चमकदार फरशी. क्षणभर दिगंबरपंतांना विचार आला, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी उन्हात उभी राहून नेतृत्व करणारी मुलगी इतक्या श्रीमंत घरातली? घर सुरेख तर होतच पण संस्कारांचे ठसे जागोजागी उमटले गेले होते. प्रशस्त देव्हारा, भिंतींवर धार्मिक प्रतिकांच्या फ्रेम्स, धूप अगरबत्ती चा सुगंध.. एखाद्या मंदिरात आल्याप्रमाणे सगळं भासत होतं.

इतक्यात रावसाहेब बाहेर आले आणि दिगंबरपंतांना त्यांनी अभिवादन केलं.

"नमस्कार... मी दिगंबर रत्नपारखी.."

"काय चेष्टा करता, तुम्हाला कोण ओळखत नाही...तुम्ही इथे आलात हे आमचं भाग्य.."

"खरं तर एका कामानिमित्तच आलोय मी, तुमच्या मुलीला मी कॉलेजमध्ये बघितलं. खूपच साहसी आणि नेतृत्वकुशल आहे ती, स्पष्टपणे सांगायचं तर माझी सून म्हणून करून घ्यायला मला आवडेल.."

"काय सांगताय, अहो हे आमचं भाग्यच म्हणायचं..तुमच्या घराण्यात मुलगी देणं म्हणजे मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलं असावं मी..."

शुभदाची आई हे सगळं ऐकत होती, तिने हळूच आवाज दिला..

"रावसाहेब...जरा इकडे येता का?"

"दिगंबरपंत, जरा येतो मी हा.."

रावसाहेब हळूच आत जातात.

"काय गं काय झालं??"

"अहो ते घराणं खूप मोठं असलं तरी त्यांची जात वेगळी आहे...असं आंतरजातीय लग्न आपल्याकडे मान्य तरी आहे का?"

रावसाहेब विचारात पडले, त्यांना बायकोचं म्हणणं पटलं. दिगंबरपंत मोठे असले आणि त्यांना नकार देणं शक्य नसलं तरी रावसाहेबांना आपल्या नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना सामोरं जावं लागणार होतं. त्यांची द्विधा मनस्थिती झाली. दिगंबरपंतांना आता काय सांगावं हे काही त्यांना समजेना. मान खाली घालतच ते दिगंबरपंतांसमोर गेले. रावसाहेबांचे हावभाव पाहून दिगंबरपंत म्हणाले,

"रावसाहेब...हा खुप मोठा निर्णय आहे. तुम्ही वेळ घ्या, खरं तर माझंच चुकलं..जातीबाहेर खरं तर प्रेमविवाह होतात, पण मी स्थळ म्हणून आलो..आमच्याकडे हे मान्य असलं तरी दुसऱ्यांच्या घरी हे मान्य असेलच असं नाही. माफ करा माझं चुकलंच.."

"दिगंबरपंत हा तुमचा मोठेपणा आहे, माफी कसली मागता.."

"तुम्ही वेळ घ्या, निर्णय कळवा मला.."

दिगंबरपंत थोडेसे नाराज होऊन निघून जातात. मनात विचार येतात, आजही दुसऱ्या जातीत लग्न होत नाहीत, पण माझ्या घरात मात्र आधीपासूनच ही प्रथा मोडण्यात आली..खरंच, कोण असेल ती दिव्य स्त्री जिने त्या काळात हा नियम घालून दिला असेल??

रावसाहेब चिंतित होतात, काय करावं आता? एक तर इतकं चांगलं स्थळ चालून आलंय, पण नातेवाईकांचाही विचार करावा लागेल. रावसाहेब त्यांच्या बायकोशी, म्हणजेच सुमनशी बोलतात..

"सुमन...हे काय होऊन बसलंय.."

सुमन आधीच चिंतेत असते..

"रत्नपारखी घराण्यात मुलगी द्यायचं म्हणजे आपलं भाग्यच...पण त्यांच्याशी आपलं एक नातं आहे.."

"कुठलं नातं..?"

"म्हणजे माझी आजी सांगायची, मला पूर्ण माहीत नाही...आजीची आई आणि आणि रत्नपारखी घराण्यातील एक पुरुष.. यांनी त्या काळात लग्नासाठी विचार केला होता..म्हणजे त्या दोघांची ओळख अशीच कुठेतरी झालेली...पण .."

"पण काय??"

"त्या काळात प्रेमविवाह तोही आंतरजातीय... म्हणजे लोकं जीव घ्यायलाच निघालेली.."

"बापरे..."

"काहीतरी नातं होतं... एक इतिहास आहे आपल्या अन त्यांच्या घराण्याचा..पण आपल्या पिढीला तो पूर्ण माहीत नाही.."

"काय नातं असेल?"

"एक माणूस हे सांगू शकतो..."

"कोण?"

"आपल्या ओळखीतले भाट.. आपले गुरुजी..रुद्रशंकर गुरुजी..आपण त्यांच्याकडूनच सल्ला घेतो नेहमी.."

"त्यांचा सल्ला घेऊ नक्की...चल लगेच जाऊया.."

दोघेही रुद्रशंकर गुरुजींकडे जातात...गुरूजी आणि त्यांची मागची पिढी ही नारायनकर कुटुंबाची सगळी धार्मिक कार्य करत असत. अत्यंत विश्वासू अशी ती माणसं, त्यांच्या चार पिढ्यांपासून नारायनकर कुटुंबाच्या सोबत ते होते..आजही ती प्रथा कायम सुरू होती.

रुद्रशंकर गुरुजी, चेहऱ्यावर एक विलक्षण तेज. त्यांच्या घरी वेदमंत्रांनी भारलेली प्रत्येक वस्तू..पावित्र्याचा सुगंध त्यांच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्याकोपऱ्यातून दरवळत होता. रावसाहेब आणि सुमन त्यांच्यासमोर जाताच त्यांनी गुरुजींना वाकून नमस्कार केला. गुरुजी खुर्चीवर ध्यानस्थ बसले होते. गुराजींचे ध्यान संपायची वाट बघत दोघेही तिथेच खाली चटईवर बसून राहिले.

गुरुजी डोळे बंद ठेवूनच म्हणाले, बोला..मी ऐकतोय..

रावसाहेब आणि सुमन एकमेकांकडे बघतात, रावसाहेब सुमन ला सांगायचा इशारा करतात तसं सुमन म्हणते.

"गुरुजी.. शुभदा साठी एक स्थळ आलंय...खूप मोठं घराणं आहे..सगळं अगदी छान आहे..पण..जात वेगळी आहे.."

"काय नाव घराण्याचं.."

"रत्नपारखी..."

हे ऐकताच गुरुजी डोळे उघडतात. दोघांकडे बघतात आणि चटकन उभे राहतात.

"काय झालं गुरुजी??"

"तुमच्या अनेक पिढ्यांची वाट आम्ही पाहिली, माझ्या पूर्वजांनी सांगितलं होतं, ज्या पिढीत नारायनकर आणि रत्नपारखी घराण्याचे संबंध जुळतील तेव्हा एक अद्वितीय गोष्ट घडून येईल...आणि इतक्या पिढ्यानंतर आज तो योग जुळून आलाय.."

"काय? म्हणजे...हे सगळं.."

"हो. हे सगळं विधिलिखित होतं... कुठल्यातरी एक पिढीत हे होणारच होतं आणि तुमच्या पिढीला हे दिव्यत्व मिळेल...नशीबवान आहात तुम्ही..हे लग्न व्हायलाच हवं.."

"धन्यवाद गुरुजी... मनावरचा मोठा ताण गेला बघा.. "

"थांबा.."

असं म्हणत गुरुजी आत जाऊन एक पितळाची पेटी घेऊन येतात अन सांगतात.

"माझ्या पिढ्यांनी ही गोष्ट वारंवार सांगितली...की जेव्हा ही दोन घराणं नात्यात बांधली जातील तेव्हा तुमच्या अपत्याकडे हे सुपूर्द करायचं..."

"काय आहे त्यात??"

"ते आम्हाला माहीत नाही, आम्हाला ते बघण्याची मान्यताही नाही आणि नीट पहा, त्याला एक छोटंसं कुलूप आहे...त्याची चावी कुणाकडेही नाही. तीन ते चार पिढ्यांपूर्वी म्हणजेच जवळपास 300 सालापूर्वीचं हे धन आहे... याची जबाबदारी आता शुभदा कडे... तिच्या लग्नात मी तिला हे देईन.."

रावसाहेब आणि सुमन घरी येतात.

"काय प्रकार आहे हो हा? ती पेटी, ती किल्ली, रत्नपारखी कुटुंबाशी संबंध, काहीतरी दिव्यत्व... काय असेल??"

"कसलाच सूर सापडत नाहीये, पण जे काही आहे ते एक दिव्य आहे, काहीतरी दैवी आहे..आणि आपली शुभदा त्याचा एक भाग असणार आहे.."

काय असेल रत्नपारखी आणि नारायनकर घराण्याचा इतिहास?? देव्हाऱ्यातली ती गोष्ट आणि रुद्रशंकर गुरुजींकडे असलेली ती पेटी, यांचा काय संबंध असेल? आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारी कोण असेल ती दिव्य स्त्री?? पुढील काही भागात सर्व उलगडा होईलच...

क्रमशः
--------------------------------------
घराणं (भाग 4)

रावसाहेब दिगंबरपंतांना फोन करून पुढची बोलणी करायला आमंत्रण देतात. दिगंबरपंतांना खूप आनंद होतो. सुमन शुभदाच्या कानावर हे सगळं घालते. शुभदा हे ऐकून चिडते..

"मला न सांगता तुम्ही परस्पर ठरवलं तरी कसं? आणि असुदेत ते कितीही श्रीमंत.. माझं काही मत आहे की नाही??"


"अगं तू मुलगा बघ, मग ठरव..आम्ही काही जबरदस्ती करणार नाहीये.."

"तरी पण.."

"फक्त पाहायला येणारेत ते..तुझं थोडी लगेच लग्न लावून देणार आहे आम्ही??"

"आई तुला एक गोष्ट सांगायची होती, पण.."

आईच्या काळजाचा ठोकाच चुकला...

"मला एक मुलगा आवडतो...पण.."

"बस्स शुभदा...माझ्यापुढे बोललीस, पण घराण्याला गालबोट लागेल असं काही पाऊल उचलू नकोस..ही घे साडी, संध्याकाळी तयार रहा.."

असं म्हणत सुमन निघून जाते. शुभदा ठरवते, पाहुण्यांना सगळं खरं खरं सांगणार...शुभदा निर्भीड होती, सत्याची कास धरणारी होती त्यामुळे सत्य लपवून ठेवणं तिला योग्य वाटत नव्हतं.


शुभदा संध्याकाळी साडी नेसून तयार झाली. दिगंबरपंत, मेघना, परशुराम आणि ऋग्वेद घरी आले. जुजबी बोलणं झाल्यावर मुलीला समोर आणा म्हणत शुभदाला बोलावण्यात आलं. शुभदा मान खाली घालून आली. केव्हा एकदाचं सत्य सांगून टाकते असं तिला झालं. ऋग्वेदला मात्र आनंदाचा धक्काच बसतो..जिच्यावर प्रेम केलं तिलाच पाहायला तो आलेला. पण शुभदाने अजून मान वर करून पाहिलं नव्हतं. ऋग्वेद ती आपल्याकडे बघण्याची वाट बघत असतो पण तिच्या मनात असलेला ऋग्वेद कुठल्याही परक्या पुरुषाकडे बघायची परवानगी तिला देत नव्हता.

इकडे माणसांचं बोलणं चालू होतं, ऋग्वेद शुभदाकडे चोरुन बघत मनोमन आनंदी होत होता, अखेर शुभदाने सगळं बळ एकटवलं आणि मान वर करून म्हणायला लागली..

"माफ करा पण..."

वर बघताच ऋग्वेद तिला दिसला..म्हणजे?? म्हणजे याचंच स्थळ आलंय की काय आपल्याला? क्षणभर शुभदाला काहीच सुचेना, ती ऋग्वेद कडे बघतच राहिली, ऋग्वेद तिच्याकडे बघून हसत होता.

"काय म्हणत होतीस मुली? का माफ करा??"

दिगंबरपंतांच्या या प्रश्नाने ती भानावर आली,

"माफ? माफ करा..हो...म्हणजे, माफ करा मधेच बोलतेय, पण चहा घेतला नाही तुम्ही, गार होतोय.."

"हा हा...खरंच की गं... घेतो..आणि तुही बस समोर, आमच्यासमोर घे चहा.."

"मी??"

"अगं आमच्याकडे रितच आहे..मुलीने समोर उभं राहून बोलायचं नाही..आमच्या बैठकीत आमच्याच बाजूला बसुन समान चर्चा करायची.."

सुमनला तर भीतीच वाटत होती, ही मुलगी खरं सांगतेय की काय..पण तिच्याही जीवात जीव आला. मुला मुलीला बोलायला बाहेर पाठवण्यात आलं. ऋग्वेद आणि शुभदा बाहेर आले. समोरासमोर येताच दोघांना हसू आवरेना..

"अरे काय हे, मला आधी सांगायचं ना.."

"मला तरी कुठे माहीत होतं..बरं तुला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचार.."

"होना..बरेच प्रश्न विचारायचे आहेत..आपण एकमेकांना ओळखत नाही ना.."


दोघांचं बोलणं बाहेर सुरू असतं, आत दिगंबरपंत म्हणतात.


"आमच्या ऋग्वेदला शुभदा आधीपासूनच आवडत होती, मी माहिती काढल्यावर शुभदाच्या कॉलेजला कामात काम म्हणून आलो, आणि त्याची आणि माझी पसंत सारखीच निघाली..काय योगायोग हा.."

"म्हणजे?? शुभदा आणि ऋग्वेद आधीपासूनच??"

"हो सुमनताई..."

सुमनच्या मनावरचं मोठं ओझं कमी झालं..

पाहुणे गेल्यावर सुमन शुभदाच्या खोलीत आली,

"शुभदा.. मला माफ कर, उगाच मी तुझं लग्न अनोळखी मुलासोबत लावून देणार होती..पण त्यांना नकार देऊ आपण..तू तुला आवडत असलेल्या मुलाशीच लग्न कर.."

"नको आई.. मला पटलं, आई वडिलांच्या शब्दाबाहेर जाण्यात काही अर्थ नाही..मी करेन त्या मुलाशीच लग्न.."

"लबाड कुठली...बस कर नाटकं.. मला माहितीये हा तोच मुलगा आहे.."

शुभदा जीभ चावत म्हणते,

"तुला कसं माहीत??"

सुमन तिला सगळी हकीकत सांगते, दिगंबरपंतांचं तिला फार कौतुक वाटतं. संसाराची स्वप्न आता ती रंगवू लागते. शुभदाचं शिक्षण अजून बाकी असतं. तिने साहित्य विषय घेतला होता आणि पुढे जाऊन त्यातच तिला Phd करायची होती. तिने तसं आपल्या सासरी सांगितलं होतच.

ऋग्वेद आणि शुभदाचं थाटामाटात लग्न होतं.
लग्नात रुद्रशंकर गुरुजी येतात,त्यांच्याकडे असलेली पेटी ते शुभदाला सुपूर्द करतात. सर्वांना प्रश्न पडतो की काय असेल नेमकं यात? गुरुजी एवढंच सांगतात..

"रत्नपारखी आणि नारायनकर कुटुंबाच्या पुर्वजांचा खजिना आहे यात...त्याचा उलगडा करण्याचं दिव्य काम तुला करायचं आहे...आमच्या पिढीला ही जबाबदारी दिली गेली होती आणि आज दोन्ही घराणे एक झाल्यावर आम्ही जबाबदारीतून मुक्त झालो.."

ते ऐकताच रेखा पुढे येते..कसला खजिना?? कसला उलगडा??

"सगळं विधिलिखित आहे...सगळं समोर येईलच, थोडा धीर धरा.."

शुभदा माप ओलांडून घरी येते. घरी आल्यावर नववधुचं स्वागत करण्याची रत्नपारखी घराण्याची वेगळी रीत होती. सत्यनारायणाची पूजा नाववधूच्या खोलीत केली जाई..आणि त्या खोलीला विशेष पद्धतीने तयार केलं जाई. येणाऱ्या मुलीला आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी अनुकूल असं वातावरण तयार केलं जायचं, तिला तिचं ध्येय पूर्ण करताना जे जे काही लागेल त्या सर्व वस्तू तिला भेट दिल्या जायच्या. शुभदाला तिची खोली दाखवण्यात आली..तिच्या सासूबाई, जानकीबाई तिला खोली दाखवू लागल्या..

"हे बघ बाळा..ही तुझी खोली..."

"म्हणजे माझी आणि ऋग्वेद ची ना??"

"नाही, ही फक्त तुझी...तुमच्या दोघांची खोली बाजूला आहे..बायको म्हणून नवऱ्याच्या सर्व गोष्टीत तुझा सहभाग असला तरी तुझं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवता आलं पाहिजे. जसं त्या खोलीत तुमचा संसार फुलणार आहे तसाच या खोलीत तुला तुझं अस्तित्व फुलवायचं आहे.."

शुभदाला हे ऐकून मनस्वी आनंद होतो, ती खोली निरखून बघते, तिला अभ्यासाला छानसा टेबल, गोल फिरणारी खुर्ची, शेजारी एक प्रशस्त कपाट ज्यात वाचनालयात असलेली सगळी पुस्तकं अगदी चार पावलांच्या अंतरावर, वह्या, पुस्तकं...शुभदा हे सगळं बघून भारावून जाते..खोलीतच सत्यनारायणाची पूजा मांडलेली ती बघते..जानकीबाई सांगतात..

"हे बघ, जिथे लक्ष्मी असते तिथेच नारायण असतो...तू फक्त लक्ष्मी नावाला असू नकोस, तर तुझ्या कर्तृत्वाने तुला सोन्यासारखी झळाळी येऊ दे. दागदागिने, हिरे, मोती यापेक्षा आलेल्या सूनेचं कर्तृत्व हेच आपल्या घराण्यात श्रीमंतीत मोजतात. आता ही श्रीमंती तुला टिकवायची आहे अन वाढवायची आहे.."

शुभदाला ते ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. लग्नानंतर मुलीचं शिक्षण, नोकरी बंद होताना तिने ऐकलं होतं, पण इथे तर....उगाच नाही रत्नपारखी घराण्यात मुलगी देण्यासाठी पालक चढाओढ करत..

जानकीबाई काशीबाईला आवाज देतात..

"हे बघ, या काशी आजी...तुझा चहा, नाष्टा, जेवण, झाडू, लादी, कपडे सगळं काम ह्या बघतील.. तुला काय हवं नको ते यांना सांगायचं.."

नंतर तिला देवघर दाखवण्यात येतं.. रेखाही मागोमाग येते..देवघरात जाऊन शुभदा सर्व देवांना नमस्कार करते..देव्हाऱ्यात लाल कपड्यात ठेवलेल्या त्या वस्तूचं तेज आज का कोण जाणे पण खूप उठून दिसत होतं. त्या वस्तूवर बांधलेला लाल कपडा हवेने उघडू पाहायला लागला. हे दृश्य सर्वांसाठी अचंबित करणारं होतं..

"काशीबाई, खिडक्या लावून घ्या की..आज हवा दिसतेय चांगली.."

काशीबाई खिडक्या बंद करायला जातात, पण खिडक्या तर आधीच बंद असतात..मग तो कपडा उघडू कसा पाहत होता??

शुभदा त्या वस्तूकडे एकटक बघते, अन विचारते..

"हे काय आहे??"

जानकीबाई काही सांगायच्या आत रेखा पुढे येऊन म्हणते..

"आपल्या पूर्वजांनी ते आपल्यासाठी दिलेलं आहे..त्याची रोज पूजा करायची.."

"हो पण त्यात काहीतरी असेलच ना, फक्त पूजा करायची?? कुणी उघडून पाहिलेलं नाही का??"

आजवर हा प्रश्न घरातील कुठल्याही सुनेने विचारला नव्हता, पण शुभदा मात्र त्याची इथंभुत माहिती काढण्याच्या मागेच लागली..

क्रमशः
--------------------------------------
घराणं (भाग 5)



रेखाला शुभदाने देव्हारातल्या त्या वस्तूबद्दल विचारलेलं आवडलं नाही. रेखा शक्य तितक्या शांततेत तिला त्या वस्तूबाबद्दल जास्त चौकशी न करण्याबद्दल खबरदारी घेतली. शुभदाला ऋग्वेद ने आवाज दिला तशी ती तिथून निघाली अन रेखाने सुटकेचा निःश्वास टाकला. विनायकच्या दोन्ही सुनांसोबत ती मिसळून गेली होती. रश्मी, विनायकाची मोठी सून अन दिवाकर ची बायको..सकाळी लवकर उठून जिम ला जायची तिला सवय होती. शुभदाने तिच्यासोबत जिम ला सुरवात केली. रश्मीच्या बॅडमिंटन च्या स्पर्धा दर 3 महिन्यांनी असायच्या, त्यासाठी फिटनेस टेस्ट तिला पार करावी लागत असे. रश्मी आणि तिची धाकली जाऊ मीनल सोबत शुभदाचं छान पटत होतं. दोन्हीही मुलींनी घराण्याचं नाव काढलं, रत्नपारखी घराण्याशी त्या एकरूप झाल्या होत्या.

नेहमीप्रमाणे सकाळी आवरून तिघी सुना देव्हाऱ्यात नमस्कार करायला आल्या तेव्हा शुभदाने रश्मीला विचारलं,

"या लाल कपड्यात काय आहे??"

"आपल्या घराण्यात पूर्वापार ही वस्तू पुढच्या पिढीकडे सोपवण्यात येते..पवित्र वस्तू आहे ती, त्यामुळे आपल्या घराण्याचं पावित्र्य आणि सुखशांती टिकून आहे.."

"हो पण आहे काय त्यात?"

"ते आम्हालाही माहीत नाही.."

प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर उतरवून मगच मान्य करायचा शुभदाचा स्वभाव होता. त्यामुळे मनात सतत त्या वस्तूबद्दल कुतुहल तिच्या मनात जागृत होत असे.

रश्मी पुढच्या स्पर्धेची तयारी करत होती, 2 महिन्यांनी तिची स्पर्धा होती आणि यावेळी तर ती खूपच महत्वाची होती, देशस्तरीय पातळीवर तिला खेळायला मिळणार होतं आणि त्यात विजेती झाली तर देशाचं प्रतिनिधित्व करायला मिळणार होतं. तिच्या तयारीसाठी दिगंबरपंतांनी खास प्रशिक्षक नेमला होता. जानकीबाईंनी खास आहारतज्ञांशी सल्लामसलत करून तिचा आहार काशीला बनवायला सांगितला होता. तिची लहान जाऊ मीनल, म्हणजेच विनायकाची धाकली सून चित्रकार होती. तिने बनवलेल्या चित्रांचे दिगंबरपंत दरवर्षी मेळावा भरवत, घरात ठिकठिकाणी तिने बनवलेल्या पेंटिंगच लावलेल्या असायच्या. सगळी चित्र तिने काढलेली, पण एक चित्र काही केल्या तिला जमेना.. घरातल्या प्रत्येकाचं हुबेहूब चित्र ती काढू शकत होती पण सर्वांचा एकत्र असलेला फोटो तिला बघून काढणंही शक्य होत नसायचं. काढताना काहीतरी सतत चुकायचं, रंगसंगती चुकायची, कधी आकार चुकायचा..इतकी उत्तम चित्रकार असलेल्या तिला याची सल नेहमी वाटत राहायची.


शुभदाचंही कॉलेज सुरू झालं. गळ्यात मंगळसूत्र असलेल्या शुभदाला बघून मैत्रीणी तिला चिडवायच्या, शुभदाही लाजून त्यांना गप करायची. अश्यातच मराठीच्या शिक्षकांनी तिला भेटायला बोलावलं. माने सर, मराठीचे शिक्षक अन त्यांची लाडकी विद्यार्थिनी म्हणजे शुभदा. त्यांनी तिला भेटायला बोलावलं, त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव होते ते शुभदाच्या लक्षात आले..

"सर तुम्ही आज नाराज दिसताय.."

"शुभदा तुझ्याकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या, मराठी साहित्यात तू खूप पुढे शिकावं, खूप प्रगती करावं...पण तू लग्नाची घाई केलीस असं नाही वाटत तुला?"

"सर पण माझं लग्न आणि माझं शिक्षण याचा काय संबंध??"

"लग्न झाल्यावर शिक्षण सोडलेल्या खूप हुशार मुली पहिल्या आहेत मी..संसाराला लागल्या की स्वतःचं अस्तित्व हरवून बसतात, आणि जेव्हा जाणीव होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. तुझ्या Phd चं काय?? करणार की नाही पुढे??"

हे ऐकून शुभदा हसायला लागते, रत्नपारखी घराण्याबद्दल ती सगळं सांगते आणि तिला अभ्यास करता यावा यासाठी घरात किती अनुकूल वातावरण तयार गेलं आहे हेही सांगते..माने सर हे ऐकून खुश होतात..


"मनावरचा फार मोठा ताण गेला बघ...Phd साठी ही काही रिसर्च पेपर्स आहेत, ही काही पुस्तकं आहेत, यांचा संदर्भ घे आणि कामाला लाग..."

शुभदा ते पेपर बघते..

"सर यात हे एक अर्धवट रिसर्च आहे, मोडी लिपीतील... कुणाचं आहे??"

"फार पूर्वीचं दिसतंय.."

"तरी किती पूर्वीचं??"

"आपलं कॉलेज अगदी जुनं बघ, अगदी इंग्रजांच्या काळातलं... केलं असेल कुणी तेव्हाच.."

"तेव्हा मोडी लिपी अस्तित्वात होती??"

"1200व्या शतकापासून ते अगदी इंग्रज भारत सोडायच्या वेळीही ती अस्तित्वात होती. सर्व कारभार मोडी लिपीत होत असत. मग इंग्रजांनी मोडी लिपीला हद्दपार करत देवनागरी लिपीला अंतिम मंजुरी दिली.."

"पण मग आता Phd साठी हे काय कामाचं.."

"साहित्याला भाषेचं बंधन ठेऊ नकोस, ऐतिहासिक साहित्य म्हणून तू यावर संशोधन करू शकतेस.."

"खरं तर मला आधुनिक साहित्य आणि समाजमाध्यमं यावर संशोधन करायचं होतं.."


"कर की मग..छान विषय आहे..मोडी लिपीत तुला आवड नसली तरी आपल्या बोलीभाषेतील अभ्यासही चांगलाच की.."

इतक्यात तिच्या डोळ्यावर एक प्रकाश आला आणि तिने डोळे झाकून घेतले. ऊन डोळ्यावर आल्याने ती बाजूला झाली. तिने ते पेपर जमा केले, डोळ्यापुढे अंधारी आली..पण अश्यातही त्या मोडी लिपीतील लिखाण तिला तेजःपुंज दिसत होतं. डोळ्यापुढे अंधारी असताना ते मोडी लिपीतील पेपर तिला स्पष्ट दिसत होते, हा एक दैवी साक्षात्कारच होता.. पण तिला ते लक्षात यायला काही अवधी अजून बाकी होता.

इकडे दिगंबरपंत एका नवीन जागेच्या खरेदी संदर्भात एक मोतीलाल नावाच्या व्यापाऱ्यासोबत चर्चा करत होते. त्यांची टेक्सटाईल कंपनी नवीन जागेत हलवावी असा विचार त्यांच्या मनात होता. कारण सद्य जागेवर कच्चा माल पुरवठा होतांना खूप अडचणी यायच्या, ठिकाण लांब असल्याने कधी माल पोहोचायला वेळ लागे. तशीच एक ऑफर त्यांना एका दुसऱ्या व्यापाऱ्याकडून, सुमनशेठ कडून आलेली. दोन्ही जमिनी मोक्याच्या जागेवर होत्या आणि किमतीही सारख्याच होत्या. पण घेतांना विचारपूर्वक घ्यावी लागणार होती, कारण एकदा का खरेदी झाली की मग नंतर त्याच्या मालकी हक्कावर काही कायदेशीर गदा यायला नको. त्यामुळे दिगंबरपंत विचार करून हा निर्णय घेणार होते.

मेघना, म्हणजेच शुभदाच्या सासुबाईं अजूनही गॅरेज चालवत होत्या. शुभदाला आपल्या सासूबाईंना असं काम करताना पाहून विशेष कौतुक वाटे. मेघनाने हाताखाली माणसं ठेवलेली असली तरी काही मोठा बिघाड झाला की तीच कामात येई. सध्या गॅरेजचा व्याप वाढला होता, बंगल्याच्या जवळच एका मोठ्या हायवे चं काम नुकतंच पूर्ण झालेलं आणि येणारी वाहतूकही वाढली होती, त्यामुळे आता गॅरेजमध्ये बरीच गर्दी असायची.

एक दिवस गावाकडे नातेवाईकांमध्ये एक लग्न निघालं, घरातली काही मंडळी तिथे जाणार होती. सर्व सुनांना आणि मुलांना आपापल्या कामात व्यत्यय नको म्हणून त्यांना घरीच थांबवण्यात आलं. जानकीबाई, रेखा, विनायक, सुभाष आणि परशुराम यांनी जायचं ठरवलं. मेघना गॅरेजच्या कामासाठी इथेच थांबली. रेखाची जायची इच्छा नव्हती पण दिगंबरपंतांच्या शब्दाला मोडण्याचं साहस त्यांना झालं नाही.

ठरलेली मंडळी गावाला निघून गेली. घरी आता तिन्ही सुना, मुलं आणि मेघना फक्त होती. मेघना गॅरेजमध्ये काम करत असताना शुभदा तिथे गेली अन सासुबाईंचं असं मन लावून काम करणं कौतुकाने बघू लागली. मेघनाचं कितीतरी वेळ लक्षच नव्हतं, काही वेळाने त्यांच्या लक्षात आलं तसं त्या हसून म्हणाल्या,

"अगं बाई, तू कधी आलीस??"

"केव्हाची आलीये, पण म्हटलं तुम्हाला डिस्टर्ब नको करायला.."

"ये ये..बस...आज इकडे कशी?"

"सहजच...सासूबाई एक विचारू?? तुम्हाला या क्षेत्रात कसं येऊ वाटलं?? म्हणजे हेच क्षेत्र का??"

"अनवधानाने म्हण किंवा नशिबाने म्हण..गरीब कुटुंबाला हातभार म्हणून पडेल ते काम करण्याची जिद्द ठेवली अन हे काम हाती आलं.."

"पण मग सगळं नीट झाल्यावर हे काम सोडून दुसरं करता आलं असतं की.."

"या कामात एक गंमत आहे, सांगू??"

"कसली गम्मत??"

"लोकांच्या गाड्या जेव्हा चांगल्या असतात तेव्हा ते इकडे फिरकतही नाही..पण काही अडचण आली की बरोबर त्यांचे पाय वळतात."

"हो..मग??"

"आयुष्यही असंच आहे..लोकांना जेव्हा गरज पडते तेव्हा त्यांचे पाय कुणाकडे वळतात यावरून माणसाची किंमत आपल्याला कळते...इथे खूप इतर गॅरेज आहेत, पण आपण कमी किमतीत आणि चांगल्या मनाने लोकांचा प्रवास सुखकर करतो, म्हणून लोकं इथेच येतात...आयुष्यही असंच जगावं..लोकांना आपल्या चांगल्या स्वभावाने आणि मधुर वाणीने आकर्षित करायचं..त्यांना काही अडचण आली तर केवळ आपला चेहरा आठवावा..हेच तर पुण्य आहे.."

शुभदाला पावलोपावली घराण्याच्या
दिव्यत्वाचं दर्शन होत होतं.

घरात जास्त माणसं नव्हती, अश्यातच शुभदाच्या डोक्यात येतं की देवघरातील ती लाल कपड्यातील वस्तू उघडून पाहिली तर?? ती संधी साधून दुपारी सर्वजण आपापल्या खोलीत गेले असता दबक्या पावलांनी देवघरात जाते. लाल कपड्यातील त्या वस्तूकडे एकदा बघते आणि वेळ न दवडता वस्तू उघडायचा प्रयत्न करते. लाल कपडा बाजूला होताच आत जे दिसतं त्याकडे ती बघतच राहते..एक जीर्ण झालेलं खूप जुनं आणि हाताने लिहिलेलं एक पुस्तक त्यात होतं. शुभदा मागून पुढून ते बघते आणि तिचा काहीसा हिरमोड होतो.. तिला वाटलेलं की काहीतरी भन्नाट असणार, पण निघालं पुस्तक...ती ते तसंच लाल कपड्यात ठेऊन पुन्हा तिच्या कामाला लागते.

"रेखा आई पण ना, सरळ सांगायचं ना की पुस्तक आहे त्यात..उगाच परीक्षा घेतली माझी.."

शुभदाला जरा हायसं वाटलं, नाहीतर कायम त्या लाल कपड्यातील वस्तूचा प्रश्न तिला भेडसावत राहिला असता.

रात्री मात्र शुभदाच्या स्वप्नात विचित्र आकृत्या येऊ लागलेल्या, कॉलेजमधील माने सर, ते मोडी लिपीतील साहित्य, देवघरात सापडलेलं पुस्तक..आणि सरतेशेवटी एक जरिकाठाची साडी घातलेली अन डोक्यावर पदर घेतलेली एक दिव्य स्त्री तिच्या डोळ्यासमोर येते...ती तिला ते पुस्तक सुपूर्द करतेय असं तिला दिसतं अन शुभदा खाडकन जागी होते.

क्रमशः
--------------------------------------
घराणं (भाग 6)

शुभदाला रात्रभर झोप लागत नाही, ती पुन्हा त्या पुस्तकाकडे खेचली जाते. रात्रीच्या 2 वाजता ती देवघरात येते. अंधारातही त्या लाल कपड्यातील वस्तू तिला स्पष्ट दिसत होती. ती त्या वस्तूला हात लावणार तोच मागून तिच्या खांद्यावर एक हात ठेवला जातो.

"शुभदा? इतक्या रात्री इथे काय करतेय??"

"ऋग्वेद..झोपला नाहीस??"

"नाही, मलाही झोप लागली नाही...मी खरं तर प्लॅंनिंग करत होतो, आपल्याला कुठे फिरायला जायचं याची..."

"इतक्या रात्री??"

"दिवसभर कुठे वेळ मिळतो..डोळे लावून पडलेलो पण मनात नुसता गोंधळ, मनाली ला जायचं की केरळ ला..."

"इतक्यात नको.."

"का?"

"मला Phd साठी एक पेपर सादर करायचा आहे, त्यासाठी थोडं काम आहे..

"ठीक आहे, ते झालं की मग जाऊ...पण तू इथे काय करतेय सांगितलं नाहीस.."

"मी...सहजच.."

"काहीतरी कारण असल्याशिवाय तू इथे येणार नाहीस हे माहितीये मला...सांग खरं काय ते.."

"ऋग्वेद... हे बघ, माझ्या आयुष्यात गेल्या काही दिवसात अश्या काही गोष्टी घडल्या की माझं आयुष्याचं ध्येयच एकदम बदलून गेलं. तुझ्या घराण्याशी माझा पूर्वापार संबंध आहे असं वाटू लागलंय मला..देव्हाऱ्यात हे पुस्तक ठेवलं आहे ना, यात काय आहे माहितीये??"

"पुस्तक आहे, मोडी लिपीत.."

"तुला कसं कळलं?"

"मला माहित होतं आधीपासूनच.."

"मग...असं का म्हणायचे की कुणालाही माहीत नाही म्हणून.."

"ही गोष्ट फक्त मी, दिगंबरपंत आणि आता तुला माहिती आहे..या पुस्तकाबद्दल अनेकांना चमत्कारिक अनुभव आलेत..काही दुःखदही..या पुस्तकामुळे एकदा अरुंधती आजी आजारी पडली होती, आणि आजाराने ती गेली ती गेलीच..तेव्हापासून आम्ही ते पुस्तक उघडून पाहायला घाबरतो..आणि नवीन येणाऱ्या व्यक्तीलाही बजावून सांगतो.."

"अच्छा म्हणजे हे कारण आहे तर.."

"हो...तुही दूर रहा त्या पुस्तकापासून.."

"अरे नाही...मला स्वप्नात सतत ते पुस्तक दिसतंय, मोडी लिपीत काही अक्षरं दिसताय...पण त्याचा अर्थ कळत नाहीये... मला वाटतं मी त्याचा अर्थ शोधून काढावा.."

"हे बघ शुभदा, आधीच या घराण्याने आजीला गमावलं आहे, आता पुन्हा कुणाला गमावण्याची हिम्मत कुणातच नाही.."


"पण मला तसा दैवी संकेत मिळालाय ऋग्वेद..आपल्या घराण्यात रत्नपारखी आणि नारायनकर कुटुंब एक होतील तेव्हा एक दिव्य कार्य होईल असं रुद्रशंकर गुरुजींनीही सांगितलं आहे..कदाचित, हेच ते असेल..मी त्या पुस्तकातील शब्दांचा अर्थ शोधून काढावा असंच त्या नियतीच्या मनात असेल..रुद्रशंकर गुरुजींनीही हेच सांगितलं आहे.."

"हे बघ, या बदल्यात जर तुझ्या जीवाला धोका निर्माण होणार असेल तर नको कसलाही शोध अन पुस्तक.."

"लग्नाआधी म्हटला असतास तर कदाचित ऐकलं असतं, पण आता रत्नपारखी घराण्याची सून आहे मी..इथली तत्व, इथल्या स्त्रियांच्या रक्तात असलेली कर्तबगारी मी धुळीस नाही मिळू देणार..त्या बदल्यात प्राण गेले तरी बेहत्तर.."


शुभदा एवढं म्हणत निघून जाते..ऋग्वेद ला एका क्षणी आनंदही होतो, की घराण्याला शोभेल असाच हिरा आपण घरात आणलाय, पण सोबतच तिच्या जीवाशी काही खेळ तर होणार नाही ना...म्हणून त्याला भीतीही वाटायला लागते.

दुसऱ्या दिवशी शुभदा तडक आपल्या कॉलेजमधील माने सरांना भेटते.

"सर...माझा Phd चा विषय ठरलाय.."

"अरेवा. साहित्य अन समाजमाध्यमं हाच ना??"

"नाही सर, मोडी लिपी अन साहित्य..."

"काल तर तू नाही म्हणत होतीस त्याला..आज अचानक काय झालं??"

"दैवी संकेत म्हणा किंवा कर्तव्यपूर्ती..."

"तुझ्या मनात काय चाललंय मला माहित नाही, पण तू योग्य निर्णयच घेशील हे मात्र नक्की..पण लक्षात ठेव, मोडी लिपीत तुला संशोधन करायचं असेल तर ती पुर्ण भाषा, तिची मुळाक्षरं शिकण्यापासून तुला सुरवात करावी लागेल. अवघड आहे हा हे.."

"सोपी कामं आवडतच नाही सर मला...काळजी करू नका, मी खूप अभ्यास करेन आणि यात यश मिळवेन.."

"यशस्वी भव.."

शुभदा कामाला लागते. पुस्तकात डोकावण्याआधी तिला पूर्ण मोडी लिपी आत्मसात करायची असते. ती एकेक मुळाक्षर शिकायला घेते, मुळाक्षरांपासून शब्द शिकते अन हळूहळू त्यांचे अर्थ जाणू लागते. इंटरनेट, वाचनालायतील पुस्तकं यांचा संदर्भ ती घेत असते. हे सगळं सुरू असतानाच दिगंबरपंत तिच्या खोलीत येतात..

"सुनबाई, कसा चाललाय अभ्यास.."

"बाबा..या.." शुभदा खुर्चीवरून उठून उभी राहते..

"अगं बस बस, चालू दे तुझा अभ्यास.."

दिगंबरपंतांचं लक्ष टेबलवर असलेल्या मोडी लिपीतील पुस्तकांकडे जातं.

"हे काय? मोडी लिपीची पुस्तकं घेऊन काय करतेय??"

"बाबा..मी मोडी लिपीतील साहित्य यावर एक संशोधन करतेय, Phd मी यात विषयात करणार आहे.."

दिगंबरपंतांना कौतुक वाटतं..

"अगं मग यातील काही पुस्तकं तुझ्या वाचनालयातही आहेत.."

"खरंच?? मी बघितलंच नाही.."

"पूर्वापार आपण जपलेलं वाङ्मय आणि पुस्तकं आपण वाचनालयात ठेवत असतो..तुला नक्कीच त्याचा फायदा होईल...आणि हो, काशीबाई..ओ काशीबाई.. सूनबाईचा नाश्ता कुठाय? अभ्यास करायला ताकद हवी की नको.."

"बाबा झालाय आत्ताच नाश्ता..."

"बरं.. आणि काहीही लागलं तर एका हाकेवर आहे मी इकडे..बरं का.."

"हो बाबा... तुम्ही आहात म्हणून काहीतरी नवीन करण्याची जिद्द आलीये माझ्यात...नाहीतर इतर मुलींसारखं संसाराच्या व्यापात, जबाबदारीत अडकून नात्यांचे गुंते सोडवण्यात आयुष्य गेलं असतं.. नशीबवान आहे मी.."


"या घराण्याची रितच आहे सुनबाई ती...लग्न करून आणलेल्या मुलीवर आपला भार न टाकता तिला नवीन ध्येय द्यायची, माप ओलांडून घरी आणायचं ते नवनवीन शिखर पादाक्रांत करायला, तिला आकाशात उंच भरारी घेऊ द्यायला, अगं लोकं लक्ष्मी म्हणून सुनेला घरी आणतात अन आल्या दिवशी हातात केरसुणी देतात...पण आपल्या घराण्यात आलेल्या लक्ष्मीला..लक्ष्मी नावाला साजेसं एक रणांगण देतात...हो पण या रणांगणात किती विजयी पताका फडकवायच्या ही मात्र आलेल्या सूनबाईची जबाबदारी..."

"बाबा...मी ही जबाबदारी कसोशीने पूर्ण करेन..."

दिगंबरपंत शुभदाला आशीर्वाद देऊन निघून जातात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे शुभदा तिच्या वाचनालयात मोडी लिपीची पुस्तकं शोधत असते. काही वेळाने तिला खूप जीर्ण झालेली, अगदी हात लावला तरी फाटेल अशी पानांची अवस्था झालेली पुस्तकं सापडतात. ती अलगद ते पुस्तकं हातात घेते..त्या पुस्तकांचा स्पर्श, त्यांचा सुगंध आणि त्यातील अक्षरं तिला ओळखीची वाटू लागतात...

3 महिने ती मोडी लिपीचा चांगला अभ्यास करते. आता तिला बऱ्यापैकी ती लिपी लिहिता आणि वाचता येऊ लागलेली असते. आता तिला ओढ लागते ती देव्हारातल्या त्या पुस्तकाचा अर्थ शोधून काढायची. पण ते पुस्तक उचलून आणलं तर सर्वजण विचारतील, देव्हाऱ्यातली वस्तू कुठे हरवली म्हणून...मग शुभदा एक दुसरं पुस्तक घेऊन हळूच त्या लाल कपड्यात ठेवते आणि आतील पुस्तक आपल्या खोलीत घेऊन येते. आधाशीपणे ती पहिलं पान वाचायला घेते...त्यात सुरवातीलाच लिहिलेलं असतं...

"माझी पहिली अक्षरं गिरवतांना माझे हात थरथरत आहेत. कारण मला जर कुणी लिहिताना पाहिलं, किंवा निदान मला लिहिता वाचता येतं हे समजलं तर कदाचित मरणालाही मला सामोरं जावं लागेल, माझा विटाळ धरण्यात येईल,पण हे पाऊल मी सर्व धोका पत्करून स्वीकारतेय. कारण माझ्या जन्मापूरता मी विचार करू शकत नाही, माझ्या येणाऱ्या प्रत्येक पिढीला मला काहीतरी सांगायचं आहे, त्यांना काहीतरी द्यायचं आहे, जेणेकरून त्यांची आयुष्य सुखी होतील.."

शुभदाच्या अंगावर काटाच उभा राहतो, साधारण 1800 च्या शतकात, ज्यावेळी स्त्रियांना शिक्षण तर सोडाच, पण मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवलं जायचं त्या स्त्रीने इतक्या हिमतीने आणि इतकी दूरदृष्टी ठेऊन हा विचार केलाय. आणि या स्त्रीला पुढच्या पिढ्यांसाठी काहीतरी सांगायचं आहे हे स्पष्ट दिसून येतंय, पण घरात मात्र त्याचा कुणालाही पत्ता नाही. देव्हाऱ्यात ठेऊन पूजा केली जातेय फक्त..कदाचित मी याचा अर्थ शोधावा म्हणून मला दैवी संकेत तर मिळाला नसावा ना??

शुभदा तिच्या विचारात गढलेली असताना काशीबाई केव्हा तिच्या समोर चहा ठेऊन जातात तिला कळतच नाही, ती जेव्हा भानावर येते तेव्हा तिचा धक्का कपाला लागुन चहा त्या पुस्तकावर सांडतो.. शुभदा खूप घाबरते, चिडते, हैराण होते.. आधीच जीर्ण झालेली पानं, त्यात चहामुळे जवळपास 15-20 पानं खराब होऊन जातात. त्यातलं काहीच वाचण्यायोग्य उरत नाही. शुभदा प्रचंड नाराज होते.स्वतःलाच ती दोष देत बसते..पानांची जुळवाजुळव केली तरी आता फक्त शेवटची काही पानं वाचण्यायोग्य राहिली होती.

देवाने मला या पुस्तकाचा अभ्यास करण्याचा संकेत दिला, अन त्यानेच असं का करावं?? मला मार्ग त्याने दाखवला अन अडथळाही त्यानेच का आणावा?

या सगळ्या विचारात असताना तिला रुद्रशंकर गुरुजींचा फोन येतो. जुजबी चौकशीत त्यांच्या लक्षात येतं की शुभदा कशामुळे तरी नाराज आहे..ते तिला एकच सांगतात..

"घडणारी प्रत्येक गोष्ट विधिलिखित असते, आणि आलेल्या अडचणी या पुढील पाऊल काय उचलावं याचा संकेत देणारी असतात.."

क्रमशः

...
--------------------------------------
घराणं भाग 7

शुभदा खूप नाराज होते, पुस्तकावर चहा सांडल्याने त्याची बरीचशी पानं खराब होऊन वाचता न येण्यासारखी झालेली होती.

घरात शुभदा जशी पुस्तकाच्या शोधासाठी भारावून गेलेली तसंच रश्मी तिच्या स्पर्धेसाठी तयारी करत होती, मीनल तिच्या नव्या प्रदर्शनासाठी चित्र बनवत होती, मेघना वाढलेल्या व्यापाचे व्यवस्थापन करत होती. ऋग्वेदची बहीण वीणा, जी शिक्षणाकरिता बाहेरगावी होती ती सुट्ट्या असल्याने काही दिवस घरी आली होती.


शुभदाने तर त्या पुस्तकाचा शोध जवळ जवळ सोडूनच दिला होता, इतक्या उत्साहाने तिने हे काम सुरू केलेलं आणि सुरवातीलाच नकारात्मक संकेत मिळाला. वीणा एक हुशार मुलगी होती, आर्टिटेक्ट चं शिक्षण घेण्यासाठी ती बाहेरगावी शिकत होती. नवीन वाहिणीसोबत किती गप्पा मारू अन किती नको असं तिला झालेलं. वीणा खूप बोलकी होती, दोघींमध्ये राजकारण, टेक्नॉलॉजी वर बऱ्याच चर्चा झाल्या. शुभदाही काही क्षणभर तिचं दुःख विसरून वीणाच्या गप्पात गुंतली होती.

गप्पा झाल्यावर सर्वजण जेऊन आपापल्या खोलीत गेले. शुभदाने टेबलवर ते पुस्तक पाहिलं, आता हे इथे ठेऊन उपयोग नाही, देवघरात पुन्हा त्याच्या जागेवर ठेवावं असा विचार तिच्या मनात आला. तिने ते पुस्तक उचललं आणि आजूबाजूला कुणीही नाही हे बघतच देवघरात गेली. लाल कपड्यातील ते जुनं पुस्तक काढून तिने हातातलं पुस्तक पुन्हा त्यात गुंडाळून ठेवलं, खिन्न मनाने ती परतत असताना रेखाने तिला पाहिलं, शुभदा घाबरली..

"शुभदा...हे काय करत होतीस??"

"मी?? काही नाही.."

"मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय, लाल कपड्यातील ती वस्तू तू काढत होतीस.."

"नाही ओ... मी...ते..आपलं.."

आवाज ऐकून घरातले सर्वजण धावत येतात,

"काय झालं? कसला आवाज आहे??"

दिगंबरपंत विचारतात..

"ही तुमची सून शुभदा...देव्हाऱ्यात असलेल्या त्या वस्तूला हात लावायचा नाही असं बजावून सांगितलं असताना तिने ते उघडून पहायची हिम्मत केली.."

"रेखा...ही बोलण्याची पध्दत नाही, आपल्या घराण्यात सुनेला ही अशी वाक्य ऐकवणं म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचा अपमान...पुन्हा असं करू नकोस..आणि शुभदा, काय आहे ते खरं सांग.."


"आजोबा...अहो वहिनीला काय बोलताय, मीच तिला सांगितलेलं, की देवघरात काडीपेटी आहे ती घेऊन ये.."

"काडीपेटी कशाला हवीय तुला वीणा??"

"आजोबा, अहो किती थंडी आहे बाहेर...वहिनीला म्हटलं आपण शेकोटी पेटवू, माचीस सापडेना..म्हणून वहिनीला म्हटलं.."

"वहिनीला कामं सांगतेस? तुझं तूच घ्यायचं की.."

"मी ते सरपण आणत होती ना..म्हणून.."

विणा अत्यंत निरागसपणे सगळं सांगत होती, तिचं ते बाळबोध बोलणं बघून सर्वांना हसू आलं..

"रेखा. ऐकलस?? आता तरी खात्री पटली ना?? चला, आपापल्या कामाला लागा आता.."

रेखाला स्पष्ट दिसलेलं असतं की शुभदा त्या लाल कपड्यातील वस्तू बाहेर काढतेय, पण आता जास्त वाद घालण्यात अर्थ नाही म्हणून तीही शांत बसते. या घटनेने मात्र रेखाच्या मनात शुभदा बद्दल राग निर्माण होतो.

शुभदा मात्र विचारात पडते, वीणा का खोटं बोलली? का वाचवलं असेल तिने मला??

"वहिनी..आत येऊ??"

वीणा शुभदाच्या खोलीबाहेर येऊन विचारते..

"विचारते काय, ये.."

"चला, शेकोटी करायला.."

"वीणा.. तू मला का वाचवलं हेच समजत नाहीये..तुला माहीत होतं ना की मी त्या लाल कपड्यातली वस्तूच काढत होते म्हणून..."

"वहिनी.. आपण गप्पा मारत होतो तेव्हा तुझ्या टेबलवर मला ते पुस्तक दिसलं आणि तेव्हाच मला लक्षात आलं..की तू त्याचा अर्थ शोधतेय म्हणून.."

"म्हणजे, तुलाही माहितीये??"

"हो...अरुंधती आजी शेवटच्या दिवसात हेच पुस्तक धरून बसलेली...पण त्या दिवसात असं काही झालं की सर्वांनी या पुस्तकालाच दोषी धरलं...मीच होते तेव्हा आजीजवळ.."

"वीणा... ही गोष्ट फक्त तुला, मला आणि ऋग्वेद ला माहितीये... माझ्या हातून एक मोठी चूक झालीये..त्या पुस्तकाच्या पानांवर माझ्याकडून चहा सांडला गेलाय..."


"वहिनी...तुला म्हणून सांगते, अरुंधती आजी सांगायची...या पुस्तकाचा अर्थ घराण्यात येणारी एखादी मुलगीच शोधून काढेल असं शेवटच्या दिवसात बरळायची...मी गंभीरपणे त्याला ऐकलं नाही पण आज हे सगळं पाहून माझा विश्वास बसला...जाणारा माणूस कधीच खोटं बोलत नसतो.."

"पण आता पानच नाहीत तर.."

"वहिनी...आम्ही कॉलेजमध्ये वेगवेगळ्या साईट्सला भेट देतो..अश्याच एका ऐतिहासिक वस्तूला भेट दिल्यावर तिथे एका ठिकाणी आम्ही थांबलेलो..तिथे एक भाट होते...त्यांनी त्या वास्तूचा इतिहास सांगितला..आणि राजस्थान सारख्या राज्यात सुद्धा आपलं रत्नपारखी कुटुंब अस्तित्वात होतं हे मला समजलं.."

"काय?? आपले पूर्वज राजस्थान मध्ये??"

"होय...त्यांनी पूर्ण इतिहास सांगितला...त्यातलं थोडक्यात तुला सांगते..त्याकाळात स्त्री शिक्षणाचे वारे वाहू लागलेले.. राजस्थान मध्ये असलेल्या त्या ठिकाणी आपलं घराणं असंच प्रसिध्द होतं...पण घराण्याचे नियम मात्र त्या काळात समाजाला रुचले नाही, लोकं नावं ठेऊ लागली..घराण्यात एका सुनेला त्या काळात चक्क शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवलेलं म्हणे, तेव्हापासून तर घराण्याला एकदम वाळीत टाकलं होतं, मग सर्वजण राजस्थान सोडून इथे आले..."

"बापरे... किती धीरोदात्त होते आपले पूर्वज...हे ऐकून अंगावर काटाच आला बघ, अगं आजच्या काळात जिथे मुलींनाही बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवत नाही, तेव्हा तर किती भयानक परिस्थिती असेल..आणि त्यातही रत्नपारखी घराण्याने सुनेला बाहेरगावी पाठवलं म्हणजे...खरंच, मानलं पाहिजे..."


"वहिनी, आपले पूर्वज खुप उच्च विचारांचे होते, पण ते सगळं या पुस्तकाभोवती फिरत होतं.. मला वाटतं की काही पिढया अगोदर या पुस्तकाचं वाचन आणि अंमल होत असावा...आपल्याच पिढीत ते मागे पडलं असावं...आणि म्हणून अरुंधती आजी मला सारखं हे पुस्तक वाच म्हणून सांगत होती.."

"मग तू ते पाहिलंस??"

"हो..पण वेगळीच भाषा होती त्यात...काहीच समजेना..मग आजीचं असं झालं, आणि मी बाहेरगावी गेली..."

"मोडी लिपी आहे त्यात..मी ती भाषा गेल्या काही दिवसात शिकलीये..पुस्तकाचा पहिला पॅरा सुद्धा मी मराठीत अनुवादित केला पण..."

"वहिनी, होईल सगळं नीट..काहीतरी मार्ग सापडेल..उगाच नाही इथवर सर्व जुळून आलं.."

"तसंच असावं...आणि थँक्स, मला वाचवल्याबद्दल.."

वीणा मिश्किल हसत निघून गेली. शुभदाला माने सरांचा फोन आला..

"शुभदा, कुठवर आलंय भाषांतर??"

"सर..ते..." शुभदाला काय बोलावं समजत नव्हतं..

"बरं एक काम कर, कॉलेजमध्ये भेट...समोरासमोर बोलू.."

शुभदा नाराजीनेच कॉलेजमध्ये जाते, सरांना आता परत सांगावं लागणार की विषय बदलला आहे..मोडी लिपीत आता काही रस नाही म्हणून..आपलं असं सतत निर्णय बदलणं सरांना आवडणार नाही हेही ती ओळखून होती पण नाईलाज होता.

शुभदा स्टाफ रूम मध्ये जाते.. माने सर वर्गात गेलेले असतात, त्यांचा तास संपायला 10 मिनिटे बाकी असतात. ती बाजूला असलेल्या खुर्चीवर बसून वाट बघते..सरांच्या टेबलवर सरांनी मागे एकदा दाखवलेले ते रिसर्च पेपर ठेवलेले असतात. ती ते चाळत बसते. इतक्यात माने सर येतात...ती पेपर खाली ठेऊन देते..

"मग..मोडी लिपीचा चांगला अभ्यास झालेला दिसतोय.."

"नाही...सर..ते..."

"काय झालं?? अवघड वाटतयं? अगं पण तुला सोपी कामं आवडतच नाही ना..हा हा.."

सर बोलत असताना तिचं लक्ष परत त्या टेबलवर असलेल्या पेपर कडे जातं, जुनं मोडी लिपीत असलेले पेपर तिला दिसतात अन त्यातली अक्षरं तिला ओळखीची वाटतात..ती ते हातात घेते, सुरवातीचे अक्षरं वाचते अन ताडकन उभी राहते..

"काय गं काय झालं?? आणि विषय बदलतेय ना??"

"शक्यच नाही सर.. आता तर अजिबात नाही.."

शुभदा आनंदाने घरात येते अन आल्या आल्या वीणाला मिठी मारते..

"वहिनी, अगं काय झालं??"

"अगं हे बघ...काय आहे.."

"भाषा समजत नाहीये..आणि किती जीर्ण झालेले पेपर आहेत.."

"अगं त्याच्या खाली त्याचं भाषांतर आहे..हे आपल्या देव्हाऱ्यात असलेल्या पुस्तकाचंच भाषांतर आहे.."

"पुर्ण??"

"नाही...सुरवातीचं.."

"किती पानं??"

"20.."

"आणि चहा किती पानांवर सांडला??"

"20.." शुभदा बोलता बोलता एकदम सुन्न होतें... काय दैवी चमत्कार आहे हा...माझं काम वाचावं म्हणून त्यावर काय सांडावा.. कॉलेजमध्ये सरांनी मला काय बोलवावं अन ते पेपर तिथेच काय दिसावे..देवा.. तू खरंच कमाल आहेस.."

"वहिनी...तुला भाषांतर मिळालं म्हणून तू खुश आहेस, पण आपलं गूढ पुस्तक कुणाच्या हाती लागलं असेल??"

"मलाही हीच शंका होती, पण माने सर एकदा म्हणाले होते, हे कॉलेज 1800 च्या शतकातील.. आपल्या मागच्या अनेक पिढ्या इथे शिकून गेल्या.."

"म्हणजे, त्या दिव्य स्त्रीने हे पुस्तक लिहिल्यानंतर कुना एक पिढीतील एका सुनेकडून पुस्तकाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न झाला होता?? कोण असावी ती??

"राजस्थान मधून ज्या सुनेला शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवलं... ती तर नसेल??"

क्रमशः
--------------------------------------
घराणं (भाग 8)

शुभदाला हे समजतं की पुस्तकाची उकल करणारी ती एकटी नव्हती, अजून कुणीतरी घराण्यात होऊन गेलेलं जिने याचा छडा लावायचा प्रयत्न केलेला. पुस्तकाला समजण्यासोबतच आधी आपल्या घराण्याची वंशावळ समजून घेणं तिला महत्वाचं वाटलं. दिगंबरपंत त्यांच्या आजी इतपत सांगू शकत होते पण त्या आधी कोण होतं? ती दिव्य स्त्री कोण होती जिने पुस्तक लिहिलेलं??

शुभदा आणि वीणा दोघीजणी मिळून यावर तोडगा काढतात. त्यांच्या ओळखीतले भाट, राजशेखर.. यांना जाऊन भेटतात. त्यांनी पूर्ण वंशावळ सांगितली..अगदी राजस्थान मध्ये असलेले त्यांचे वंशजही सांगितले..ते पुढीलप्रमाणे..


"माझ्याकडे 1853 सालापासून नोंद आहे, म्हणजे बघा..जगदीशपंत यांचा जन्म 1853 चा, त्यांच्या विसाव्या वर्षी त्यांना 1873 मध्ये मुलगा झाला तो पांडुरंग.. पांडुरंग ची बायको मीरा..त्यांना 3 मुली अन 1 मुलगा, मुलगा लीलाधर,जन्म 1892 मधला.. त्याची बायको यमुनाबाई, लीलाधर ला 2 मुलं.. मोठा मुरलीधर.1915 सालातला...त्याची बायको सूनयना.. त्यांना 4 मुलं, मोठा जगन्नाथ 1940 मधला... जगन्नाथ म्हणजे दिगंबरपंतांचे वडील..आणि दिगंबरपंतांचा जन्म 1960 चा..

"बापरे.. अगं वहिनी इतकी मोठी वंशावळ आहे...कशी पाठ करणार??"

"ट्री डायग्राम काढून लक्षात राहील.."

"पण तुम्हाला का इतकी माहिती हवीय?? आजकाल आपल्या पुर्वजांशी कुणाला घेणं नसतं, पण तुम्हाला मात्र फारच उत्सुकता दिसतेय.."

"त्याला कारणही तसंच आहे, थोडक्यात सांगायचं झालं तर..कुना एका स्त्रीची आम्हाला ओळख पटवायची आहे..."

"वहिनी, पुस्तकावर सालाचा उल्लेख असेल ना??"

"हो..1880 सालाचा उल्लेख होता.."

"म्हणजे तो काळ जगदीशपंतांचा.."

"1888, म्हणजे जगदीश पंतांचा जन्म 1853 चा, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांना मुलगा झाला, म्हणजे 1872 मध्ये..त्यांचं लग्न 1871 मध्ये झालं असावं, आणि 1888 मध्ये त्यांची मुलं 18-20 वर्षाची असतील.."

"बरोबर..त्याच काळात हे पुस्तक लिहिले गेले आहे..त्या स्त्रीची मुलं तरुण होती...अश्या काळात तिने हे सगळं लिहिलं होतं..सापडली, ती दिव्य स्त्री सापडली... हीच ती.."


"राजशेखर गुरुजी...जगदीशपंतांच्या बायकोचं नाव सांगा.."


राजशेखर त्यांच्या रजिस्टर मध्ये नाव वाचण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना काही केल्या ते नीट दिसेना..

"काय झालं गुरुजी??"

"हे नाव बघा, किती अस्पष्ट आहे..असं वाटतंय की नाव लिहिताना झटापट झाली असावी.."

"असू शकतं, त्या काळात स्त्रियांना एक तर समोर येणं मुश्कील होतं, त्यात बायकोचं नाव विचारून लिहिणं म्हणजे... "

"पण तरीही इथे तोडकं मोडकं लिहिलं गेलंय.. बघा तुम्हाला वाचता येतंय का??"

शुभदा ते वाचायला घेते, वाचून ती एकदम स्तब्ध होते, तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं..

"शुभदा काय झालं??"

"अगं हे अक्षर, मोडी लिपीचा अभ्यास अन पुस्तकांचं भाषांतर करून चांगलंच परिचित झालंय माझं.."

"काय नाव आहे त्यांचं??"

"दुर्गावती देवी.."

शुभदाला क्षणभर असं वाटलं की ती स्वतःचच नाव सांगतेय..

"दुर्गावती देवी.. नावातच किती वजन आहे...हो ना??"

"खरंच, कमीत कमी नावापर्यंत पोहोचलो आपण...आता पुस्तकाचा अभ्यास.."

शुभदा पुन्हा एकदा कामाला लागते. कॉलेजमधून आणलेले ते पेपर ती वाचायला घेते. पहिले 20 पान अनुवादित असतात. ते ती वाचायला घेते..


"पांडुरंग कधी मोठा झाला समजलंच नाही, लहानपणी नुसता माई माई म्हणून चिटकून असायचा..आता मात्र स्वतःच्या आईलाच कुणी बाहेरचं आलं की आत जायला सांगतो..मुलं मोठी झाली..त्याच्या आईवर नियंत्रण करू पाहतोय.. त्याला म्हणा नियंत्रित करायचंच असेल तर त्या इंग्रजांना कर..राज्य करताय आपल्यावर...त्याला कितीदा सांगायचा प्रयत्न केला मी..अरे जा, त्या रानडेंच्या सभेला जा..टिळकांना सामील हो नाहीतर गांधीच्या चळवळीत तरी जा..पण नाही, याला फक्त आपलं घर अन आपली सोय . देशाबद्दल आपलं कर्तव्य असावं की नाही माणसाचं?? काय करणार, तोंड कुठेय मला..पुरुषी सत्ता..पण माझ्या लेकरांनो, म्हणजेच... जर माझे हे शब्द पुढे पोहोचलेच..तर कायम लक्षात असुद्या.. घरातल्या स्त्रीला कधीही दुखवू नका..आलेल्या सुनेला मान द्या, स्वातंत्र्य द्या...हा माझा हुकूम समजा..."

रानडे, टिळक, गांधी याच शतकातले, त्यांचा उल्लेख बरोबर दुर्गावतीच्या लिखाणात झाला होता. स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक दुर्गावतीला सलतच होती..पण हाच वारसा आपल्या पिढीने चालवू नये म्हणून दुर्गावती मनापासून प्रयत्न करत होती.

"जो कुणी माझं हे वाचत असेल त्याला प्रश्न पडला असेल ना की मला लिहिता वाचता कसं येतंय? माझे वडील शिक्षक होते, घरी शिकवण्याही घ्यायचे. इंग्रजांनी पूर्ण अभ्यासक्रम बदलून टाकला होता, वेद, पुराण यांचं शिक्षण हद्दपार केलं होतं. पण वडिलांना हे अजिबात पटत नव्हतं, त्यामुळे खाजगी शिकवणीत आबा हेही शिकवत असायचे. आबा शिकवत असताना मी गपचूप मागून पाटी पेन्सिल घेऊन बसायचे अन आबांची शिकवणी अभ्यासायची..कुणाला समजू द्यायचं कामच नव्हतं. आई तर हात धुवून लग्नासाठी मागे लागलेली. घरातली कामं शिकवत शिकवत तिच्या नाकी नऊ आलेले..मीही सगळी कामं शिकून घेतली पण मुलांप्रमाणे मलाही शिक्षण हवं असं कोणत्या तोंडाने सांगणार मी? मागे एकदा मी सहज विषय काढला तेव्हा आबा खूप रागावले. धर्म भ्रष्ट करायला निघालीये म्हणून आरोप लावले, पण मी काही जिद्द सोडली नव्हती. म्हणूनच आज थोडंफार लिहता वाचता येत आहे. पण ही गोष्ट कुणालाही माहीत नाही, पद्मिनी सोडून...पद्मिनी माझी बालमैत्रीण. आम्ही एकत्रच वाढलो, नशिबाने लग्नही एकाच गावात झालं आणि आम्ही शेजारीणी बनलो. कुटुंबाचं करताना, संसाराचे चटके अनुभवताना एकमेकांकडे आम्ही मन मोकळं करत असू...पद्मिनी दुसऱ्या समाजाची.. जगाच्या भाषेत बोलायचं झालं तर खालच्या जातीतली.. पण मैत्रीत कसली आलीय जातपात??"


जवळपास 10 पानं वाचून झाली, शुभदा आता दुर्गावतीला बऱ्यापैकी ओळखू लागली, या स्त्रीचं जीवन कसं होतं, किती खडतर प्रवास होता तिचा हे समजू लागलं. त्यात पुढे लिहिलं होतं..

"आम्ही सर्व जावा मसाला कांडायला जमलो आहोत, खरं तर ही एक स्पर्धाच असते, मोठमोठ्या दगडी खलबत्त्यात जड अश्या मुसळीने लाल मिरच्या कांडायच्या, आम्हा जावा जावात स्पर्धा असते, कोण जास्त मिरच्या कांडतय याची.. कारण सासू समोर असते अन प्रत्येकीला आपली छाप पाडायची असते. मग सकाळी सकाळी चांगली न्याहारी करून अन पेलाभर हळदीचं दूध पिऊन आम्ही सर्वजणी एकत्र येतो अन कामाला लागतो. सासू समोर बसून प्रत्येकीला मिरच्या वाटून देत असे, एकीची संपली की दुसरीला.. मग सासूच्या बरोबर लक्षात येई की कोणी किती काम केलंय याची. पण दरवेळी नेहमी मीच जिंकते. एक गुपित आहे त्याचं. आबांनी मुलांना सूर्यनमस्कार शिकवले होते, मीही ते शिकून घेतले आणि पहाटे लवकर उठून स्वयंपाकघरात जाऊन करत होते, सर्वजण तेव्हा झोपलेले असत. ही कसरत करून पूर्ण दिवस असा छान जायचा ना. अन त्यामुळेच ताकद आली खरं मला, मी अशी किडकिडीत, पण कामं मात्र चुटकीसरशी होत असायची माझी.."

शुभदाला एकेक पान वाचून खूप गम्मत वाटू लागलेली. त्या काळात स्त्रियांमध्ये स्पर्धा कसली? तर कोण जास्त मिरच्या कांडून बारीक करतं याची. आज प्रत्येक बाईला व्यायाम सांगितला जातो तरी बायका आळशीपणा करतात, अन तेव्हा? बायकांना असं व्यायाम करताना कुणी पाहिलं तर काय होईल? या भीतीने दुर्गावती कशी लपूनछपून व्यायाम करायची..आणि समोर सासूबाईंना जज म्हणून ठेवलेलं.. खरंच, गम्मत होती त्या काळातही..

दारावरची बेल वाजली, शुभदाने ऑनलाइन काही वस्तू मागवल्या होत्या, बहुतेक त्याच असतील म्हणून ती स्वतः दार उघडायला गेली. पण दारात दुसरंच कुणीतरी होतं..

"नमस्कार, मी रश्मीला भेटायला आलोय.."

"या आत या.."

रश्मी बाहेर येते..

"या पाटील सर...आज चक्क घरी??"

"हो..कामच तसं होतं.."

"शुभदा हे माझे फिटनेस आणि बॅडमिंटन कोच..पाटील सर.."

"ओह अच्छा.. नमस्कार सर.."

"रश्मी पुढच्या महिन्यात ज्या स्पर्धा आहेत त्यासाठी तुला फिटनेस टेस्ट द्यावी लागेल, माहितीये ना तुला??"

"हो सर..काळजी करू नका..माझी तीही तयारी झालीये.."

"नाही रश्मी..परवा आपण जी टेस्ट घेतली त्यात कुठेच तू बसत नाहीये...तुझा स्टॅमिना खूप कमी झालाय.. आहार वगैरे बदललाय का??"

"नाही सर..असं कसं होऊ शकतं??"

"काळजी घ्यावी लागेल रश्मी..कारण हीच टेस्ट जर हातातून गेली तर सगळी मेहनत वाया जाईल..भेटू आपण उद्या, मी येतो."

शुभदा सगळं बघत असते, रश्मी मटकन सोफ्यावर बसून घेते अन तोंडावर हात ठेवून काळजीत पडते..

"रश्मी, होईल सगळं नीट.."

"शुभदा कसं गं... इतकं सगळं करूनही जर फिटनेस मध्ये मी बसत नाही तर...तर काय होईल माझं??"

शुभदा विचार करते..

"रश्मी, एक सुचवू??"

"काय..."

"हे बघ, म्हणजे मला खेळाबद्दल आणि फिटनेस बद्दल फारसं काही माहिती नाही पण एक व्यायाम अजून ऍड कर तुझ्या रुटीन मध्ये...तुला फायदा होईल बघ.."

"कुठला??"

"सूर्यनमस्कार.."

"सूर्यनमस्कार??"

"हो..आपले पूर्वज करायचे, आजही केले जातात पण त्याचे फायदे फार कमी लोकांना माहितीये..पूर्वजांनी आपल्यासाठी सांगून ठेवलंय सगळं...त्यांची एखादी गोष्ट ऐकायला काय हरकत आहे??"

"तू म्हणत असशील तर. करूया हेही..."

"नक्की?? उद्यापासून मीही तुला जॉईन..."

"Done"

दुर्गावतीने हे सगळं रश्मीसाठीच राखून ठेवलंय की काय असं शुभदाला वाटू लागतं अन स्वतःशीच हसू येतं..ती पुन्हा त्या लिखानाकडे वळते, अनुवादित केलेलं सगळं संपतं.. आता पुन्हा देव्हाऱ्यात जाऊन ते पुस्तक आणावं लागणार होतं आणि पुढचा भाग वाचवा लागणार होता. शुभदाने यावेळी मोठ्या सावधगिरीने ते पुस्तक पुन्हा स्वतःकडे आणलं, ती पानं चाळू लागली...

"20 पानांचा अनुवाद या पेपर्स वर आहे, आता पुढचं पुस्तकात पाहावं लागेल...बघू तर जरा...हे काय?? पुढे फक्त 5 पानं?? पुस्तक इथेच संपतं?? कसं शक्य आहे??"

शुभदा शेवटची पानं वाचायला घेते..शेवटच्या पानात अपूर्ण संदर्भ असतो..

"म्हणजे?? हा पुस्तकाचा अर्धाच भाग आहे..अर्धं पुस्तक कुठेय??"

शुभदा नीट बघते तेव्हा तिच्या लक्षात येतं, पुस्तका सोबत झटापट झालेली असावी..अर्धा भाग इथे आपण सांभाळलाय, पण अर्धा भाग?? कुणाकडे असेल?? तो जपून ठेवला गेला असेल?? कुठे मिळवावा लागेल आता तो??

क्रमशः
--------------------------------------
घराणं भाग 9

एक संपलं की दुसरं संकट शुभदा समोर दत्त म्हणून उभं राही. पुस्तकाच्या अनुवादाला सुरवात होत नाही तोच त्याचा अर्धा भाग गायब होतो. पण जेवढा भाग झाला आहे तेवढ्या भागात मात्र शुभदाला बऱ्यापैकी दुर्गावती देवीबद्दल समजलं होतं. दुर्गावती देवीचं जीवन, त्यांची आपल्या पुढील पिढीबाबत असलेली तळमळ, त्यांच्या वाट्याला जे भोग आले ते पुढच्या स्त्रियांना येऊ नये म्हणून दिलेल्या सूचना..हे खूपच अद्वितीय होतं. त्या पुस्तकाचा अभ्यास पुढील 2-3 पिढ्यांपर्यंत झाला असावा. त्यामुळेच रत्नपारखी घराण्यात स्त्रियांना उच्च सन्मान मिळत होता अन घरण्याचं नाव सर्वदूर पसरलं होतं. पण केवळ अरुंधतीच्या जाण्याने पुस्तकाला बंदिस्त करण्यात आलेलं. कदाचित पुढील कित्येक पिढ्या ते बंदीस्तच राहिलं असतं पण ऋणानुबंध म्हणा किंवा दैवी अविष्कार, शुभदा सारखी स्त्री त्या घराण्यात जाऊन मिळाली जी या पुस्तकाची उकल करेल.

"दिगंबरपंत.. यावेळीही तुमच्या सुनेचं म्हणजेच मीनल चं चित्र प्रदर्शन पुण्यात भरवणार आहोत, यावेळी दिग्गज लोकं येणारेत, मागच्या वेळी लाखोंच्या घरात चित्रांचा लिलाव झाला, यावेळी त्या त्याहून जास्त होईल.."

"कौतुकच आहे आमच्या सूनबाईंचं आम्हाला, त्याही जोरदार तयारीला लागल्या आहेत.."

आर्ट अकादमीचे कार्यकारी अधिकारी दिगंबरपंतांकडे आले होते, मिनलच्या चित्रांसाठी...


"दिगंबरपंत.. एक विनंती आहे, तुमच्या घराण्याचं नाव सर्वदूर पसरलं आहे, तर प्रदर्शनात तुम्हा पूर्ण कुटुंबाचं एकत्र असलेलं पेंटिंग आम्ही मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावणार आहोत..तर तुमच्या सूनबाईला तेवढं एक पेंटिंग बनवायला लावा.."

"चालेल की...होईल ना मीनल??"

मिनलला ज्याची भीती होती तेच झालं, आजवर संपुर्ण कुटुंबाचं एकत्र चित्र तिला बनवताच आलं नव्हतं.. आणि आज अशी मागणी आलीय म्हटल्यावर...तिने फक्त मान डोलावली..

शुभदाला मीनलची घालमेल समजते,

"मीनल..कुठे अडचण येतेय तुला नक्की??"

"शुभदा अगं समजतच नाहीये बघ, मी आजवर इतकी अवघड चित्र काढलीये, सगळी जमली बघ, पण कुटुंबाचं एकत्रित असं पेंटिंग मला जमलंच नाही बघ.. किती प्रयत्न केले, कुणाचा श्राप आहे काय माहिती.."

शुभदाला ही गोष्ट विचित्र वाटली, कारण मीनल हाडाची चित्रकार होती, चित्र जमणार नाही असं शक्यच नव्हतं.. मग का असं व्हावं?? तिने बोललेला एक शब्द मात्र तिला खटकू लागला.."श्राप"...

"श्राप वगैरे काय गं.. असं थोडीच असतं.."

"तू मानणार नाहीस, पण कुठलीही कला म्हणजे सरस्वतीचा वरदहस्त असते, कर्णाची गोष्ट माहितीये ना? ऐनवेळी तुझं ज्ञान तू विसरशील असा श्राप दिला गेला होता त्याला. एखाद्या लेखकाला अचानक काहीतरी स्फुरतं.. अगदी अचानक, न ठरवता..एखाद्या चित्रकाराच्या मनातून अवचित काही रंग मिसळले जातात.. अगदी अनपेक्षित..एखाद्या गायकाचा मधूनच एखादा सुरेल ताल बसतो..अगदी नवीन... कुठून येतं हे?? हाच तो, दैवी स्पर्श.. त्याला जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडून करवून घ्यायची असते तेव्हा तो हळूच कानात फुंकर मारतो..आणि अवचितपणे या गोष्टी आपल्या हातातून घडत जातात..अगदी नकळत..जगातली काही नुसत्या रेघोट्या ओढलेली चित्र कोट्यवधी किमतीत का विकली जातात? ती चित्र समजणारी नजर तशी असते, चित्रकार काही गूढ घटना, काही चमत्कारिक गोष्टी त्यात चितरतो..अन त्या चित्रकाराच्या दैवी प्रतिभेचं मोल जेव्हा केलं जातं तेव्हा ते मानवी आवाक्याच्या बाहेर असतं..."

शुभदा मिनलचा एकेक शब्द मनात साठवत असते, मितभाषी अश्या मीनलचं नवीनच रूप तिला दिसून येतं. खरंच, दिगंबरपंतांनी तोलून मापून एकेक स्रीरत्न घरात आणलंय याचं तिला पुन्हा कौतुक वाटतं. रश्मीची मेहनत, मीनलची कलात्मक वृत्ती, सासू मेघनाचं धैर्य आणि मोठ्या सासूबाई जानकीची दूरदृष्टी.. या सगळ्यांसमोर आपण फिके आहोत असं तिला वाटू लागतं. प्रत्येक घरात स्त्रियांमध्ये एकमेकींबद्दल ईर्षा निर्माण होते, पण या घरात ईर्षा होती ती महत्वाकांक्षेची.. विजिगिशु वृत्तीची..


"शुभदा, सासरी गेलीस अन आम्हाला विसरलीच तू..माहेरी ये की काही दिवस...तेवढंच तुला आराम.."


"अगं हे घर म्हणजे स्वर्ग आहे, माहेर अन सासर..दोन्ही गोष्टी वेगळ्या असतात हे ध्यानीमनीही नाही माझ्या.."

"अगबाई, फारच मुरलेल्या दिसताय संसारात...चांगलं आहे, तरीही ये..आमच्यासाठी??"

शुभदा विचार करते, पुस्तकाच्या शोधात शुभदाची खूप मानसिक स्थित्यंतरं झालेली..पराकोटीचा आनंद अन पराकोटीची निराशा हे दोन्ही तिने अनुभवलं होतं.. पुस्तकाचा शोध चालूच ठेवायचा, पण त्या आधी मनाला ताजतवानं करून पुन्हा नव्या उमेदीने शोध सुरू करावा असं तिला वाटू लागतं आणि ती तयार होते..

ऋग्वेद, दिगंबरपंत आणि बाकी सर्वांना निरोप देऊन शुभदा माहेरी पोचते..इतकी वर्षे माहेरी राहूनही तिला घर आता परकं वाटत होतं. हेच तर वरदान आहे स्त्रियांना, जिथे जातील तिथे एकरूप होऊन जातील.

आईशी गप्पा झाल्या, सासरचं कौतुक करून झालं, आईला लेकीचं सुख किती ऐकू अन किती नको असं झालेलं. नंतर आईला अचानक काहीतरी आठवलं,

"अगं रुद्रशंकर गुरुजींनी तुला जी पेटी दिली होती ती उघडून पाहिलिस??"

"अरे देवा...बघ मीपण, घाईगडबडीत मी अगदी विसरून गेलेले.."

"मला वाटलं एव्हाना उघडून पाहिलं असशील..काय असेल पण त्यात??"

"मलाही माहीत नाही, अगं त्याला कुलूप आहे छोटसं, आणि त्याची चावीही नाही कुणाकडे..मग काय, फोडावंच लागेल ते.."

"बरं आता सासरी गेलीस की तोड ते.."

शुभदाला अचानक आठवण येते, पुस्तकाचा दुसरा भाग तर नसेल ना त्यात?? शुभदा घरातल्या नोकर गडीला सासरी पाठवून ती पेटी माहेरी मागवून घेते. पेटी आणताच लगेच तिची आई आणि ती ते कुलुप तोडतात..आत एक जाडजूड अशी दुर्गा मातेची फ्रेम असते. फोटो अन त्याला केलेली फ्रेम बरीच जुनी असल्याची दिसून येत होती.

"अगं आपल्या कुलदेवतेचा फोटो आहे हा...बहुदा आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जपून ठेवलाय..."

"पण मग तो आपल्याजवळ न राहता रुद्रशंकर गुरुजींकडे कसा??"

"एक मिनिट शुभदा, मला त्या गुरुजींची वाक्य आठवताय..नारायनकर आणि रत्नपारखी घराणं जेव्हा एक होईल तेव्हा घराण्यात एक दिव्य कार्य घडेल असं त्यांनी सांगितलं होतं .. कदाचित नियती या दोन्ही घराण्यांची एक व्हायची वाट बघत होती, आणि गुरुजींना त्यांच्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे योग्य वेळेस हे आपल्याकडे सुपूर्द करायचं असं सांगितलं होतं.."

"जय दुर्गामाते...जय अंबाबाई.."

95 वर्षाची म्हातारी एकदम घरात येते..

"निर्मल आजी... एकटी कशी आलीस?? मुलगा कुठेय??"

"आता शेवटच्या घटका मोजतेय बाई, मुलाला तरी किती दिवस ओझं बनणार...अन तुझ्या हातात जे आहे ना, सांभाळून ठेव बरं.. नुसती दुर्गा नाही ही, आपल्या यशाचा मार्ग आहे त्यामागे..."

"धडधाकट आहात आजी तुम्ही...आपल्याला शतक पूर्ण करायचं आहे लक्षात आहे ना??"

निर्मल आजी म्हणजे शुभदाची नात्यातलीच एक आजी..आजीकडे प्रचंड अनुभव होता.. जीवनाचा, माणसांचा, दुनियेचा... आजीला गोष्टी सांगायला फार आवडत..मग आजी आपल्या नातवांना वेगवेगळ्या गोष्टी सांगत असे. नातवांना ही आजी गोष्टींमुळे खूप आवडायची. निर्मल आजी इतकं वय असूनही एकदम टवटवीत वाटायची. चालण्यात, बोलण्यात एक रुबाब होता. काठीही अशी टेकायची जणू समोर आलेल्याला आव्हानच देतेय की काय..शुभदाकडे आजीचं येणं जाणं असायचं नेहमी.

"नाही गं बाई, देव आपल्या कडून ठरवून दिलेल्या गोष्टी करवून घेतो, अन त्या गोष्टी पूर्ण झाल्या की बरोबर आपल्याला घ्यायला येतो बघ.."

"आजी तुम्ही तर इतकं सगळं केलंय सगळ्यांचं.. "

"राहिलं असेल एखादं काम माझ्याकडून, ते झालं की दुसऱ्या मिनिटाला घ्यायला येईल बघ तो.."

"आजी तुपन ना..बरं ये बस, आज कोणती गोष्ट सांगणार??"

"आज ना...तुला एक गोष्ट सांगणार आहे.."

"सांगा की.."

"खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, दोन जिवलग मैत्रिणी अगदी शेजारी शेजारी राहत असत. सोबतच लग्न झाली अन सोबतच मुलं झाली. पहिलीचा मुलगा पांडुरंग अन दुसरीची मुलगी कांता, दोघांनी भातुकलीच्या खेळात स्वतःचच लग्न लावून दिलेलं. बाहुल्यांच्या खेळात दोघेही कधी मोठे झाले कळलंच नाही. लहानपणापासून एकत्र वाढलेल्या दोघांत मैत्री, अन नंतर प्रेम जडलं. पण दोघेही वेगळ्या जातीचे, घरी सांगायची सोय नव्हती, लग्न केलं तर समाज जिणं मुश्किल करून टाकेल इतकं भय होतं. मग पांडुरंग च्या आईने दोघांचं गपचूप लग्न लावून दिलं, दोघेही राजस्थानला गेले अन सुखाने संसार करू लागले..कांताला मुलं झाली, सुना आल्या, नातवंड झाली. धाकल्या सुनेला तिने शिकायला पुण्यात पाठवलं, तेही लग्नानंतर...ती खूप शिकली, पण तिची सासू आजारी पडली अन सर्व सोडून तिला परत यावं लागलं.."

एवढं बोलून आजीला ठसका आला..

"अशी काय गोष्ट आहे??"

"आई आधी पाणी आन बघू आजीला..आजी? काय होतंय गं?? इथे झोप बघू, बरं वाटेल.."

आजी शुभदाच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपी जाते..

"आजी, पाणी घे बरं... तू पडून रहा, थोडी वर हो, माझ्या हाताने पाणी देते तुला... आजी.आजी?? आजी????? आई, आजीला काय झालं? उठत का नाहीये??"

आईने आजीचा श्वास पाहिला, तो केव्हाच बंद झाला होता. आईने तोंडाला पदर लावला. आजीने शुभदाच्या मांडीवर आपला श्वास सोडला होता..

नातेवाईकांना बोलवण्यात आलं, आजीला तिच्या मुलांकडे सोपवण्यात आलं. सर्व सोपस्कार पार पडले.

"राहिलं असेल एखादं काम माझ्याकडून, ते झालं की दुसऱ्या मिनिटाला घ्यायला येईल बघ तो.."

आजीचे हे शब्द शुभदाच्या कानात घुमू लागले,

"खरंच, एवढं सांगण्यासाठी आजी अजून तग धरून होती?? आणि ती गोष्ट काल्पनिक नव्हती, पिढ्यानपिढ्या दुर्गावती असताना घडलेल्या घटना गोष्टीरुपाने समोर आल्या..आजीला जी गोष्ट वाटत होती ती गोष्ट नव्हती, ती एक सत्यघटना होती..."

शुभदाला लक्षात येतं, की दुर्गावतीची शेजारी राहणारी मैत्रीण दुसरी तिसरी कुणी नसून नारायनकर कुटुंबाचे पूर्वज असतील. दुर्गावती ने दोघांच्या लग्नाला पाठिंबा दिला अन दोघांना राजस्थान ला पाठवून दिलं असावं. म्हणूनच पुस्तकात आंतरजातीय विवाहाला मान्यता का हवी अन मुलीचं शिक्षण व्हायलाच हवं अशी ताकीद दिली गेलेली. राजस्थान वरून इथे शिकायला आलेली ती पांडुरंग ची सून असावी, पांडुरंग ची सून आली असता दुर्गावती ने शेवटच्या घटका मोजल्या असतील अन पुस्तक सुनेकडे सोपवलं असेल. त्या सुनेने पुस्तकाचा छडा लावण्यासाठी शिक्षणाचा हट्ट केला असेल...अन कांता आजारी पडली म्हणून...पुस्तकाचं काम अर्धवट सोडून ती परत गेली असेल.."

झालेल्या घटना अन पुस्तकातील संदर्भानुसार असंच घडलं असावं. शुभदाने पुस्तक अर्धवट आहे समजताच शेवटची काही पानं वाचणं सोडून दिलेलं. सासरी परतल्यावर तिने ते पुन्हा मिळवलं आणि शेवटची पानं वाचायला घेतली..

"पांडुरंग मोठा झाला, सगळे व्यवहार उत्तम रीतीने पार पाडू लागला. आज तर त्याने एक मोठ्या इंग्रज साहेबाला घरी आणलं. चित्रकार होता तो, तो म्हणे आमच्या कुटुंबाचं हुबेहूब चित्र काढणार होता. आम्ही सर्वांनी तयारी केली, मी देवपूजा करत होते. शिवलिंगावर 101 तांदुळाचे दाणे अभिषेक केल्याशिवाय माझी पूजा होत नव्हती. नेमका पूजेच्या वेळी तो आला, मला उठायला लावलं. पण पूजा अर्धवट कशी सोडणार? मग मी शिवलिंग सोबत घेऊन एका वाटीत तांदूळ घेऊन बसले. कारण तसबीर साठी तासभर बसायचं होतं. मला असं करताना बघत तो चित्रकार हसू लागला. मला ते काम बंद करायला लावलं. असा राग आला त्याचा मला, हे गोरं गिधाड, याला काय कळणार हिंदूंची श्रद्धा..मनातल्या मनात त्याला श्राप दिला. रत्नपारखी कुटुंबाचं एकत्र चित्र तुलाच काय, यापुढे कुणालाही जमणार नाही.. शिवलिंगाची पूजा मात्र मी सोडली नाही..ते करता करता त्याला चित्र काढायला लावलं.."

शुभदा एकदम चमकली, धावतच ती मिनलकडे गेली..

"मीनल, चल आपल्या सर्वांचं एकत्र असं चित्र काढायला घे...मी सर्वांना बोलावते.."

"अगं शुभदा, ऐक..."

शुभदा काहीएक ऐकत नाही, सर्वांना बोलावून आणते, सर्वजण समोर तयारी करून बसतात अन मिनलला सुरवात करायला लावते. मीनलला समजत नाही ही अशी काय करतेय, पण सगळे जमलेच आहे म्हटल्यावर ती कॅनव्हास अन रंग घेऊन सुरवात करते.

"थांब.."

असं म्हणत शुभदा देव्हाऱ्यात जाऊन शिवलिंग अन तांदुळाची वाटी घेऊन येते , अभिषेक सुरू करते..

"मिनल, काहीही प्रश्न न विचारता चित्र सुरू कर.."

सर्वजण बुचकळ्यात पडतात..मीनल चित्र काढू लागते अन काय आश्चर्य...!!! हुबेहूब अन इतकं सुंदर चित्र बनतं... मिनलचा स्वतःवरच विश्वास बसेना..!!!

क्रमशः
--------------------------------------
घराणं (भाग 10)



मिनलचा स्वतःवरच विश्वास बसेना, इतके दिवस या चित्रासाठी इतकी मेहनत केली पण आजवर जमलं नाही, मग आता शुभदाने असं काय केलं की सगळं चित्र बदलून गेलं??


चित्र पूर्ण झालं, सर्वांनी कौतुक केलं. इतक्या वेळ बसून राहिल्याने सर्वजण पाय मोकळे करायला निघून गेले.मीनल शुभदा जवळ जाते..


"शुभदा..अगं काय जादू केलीस?? जे काम आजवर जमलं नव्हतं ते आज कसं जमलं??"

"एवढंच समज की श्रापापासून मुक्ती मिळाली.."

एवढं म्हणत शुभदा निघून जाते, मीनल शुभदाच्या या बोलण्याचा अर्थ शोधतच निघून जाते.

आता शुभदाचा पुन्हा शोध सुरू होतो, पुस्तकाचा दुसरा भाग कुठे असेल??

"शुभदा...अगं मला आज जरा बाहेर जायचं आहे..थोडावेळ गॅरेज मध्ये थांबशील? मी येते एक तासाभरात..."

शुभदाच्या सासूबाई, मेघनाने शुभदाला विचारलं अन शुभदा लगेच तयार झाली. गॅरेजमध्ये बऱ्याच गाड्या होत्या, वेगवेगळी हत्यारं, टायर्स, ट्यूब वगैरे सामान पडलेलं होतं. सासूबाईंना कसं जमतं बुवा हे याचं शुभदाला आश्चर्यमिश्रित कौतुक वाटलं. तासाभरात मेघना परत आली. मेघनाच्या मागोमाग एक गाडी गॅरेजमध्ये आली.


"गाडीच्या इंजिनाचा आवाज येतोय अन खूप गरम होत आहे इंजिन...बघा काय ते.."

गाडीचा चालक मेघनाला सांगतो..

"तुम्ही बसा इथे मी चेक करते.."

मेघना त्यांना बसवून गाडी चेक करते, अन बाजूला येऊन शुभदाला म्हणते....

"पोलिसांना फोन लावावा लागेल.."

"का??"

"गाडीची नंबर प्लेट चुकीची आहे, आणि गाडीत चोरीचा माल दिसतोय.."

"बापरे, तुम्हाला कसं लक्षात आलं लगेच??"

"उभं आयुष्य या गाड्यांमध्ये गेलंय.. एवढं तर लगेच लक्षात येतं.."

मेघना चालक आणि त्याच्या सोबतच्या माणसांना शेजारी असलेल्या हॉटेल मध्ये जेवण करून यायला सांगते. तोवर पोलिसांना ती खबर देऊन ठेवते. शुभदासाठी हे सगळं भीतीदायक होतं, चालकाला समजलं तर जीवावरही उठेल हे माहीत असताना मेघनाने हिम्मत केली. शुभदा गाडीजवळ जाऊन बघते, गाडीच्या आत बराच माल दिसतो.

"आई हे बघा, काय काय माल भरलाय यांनी.."

"बघू.."

गाडीत जुन्या मुर्त्या, जुनी अवजारे, जुने फोटो, जुनी नाणी असा बराच माल असतो..

"ही तस्करी आहे, ऐतिहासिक वस्तूंची...आजकाल ह्या जुन्या वस्तूंना करोडोत विकलं जातं. परदेशी माणसं यात जास्त इंटरेस्ट दाखवतात.."


"म्हणजे आपलीच लोकं आपल्या ऐतिहासिक ठेव्यांचा लिलाव करतात??"


"हो, पैशासाठी माणूस काहीही करू शकतो..पण या दुराचाराला केवळ दुर्गुणी माणूस कारणीभूत नाही, तर सद्गुणी माणसाचं मौनही तितकंच कारणीभूत आहे. सज्जनांची निष्क्रियता ही दुर्जनांच्या सक्रीयतेला वाव देत असते..आपल्या लोकांनी हा ठेवा जपून कुठे ठेवलाय?? हाच ठेवा जेव्हा अमेरिकेच्या प्रदर्शनात मांडण्यात येईल तेव्हा मात्र आपलीच लोकं अभिमानाने त्याचे फोटो बघतील, पण त्यांना हे समजत नाही की हा ठेवा आपल्याजवळ असायला हवा होता.."

शुभदाला मेघनाचं एकूनएक वाक्य पटतं. आत असलेल्या वस्तू ती निरखून बघत असते, पण काचेतून काही गोष्टी अस्पष्ट दिसत असतात.

"आई, का कोण जाणे पण मला या वस्तू पहायची जाम ईच्छा झालीये, दार उघडून देता प्लिज??"

"ठीक आहे, पण लवकर आवर हा..पोलीस केव्हाही येतील.."

मेघना शुभदाला गाडीचे दार उघडून देते. आत असलेल्या एकेक वस्तू ती बघते. त्यातली काही चित्र तिला विचलित करतात. अगदी 1800 च्या शतकातील हुबेहूब प्रसंग एका चित्रकाराने चितारलेले असतात. इंग्रजांविरोधात केलेली चळवळ असो, खेड्यातील दैनंदिन जीवन असो...सर्व अगदी लाईव्ह चित्रित केल्यासारखं भासत होतं. शुभदाला कलाकाराचं मोठं कौतुक वाटतं. समोरचं चित्र मनात साठवून या चित्रकाराने प्रसंग अगदी हुबेहूब साकारले होते. भारताच्या लेण्यांवर जसे रामायण, महाभारतातले विविध प्रसंग चितारले होते त्यावरूनच या चित्रकाराने प्रेरणा घेऊन समोर चालू असलेल्या घटनांचे हुबेहूब चित्रण रेखाटले होते. त्यातच तिला एक कुटुंबाचं चित्र दिसलं. जवळपास 7-8 माणसांचं ते चित्र होतं. ती निरखून ते चित्र बघते, त्यातली स्त्री शिवलिंग जवळ घेऊन बसलेली असते. शुभदाचे हात थरथरायला लागतात, डोक्याला झिणझिण्या येतात, तिची वाचाच बंद होते.

"शुभदा...अगं काय झालं??"

"आई, हे चित्र...हे चित्र.."

"काय झालं या चित्राचं??"

"हे चित्र..आपल्या पूर्वजांचं आहे.."

"काय?? कशावरून??"

"सगळं नंतर सांगते...मला हे चित्र हवंय.."

"हे बघ, आपल्याला हे मिळणं शक्य नाही...हे सरकारी वास्तुत द्यावं लागेल..पोलीस येतीलच आता.."

या चित्रावर मालकी हक्क दाखवायला वेळ लागणार होता, शुभदा पटापट त्या सर्व चित्रांचे फोटो काढून घेते.


पोलीस येतात, बरीच गर्दी जमते, अखेर ते गुन्हेगार आहेत हे सिद्ध होऊन पोलीस त्यांना अन त्यांच्या गाडीत असलेला ऐवज घेऊन जातात. जाताना मेघनाला बक्षीस म्हणून रक्कम मान्य करतात..

"नाही साहेब, आपल्या पूर्वजांचा ठेवा जपणं हे आपलं कर्तव्य आहे, त्या बदल्यात बक्षीस नको..."

मेघनाने बक्षीस नाकारलं. पोलीस कौतुक करत निघून गेले.

मेघनाला शुभदाच्या या वागण्याने धक्का बसतो, ती शुभदाला उलट सुलट प्रश्न विचारते,

"आई, मी सगळं सांगेन, मला थोडा वेळ द्या.."

शुभदा ते चित्र घेऊन मीनल कडे जाते. कारण चित्रातलं मिनलला जास्त ठाऊक होतं.

"कुठलाही चित्रकार चित्राखाली स्वतःचं नाव लिहीत असतो.. यातही त्याचं नाव असेल बघ..आणि हे चित्र जरा चुकीचं बनलंय, म्हणजे बघ, रंगसंगती चुकल्या आहेत आणि मानवकृत्या चुकीच्या बनल्या आहेत.."

दोघीजणी चित्र झूम करून नाव शोधू लागतात. एका कोपऱ्याला "डेव्हिड" असं नाव असतं.

"डेव्हिडची चित्र?? अगं शुभदा हा 1800 च्या काळातील प्रसिद्ध चित्रकार होता. इंग्रजांनी खास भारतीय लोकांची चित्र चित्रित करण्यासाठी याला नेमलं होतं. डोळ्यासमोर घडणाऱ्या घटना हुबेहूब चितरण्यात याचं प्राविण्य होतं.. गुगल वर याची माहिती मिळेल बघ.."

दोघीही लगेच त्याची माहिती गुगल वर शोधतात. त्याच्या चित्रांखाली असलेलं त्याचं नाव अन शुभदाच्या मोबाईल मधील असलेल्या फोटोखालचं नाव हुबेहूब होतं. शुभदाला खात्री पटते, हाच तो चित्रकार ज्याने दुर्गावतीला शिवलिंगाची पूजा करण्याबद्दल हटकलं होतं.

"पण एवढ्या मोठ्या चित्रकाराने हे चित्र चुकवावं म्हणजे मोठं नवल आहे.."

शुभदा मिनलकडे बघून फक्त असते, मनातल्या मनात म्हणते,

"कसं सांगू तुला, यालाच श्राप होता तो.."

शुभदा इतर फोटो बघते, त्यात एका चित्रात वेगळाच प्रसंग साकारला गेला होता. एका स्त्रीच्या हातात एक पुस्तक असतं, तिच्या चेहऱ्यावर घबराट असते, एक माणूस तिच्या हातातलं पुस्तक खेचत असतो..त्या पुस्तकाचे 2 भाग झालेले असतात, एक भाग दारात उभी असलेली एक स्त्री घेऊन बाहेर पळाण्याच्या मार्गावर असते, जो माणूस त्या पुस्तकाचा अर्धा भाग खेचत असतो त्याला मागून एक तरुण मुलगा थांबवत असतो..

शुभदाला लक्षात येतं, या चित्राचा ती एक अंदाज बांधायचा प्रयत्न करते, कारण पुस्तकाचे 2 भाग कसे झालेले असतात याची उकल या चित्रात असते.

डेव्हिड जेव्हा पूर्ण झालेल्या चित्राला फ्रेंम करून दुर्गावती च्या घरी द्यायला गेला असेल तेव्हा दुर्गावती च्या नवऱ्याला म्हणजेच दिगंबरपंतांना या पुस्तकाची माहिती समजली असेल. धर्म भ्रष्ट केला वगैरे आरोप लावून ते हे पुस्तक नष्ट करायला निघाले असतील..तेव्हा दुर्गावती ने पुस्तक वाचवण्याचा प्रयत्न केला असेल. पुस्तकाचे दोन तुकडे झाले असता दुर्गावती ने एक भाग उचलला असेल अन दुसरा भाग तरी जपला जावा म्हणून दारातली ती स्त्री ते उचलून बाहेर पळत असावी. दुर्गावतीचा मुलगा पांडुरंग पुस्तक वाचवण्यासाठी वडिलांना विरोध करत असेल. चित्रात पाहून हीच घटना घडलेली असावी अशी शुभदाला खात्री पटते.

पण ती दुसरी स्त्री कोण असावी?? तिने का हे पुस्तक वाचवायचा प्रयत्न केला असेल?? पुस्तकाच्या अवतारावरून पुस्तकाचे तुकडे होताना झटापट झालेली असावी हा संशय खरा ठरतो.

शुभदा मनोमन देवाचे आभार मानते, त्यानेच असा एकेक मार्ग दाखवलेला असतो. पण ती दुसरी स्त्री कोण असावी?? "पद्मिनी??" दुर्गावतीची बालपणीची मैत्रीण?? तीच, जिच्या मुलीचं, कांताचं दुर्गावती च्या मुलावर म्हणजेच पांडुरंग वर प्रेम होतं?? मग पांडुरंग ने हे पुस्तक वाचवून कांताकडे सोपवलं असावं?? आणि कांताची सून आल्यावर दुर्गावती ने अखेरचा श्वास घेतला असावा, कांताने सुनेला शहरात अभ्यासाला पाठवून पुस्तकाची उकल करायला लावलेली.

बऱ्यापैकी गोष्टी आता शुभदाच्या बुद्धीच्या आवाक्यात आल्या होत्या. आता फक्त उरलेला दुसरा भाग शोधणं गरजेचं होतं, कारण त्यात बरेच खुलासे असणार होते.

या काळात ऋग्वेद अन शुभदाचं वैवाहिक जीवनही सुरळीत सुरू होतं. ऋग्वेद नेहमी तिला म्हणायचा,

"तुझ्या डाव्या गालावरची तीळ माझा वीक पॉईंट आहे..इतकी सुंदरता कुठून आणलीस??"

"माझे पूर्वज एका दिव्य स्त्रीच्या सहवासात असल्यानेच हे तेज आलंय" असं ती सांगे..ऋग्वेदला काही समजत नसे पण हसत खेळत दोघांचा संसार चाललेला.

शुभदा तिच्या टेबलवर पुस्तकाचा पहिला भाग पुन्हा एकदा चाळते. तिथेच तिला मिळालेली दुर्गा देवीची तसबीर ठेवलेली असते. दिगंबरपंत अचानक येतात अन टेबलवरील फोटो पाहून नमस्कार करतात.

"ही तसबीर बरीच जुनी दिसतेय..कुणी दिली??"

"रुद्र शंकर गुरुजींनी दिली.."

"जुन्या काळी काही महत्वाचे ऐवज जपण्यासाठी याचा वापर करत.."

एवढ्यात दिगंबरपंतांना फोन आला अन ते बाहेर निघून गेले. शुभदा फोटोकडे पुन्हा एकदा बघते अन तिला अचानक आजीचे शब्द आठवतात...

"हा नुसता फोटो नाही, तुझ्या यशाचा मार्ग आहे त्यामागे.."

"काय अर्थ असेल आजीच्या वाक्याच्या?? यशाचा मार्ग?? आणि त्यामागे म्हणजे??"

शुभदा फोटो हातात घेते, फ्रेम बरीच जाडजूड असते. ती फ्रेम उलटी करते, त्या लाकडी चौकोनामधून काही जीर्ण कागद बाहेर आलेले असतात. शुभदा एकदम चमकते, पटकन ती फ्रेम खोलते अन खोलताच 50-60 पिवळसर पानं घळाघळा टेबलवर पडतात..



क्रमशः
--------------------------------------
घराणं (भाग 11)

तुफानी समुद्रात हरवलेल्या नावड्याला अथक प्रयत्नानंतर किनारा दिसावा तशी अवस्था शुभदाची झालेली, पुस्तकाचा दुसरा भाग तिच्याजवळच होता, अगदी डोळ्यासमोर, अन आता तो मिळालाय समजताच शुभदाची अवस्था गड सर केल्यासारखी झाली. शुभदा अधशासारखे सर्व पान जमा करते, ही पानं पहिल्या भागाच्या पानांपेक्षा सुस्थितीत असतात. दुर्गा मातेचा आशीर्वाद त्यांना असतो. आता कधी या पानांचा अर्थ शोधून काढते असं तिला झालं.


तिचा पुस्तकाचा शोध चालू होता अन घरात प्रत्येकजण आपापल्या कामात गर्क होते. दिगंबरपंत जमीन व्यवहाराच्या अखेरच्या टप्प्यात आलेले, रश्मीची आज फिटनेस टेस्ट होती, मीनल चित्रांवर अखेरचा हात फिरवत होती, मेघना तिच्या गॅरेजच्या कामात गर्क होती.

शुभदा पुस्तकाची पानं अनुवादित करायला घेते,

"पांडुरंग फार उपद्व्यापी, दिवसभर नुसता फिरत असतो, याची चौकशी त्याची चौकशी. काय काय माहिती जमा करून आणतो, इथला एक इंग्रज अधिकारी त्याचा मित्र बनला, जिथे इंग्रजांना पळवून लावायचं तिथे याने त्याच्याशीच मैत्री केली, मला तर हे अजिबात पटलं नाही बुवा..पण तो अधिकारी भला माणूस होता, त्याची बायको फार हुशार होती. तिचे रंगेबेरंगी आणि सुटसुटीत कपडे पाहून आपल्या बायकांनाही असं स्वातंत्र्य का नाही हा प्रश्न मला पडला. तिचं येणं जाणं घरी सुरू असायचं, तीही कामं करून पैसे कमवायची म्हणे. मला असा अभिमान वाटला म्हणून सांगू, इथे कुंकवासाठी सुद्धा चाराणे मागताना वाचा थरथरू लागते. ही बाई स्वतः कमावते अन स्वतः सगळं करते. माझ्या लेकरांनो, आपल्या घराण्यातही अशीच रित असुद्या, बायकांना मनापासून स्वातंत्र्य द्या. इथे आमच्या देशाला स्वातंत्र्य नाही तिथे बायकांना काय असणार, पण लवकरच हेही दिवस जातील, भारत स्वतंत्र होईल, पुन्हा एकदा हिंदूंचे राज्य येईल. देशाचं स्वातंत्र्य माणसांच्या हातात पण बायकांचं स्वातंत्र्य कुणाच्या हातात आहे? जन्माला येताना प्रत्येक माणूस स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार घेऊन जन्माला येतो, स्वातंत्र्य कुणी कुणाला देत नसतो अन घेत नसतो..पण त्यावर जर संकट आलं तर आपलं स्वातंत्र्य पुन्हा मिळवणं यात काही गैर नाही. मुलगी झाली की तिला जीणं नको नको करून टाकतात, आता हेच बघा ना, माझ्या मोठ्या जाऊ ला मूल होत नव्हतं, खूप वर्षांनी जुळ्या मुली झाल्या, नंतर मुलासाठी प्रयत्न अपयशी ठरले, माझ्या सासऱ्यांनी माझ्या नवऱ्याच्या अन नातवाच्या नावे बरीच जमीन दिली पण जावेच्या नवऱ्याला अगदी तोकडं दिलं, का तर म्हणे तिला मुलगा नाही, काय करणार एवढी संपत्ती घेऊन. मुलींना देण्याइतपत मोठं मन दाखवलं नाही त्यांनी. माझी जाऊ याच खंतेत लवकर गेली..एकदा भांडून गेलेली, माझ्या मुलींना काहीही दिलं नाही म्हणून, काय चुकीचं होतं म्हणा तिचं.. पण मुलगा नसल्याची खंत आईला समाजच देत असतो. आईला आपलं मूल प्रिय असतं मग ते मुलगा असो वा मुलगी.."

शुभदाच्या डोळ्यासमोर अचानक दोन नंबरच्या सासूबाई रेखा आल्या, त्यांनाही दोन मुलीच होत्या. त्यांचं वागणंही घरात संशयास्पदच असायचं. मला मुली आहेत, मुलगा नाही म्हणून खंत तर नसेल ना त्यांना??

"शुभदा...शुभदा...थँक्स थँक्स खूप खूप थँक्स.."

"अगं रश्मी काय झालं??"

"मी फिटनेस टेस्ट पार केली, माझा प्रशिक्षक एकदम अचंबित झाला..नक्की कशाने इतका स्टॅमिना आला याचं उत्तर शोधतोय तो..आता मी राष्ट्रीय स्तरावर खेळणार...तू मला सूर्यनमस्कार सांगितलेस अन त्यानेच हे सगळं झालं बघ.."

"माझे आभार नको मानू, आपल्या पूर्वजांनी पुण्याई.."

"बरं मी सर्वांना ही खुशखबर देऊन येते.."

शुभदाच्या वाक्याचा अर्थ न समजताच रश्मी जोशात निघून जाते.

शुभदा रेखाचा विचार करते, या लाल कपड्यात काहीतरी खजिना आहे असं त्यांना सांगितलं गेलं असेल, म्हणूनच त्या सर्वांना त्यापासून दूर करताय अन देव्हाऱ्यात कुणालाही जाऊ देत नाही, देवपूजा स्वतःच करताय, पण त्यांना कोण समजावणार की हा खजिना भौतिक नसून वैचारिक आहे. यातील अमूल्य विचार या घराण्याला जिवंत ठेवताय, तेजस्वी ठेवताय, 1800 च्या काळात अनुभवांनी दिलेले सल्ले हे मोलाचे ठरताय. हाच खरा खजिना आहे.

शुभदा पुढची पानं वाचते..

"पांडुरंग चा तो इंग्रज मित्र,त्याची बायको जेनीबाई. मला सांगत होती की तुम्हीही काहीतरी कमवायला हवं, काहीतरी अर्थार्जन करायला हवं. फार हुशार बाई होती बरं ती, इथे आल्यावर 6 महिन्यात इथली भाषा शिकलेली बरं ती. तिला उच्चार करणं अवघड जाई पण आम्हाला अर्थ मात्र समजायचा. तिला मी म्हटलं, बाई इथे आम्हाला दोन वेळचं शिळं का होईना पण खायला मिळतंय हेच खूप आहे, नाहीतर समाजाने तुच्छ वागणूक देणं अन नवऱ्याच्या पायी तुडवलं जाणं यापलीकडे आयुष्य नसतं आमचं. तिला आमची अवस्था पाहून वाईट वाटे अन संतापही होई, ती म्हणायची, आमचं राज्य आलंय आता आम्ही स्त्रियांना चांगले हक्क देऊ. असं वाटायचं की एकीकडे भारताला स्वातंत्र्य मिळालं तरी स्त्रियांना काय मिळणार? त्यांना आहेच वर्षानुवर्षे गुलामी. पण माझ्या पुढच्या पिढ्यांनो, स्त्रियांना जर अशी वागणूक दिलीत तर याद राखा"

"माऊली, तुझ्या दिव्यत्वाने या घराण्याची स्त्री गुलामीपासून कधीच मुक्तता झालीय.."


शुभदा मनोमन दुर्गावतीला नमस्कार करते. एवढ्यात ऋग्वेद तिथे येतो..शुभदा पुस्तक चाळत असते, ऋग्वेद येताच ती वळते, तो तिच्या डाव्या गालावरील तिळावर बोट फिरवतो अन म्हणतो,

"दिसला..दिसला माझा वीक पॉइंट.."

"आता जन्मतःच तो आहे म्हटल्यावर.."

"मागच्या जन्मीची खूण असेल.."

"होना..मागच्या जन्मी मला कुणी नजर लावू नये म्हणून टीका लावला असावा, अन या जन्मात देव तो खोडायचा विसरून गेला असावा.."

"बरोबर..थांब मी देवाला सांगून येतो.."

"झालं?? बोल, काय काम काढलं.."

"अरेवा...बायको विचारतेय नवऱ्याला, काय काम काढलं.."

"अरे सॉरी..मी माझ्या कामात इतकी गुंतलेय ना...काय बोलते मी मला काही समजत नाही.."

ऋग्वेद नाराज होऊन सोफ्यावर बसून घेतो..

"काय रे काय झालं??"

"तू पुस्तकाचा शोध घेतेय ना?? काय शोध लागला मग??"

"वेळ आली की सांगेन, पण तुला असं नाराज व्हायला काय झालं??"

"त्या पुस्तकाने तुझा जीव धोक्यात येऊ शकतो..हे माहीत असून मी तुला.."


"गिल्टी वाटून घेऊ नकोस ऋग्वेद, घराण्याची तेजस्वीता टिकवण्यासाठी हे सगळं करतेय मी..आणि विश्वास ठेव, या पुस्तकात जे काही आहे त्यावरून अरुंधती आजी अन पुस्तकाचा काहीही संबंध नाही हेच समजतंय.."

"असं तुला वाटतंय, पण या पुस्तकाची स्वप्न आजीला पडायची, दुर्गे, दुर्गे..वाचव अशी आजी म्हणायची..त्या पुस्तकाला पाहून आजी दचकायची, तेव्हा रेखा आईने ते पुस्तक तिच्याकडे ठेऊन घेतलं आणि पुन्हा कुणीही या पुस्तकाचं नाव काढायचं नाही अशी ताकीद दिली..देवघरात ते ठेऊन दिलं आणि कुणालाही त्याच्याबद्दल बोलायला मनाई केली.."

अरुंधती आजीच्या शेवटच्या काळात रेखा सोबत होती अन तेव्हाच तिने त्या पुस्तकाचा ताबा मिळवला हे सगळं कुठेतरी खटकत होतं. रेखाने उगाच पुस्तकाचं नाव पुढे करून ते कुणीही वाचू नये म्हणून अशी अफवा तर पसरवली नसेल ना?? आजीच्या मृत्यूचं कारण वेगळं असेल पण जाणूनबुजून या पुस्तकावर खापर फोडलं गेलं नसेल ना??

शुभदाला रेखाबद्दल असा विचार करताना वाईट वाटत होतं, पण परिस्थिती तेच सांगत होती..पुस्तकात पुढे लिहिलं होतं..


"मी आज हे लिहिते आहे, पण हे पूर्ण होईल की नाही अन पुढच्या पिढीपर्यंत पोचेल की नाही याची शाश्वती मला नाही, पण तरीही मी जिद्द पकडतेय..जगडीशपंतांना समजलं तर पुस्तकाचे ते दोन तुकडे करून चुलीत टाकतील, पण मी याबद्दल फक्त पांडुरंग अन पद्मिनीला सांगितलं आहे. उद्या काही झालंच तर याचं रक्षण तेच करतील.पद्मिनी वरून आठवलं, तिची मुलगी कांता..खूप गुणी मुलगी..पांडुरंग अन ती अगदी सोबतच वाढले, आता वयात आलेत दोघे, कांता माझी सून व्हावी अशी खूप ईच्छा आहे माझी, पण ही जात कुणी निर्माण केली?? कुणी या भेदाच्या भिंती बांधल्या?? जात आडवी आली नाहीतर दोघांचं लग्न लावून दिलं असतं मी कधीच..अन तशी वेळ आलीच, तर दोघांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन मी, राजस्थान ला माझ्या एकट्या राहणाऱ्या आईकडे पाठवून देईल. जगदीशपंत अन माझ्यासारखा संसार नको त्यांचा, काय मिळालं मला त्यांच्यासोबत?? आयुष्यभर गुलामी अन पदरात पोरं, यापलीकडे बायको म्हणून नाही पण निदान माणूस म्हणूनही वागणूक नाही, पोरांनो अशी चूक तुम्ही करू नका, तुमच्या बायकोला फुलासारखं जपा..."

पुस्तकातल्या सर्व गोष्टी आज अमलात आलेल्याच होत्या..

____

शुभदा काम संपवून जात असताना रेखा अन तिच्या नवऱ्याचे शब्द तिच्या कानी पडतात.

"सगळं आपलंच आहे, तू का पुन्हा पुन्हा कुरकुर करतेस?? तुझ्या एकटीमुळे घराण्याला गालबोट लावू नकोस.."

"मला मुलगा नाही म्हणून ना?? काय पाप केलंय मी? आपला पिढीजात खजिना सर्वांना मिळेल, पण माझ्या मुलींना काय मिळेल?? सर्वजण सून आणतील, नातवंड खेळवतील, खजिना त्यांच्याकडे जाईल, माझ्या मुलींना काय राहील?? त्यांना ना रत्नपारखी नाव राहील ना घराण्याचं नामोनिशाण.."


"मुलगी आहे म्हणून आजवर तुला कुणी हिनवले आहे घरात? उलट लक्ष्मी म्हणून दोघी मुलींना इतक्या प्रेमाने वाढवलं या घराने..आता ऐक माझं, ती चावी देऊन टाक दिगंबरपंतांना.."

"नाही, अजिबात नाही..देव्हाऱ्यात असलेल्या त्या लाल कपड्यातील खजिन्यावर तुमच्या लाडक्या सुनेचा, शुभदाचा डोळा होताच, तिने काही करायच्या आत मी ही चावी माझ्याकडे घेतली..नाहीतर ती खजिना घेऊन कधीच पसार झाली असती..तो ग्रंथ ठेवला मी तिथंच, काही उपयोग नाही त्याचा, पण या चावीने मात्र मोठा खजिना उघडणार असेल, मुलींच्या लग्नात देईन मी त्यांना.."

कसली चावी असेल रेखाकडे? कमेंट करून नक्की सांगा..
क्रमशः
------------------------------------
घराणं (भाग 12)

दुर्गावती ने पुस्तकात बरोबर संकेत दिला होता, आपल्याला फक्त मुलीच आहेत म्हणून आपल्याला दुय्यम स्थान आहे असा चुकीचा समज स्त्रीमध्ये निर्माण होऊ शकतो, रेखाच्या बाबतीत तेच झालेलं. रत्नपारखी घराण्याचं नाव केवळ मुलं पुढे नेतील, इथली श्रीमंती मुलांनाच मिळेल, पण माझ्या मुलींचं काय होईल या विचाराने रेखाच्या मनात धुडगूस घातलेला. देव्हाऱ्यात असलेली

ती वस्तू म्हणजे करोडोंची संपत्ती असं अरुंधती आजी सांगत असायची. अरुंधती आजीला तिच्या सासूने पुस्तकाला नीट जपून ठेवायला सांगितलं, यात संपत्ती असो नसो आजीला ते फक्त सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या पिढ्यांपर्यंत सुखरूप पोचवायचं होतं. अरुंधती आजीला दुर्धर आजार जडला अन आजी अंथरुणाला खिळली, स्वतःच्या तब्येतीपेक्षा आजीला पुस्तकाचं संवर्धन महत्वाचं होतं. रेखाला पुस्तकाचं समजताच तिने त्याचा ताबा घेतला होता. पण अरुंधती आजीला ते पुस्तक थोरल्या सुनेकडे, जानकीकडे द्यायचं होतं. रेखा अन आजीत वाद झाले, माझ्या मुलींना काय मिळणार? आपल्याकडे भरपूर संपत्ती आहे तेव्हा हा खजिना माझ्या मुलींनाच हवा असं रेखाने बजावून सांगितलं. अखेरच्या काळात आजीची तब्येत खूप गंभीर झालेली, आजी कित्येकदा "दुर्गे..वाचव...दुर्गे.." असं म्हणायच्या, त्यांच्या स्वप्नात दुर्गावती देवी येऊन पुस्तकाबद्दल विचारायची तेव्हा आजी तिलाच विणवण्या करायची. रेखाला ते पुस्तक कुणाच्याही हाती लागू द्यायचं नव्हतं, म्हणूनच आजी गेल्यानंतर पुस्तकावर तिने खापर फोडून त्याला लाल कपड्यात बंदिस्त करून देव्हाऱ्यात ठेवलं अन कुणालाही त्याच्या जवळ जाऊ दिलं नाही. त्या पुस्तकासोबत एक चावीही होती, रेखाला ती मोठ्या खजिन्याची असल्याची सतत वाटत असायचं त्यामुळे ती चावी तिने स्वतःकडे ठेऊन घेतली. पण प्रत्यक्षात ती चावी म्हणजे पुस्तकाचा दुसरा भाग पद्मिनीने ज्या पेटीत ठेवलेला त्याची ती चावी होती, पद्मिनीच्या जवळच्या भाटांकडे तिने जपून ठेवायला सांगितलेली आणि पद्मिनी नारायनकरने गुरुजींना सांगितलं की तुमच्या पिढीकडे ही जबाबदारी, नारायनकर आणि रत्नपारखी कुटुंब जेव्हा एक होईल तेव्हा ही पेटी तिच्याकडे सुपूर्द केली जावी. असं सांगत त्याची चावी मात्र पांडुरंग कडे दिली. पांडुरंग ने पुस्तक आणि चावी जपून पुढच्या पिढीकडे सुखरुपपणे सुपूर्द केलेली. रुद्रशंकर गुरुजी म्हणजे त्याच भाटांची आताची पिढी. त्यांनी आपलं कर्तव्य तंतोतंत बजावलं होतं.

पद्मिनीची हुशारी पाहून शुभदाला फार कौतुक वाटलं, जेव्हा दोन्ही कुटुंब एकत्र येतील तेव्हाच पुस्तकाचे 2 भाग एकत्र केले जातील या दूरदृष्टीने तिने बरोबर दुसऱ्या भागाची चावी पुस्तकाच्या पहिल्या भागाजवळ ठेवलेली, नाहीतर आतापर्यंत त्याचं काय झालं असतं कुणास ठाऊक.

दिगंबरपंत मोठया चिंतेत होते, लीलाधर सोबर जमिनीचा व्यवहार करायचा होता, मोठी जागा विकत घेऊन त्यावर इथली पूर्ण टेक्सटाईल कंपनी तिकडे हलवायची होती, याचा खर्च जवळपास 20 कोटीत जाणार होता. रक्कम मोठी होती, दिगंबरपंतांना सहज कर्ज मिळालं असतं पण तरीही इतका मोठा व्यवहार करायचा म्हणजे त्यांना भीती वाटत होती. अखेर सर्वांशी सल्लामसलत झाली, बदल हा झालाच पाहिजे आणि रिस्क उचलणं भागच आहे असं सर्वांचं मत ठरलं. अखेर 15 कोटींमध्ये कर्ज घेऊन लीलाधरकडून जमिनीचे कागदपत्रे तयार करून घेतली.

शुभदा पुस्तकाचा पुढील अनुवाद करायला घेते, त्यात असं असतं की..

"जेनीबाई खरंच खूप हुशार आहे, रोज वर्तमानपत्र वाचते ती. परदेशात राहून इथली खडानखडा माहिती तिला आहे. तिने मला सांगितलं, त्यांच्या देशात बायका कंपन्यात जातात, कामं करतात, काहीजणी मोठ्या पदावर आहेत म्हणे.ऐकून असं कौतुक वाटलं म्हणून सांगू, हिंदुस्थानाला असे सोन्याचे दिवस कधी येतील देव जाणे. जगदीशपंत पंधरा दिवस बाहेरगावी चाललेत, ते असे जाणार असले की घरात जणू एक उत्सवच असतो. आपला नवरा घरात नाही म्हणून उत्सव..असं ऐकून विचित्र वाटलं ना? पण काय करणार? त्यांचा वावर म्हणजे हातात चाबूक घेऊनच आमच्यामागे फिरत असतात. नको नको होतं अगदी. ठरल्याप्रमाणे ते गेले अन घरात आम्ही फार करामती केल्या. पांडुरंग ने गोडाचं खायला आणलं, कांता सुद्धा आमच्यात येई, फार गुणी मुलगी ती. जेनीबाईला घरी बोलवून घेतलं, तिने तिच्याकडचे छान गोलाकार कपडे खास आणले, मी अन कांताने ते घालून पाहिले. किती मोकळं वाटलेलं म्हणून सांगू. अश्या मोकळ्या कपड्यात कायम वावरता आलं असतं तर? असो. जेनीबाई मला घेऊन बाहेर फिरायला नेई, माझ्याच देशातल्या गोष्टी मला नव्याने दाखवी. कितीतरी ठिकाणं मी अजूनही पाहिली नव्हती. मग ती बॉम्बे ऑफिसमध्ये जाई. तिथे सरकारी काम असावं बहुतेक. त्यांना पैसे देई आणि काही कागदावर लिहून देई. मला समजतच नव्हतं हे काय चाललंय. मग एकदा तिला विचारलं तेव्हा तिने सगळं सांगितलं. दुनिया किती मोठी आहे, कितीतरी व्यवहार होतात या जगात, आपण मात्र चुलीभोवती रिंगण घालून बसलोय. या काळात पांडुरंग अन कांताचं बोलणं वाढलं, एके दिवशी दोघांना चोरून बोलताना मी ऐकलं, कांता म्हणत होती की आपलं लग्न झालं असतं तर किती सुखी असतो आपण? पण जात आडवी येते, आता माझ्या वडिलांनी एक बीजवर शोधलाय माझ्यासाठी, खूप पैसे देणार आहे म्हणे. आता नशीबच वाईट असेल तर कुणापुढे हात पसरवू?? दुर्गावतीने हे ऐकलं आणि तिची तळपायाची आग मस्तकात गेली. पैशासाठी मुलीला विकायला निघाला हा बाप? ही माणसं समजता कोण स्वतःला? बायकांना हातातलं खेळणं?? दुर्गावती तडक कांताच्या आईकडे म्हणजेच पद्मिनीकडे गेली अन तिला जाब विचारला. तिची तर मुळीच इच्छा नव्हती बीजवराला मुलगी द्यायची, पण नवऱ्यासमोर काय चालणार? मग मी निर्णय घेतला, माझा जीव गेला तरी बेहत्तर पण कांताच्या आयुष्याशी खेळ होऊ देणार नाही. दिगंबरपंत आले की त्यांना सरळ दोघांच्या लग्नाबद्दल सांगणार, त्यांनी नाही ऐकलं तर सरळ पांडुरंग अन कांताला राजस्थानला माझ्या एकट्या आईकडे पाठवून देणार"

त्या काळात अशी धीरोदात्त भूमिका घेणारी दुर्गावती म्हणजे आजच्या काळातील खरी स्त्रीवादी होती. स्त्रियांवरील होणाऱ्या अन्यायाला तिने प्रतिकार केला होता. त्याही पुढे जाऊन आंतरजातीय विवाहासारख्या आधुनिक विचाराला जन्माला घातलं होतं. त्यानंतर लिहिलं होतं.

" जगदिशपंतांनी आम्हाला अगदी लाथाडून टाकलं, त्यांना मी जेव्हा हे बोलले तेव्हा माझे केस धरून माझं डोकं जमिनीवर आपटायला निघालेले, मला म्हणत होते की इतकी हिम्मत कशी आली तुझ्यात? मी काहीएक ऐकलं नाही, पांडुरंग अन कांताला पळवून लावलं अन लग्न करा असं सांगितलं. पद्मिनी दुरूनच लाखो आशीर्वाद देत होती. दोघांना दूर जाताना तिला थांबवावं असं वाटलंच नाही"

इतकं वाचून होताच शुभदाला रेखाने आवाज दिला अन चटदिशी शुभदा धावत गेली..

"मी नको म्हणत असतानाही देव्हाऱ्यातल्या पुस्तकाला हात लावलास ना? कुठेय ते पुस्तक? त्याच्या जागी हे दुसरं पुस्तक कुणी ठेवलं??"

"म्हणजे तुम्हाला माहीत आहे तर, की यात पुस्तक आहे ते, आजवर आम्हाला यात एक वस्तू आहे असंच सांगत होता.."

"जास्त बोलायला लागलीस?? आजवर इथल्या सुनांनी असं तोंड वर करून कधीच विचारलं नाही.."

"तुम्ही विसरताय, हे रत्नपारखी घराणं आहे..मान खाली घालून घरातल्या स्त्रियांनी वागावं हे या घराण्याला मान्यच नाही मुळात.."

"मला शिकवू नकोस, काल आलेली मुलगी तू अन डोईजड होऊ पाहतेय. कुठेय ते पुस्तक, ताबडतोब माझ्याकडे दे.."

"तुम्हाला कशाला हवंय ते पुस्तक? तुमच्याकडे जी चावी आहे त्यावरून खजिना शोधा की.."

रेखा एकदम चमकते. हिला कसं सगळं ठाऊक??

"तुमच्या माहितीसाठी सांगते, त्या चावीने जी पेटी उघडते ना ती माझ्याकडे आहे.."

शुभदा ती पेटी घेऊन येते, पेटी तोडलेली असली तरी त्याचं कुलूप तिने सांभाळून ठेवलेलं असतं. शुभदा त्याला किल्ली लावते अन ते खोलून दाखवते.

"ही पेटी तुझ्याकडे कशी आली?? काय होतं त्यात? कुठला खजिना होता? अन तोडायची हिम्मतच कशी झाली तुझी? त्याची चावी माझ्याकडे होती..सांग, काय खजिना होता.."

"पुस्तकाचा दुसरा भाग होता त्यात, सोडा..तुम्हाला काय कळणार खरा खजिना काय होता ते.."

"अगं मुली माझ्या आजेसासू उगाच म्हणत नव्हत्या की त्या पेटीतून पैशांची बरसात होईल म्हणून...किती सोनं होतं त्यात?? कुठे लपवलं तू??"

शुभदाला अश्या नीच मानसिकतेचा तिटकारा येतो..रेखा काही पुन्हा बोलणार तोच शुभदाला फोन येतो..

"शुभदा, लवकर हॉस्पिटलमध्ये या..दिगंबरपंतांना हृदयविकाराचा झटका आलाय..जी जमीन 15 कोटीत विकत घेतली ती अनधिकृत होती, लीलाधर पैसे घेऊन फरार झालाय..याचाच धक्का आजोबांना बसलाय.

शुभदाच्या हातातून फोनच कोसळतो. कारण या 15 कोटींचं नुकसान म्हणजे त्याची भरपाई घर, गाड्या, जमिनी विकून द्यावी लागणार होती. रस्त्यावर येणार होते सगळे..

शुभदाचे पुस्तकाचे शेवटची काही पानं फक्त बाकी असतात. त्यात असेल का काही खजिना? त्यात असेल का दिगंबरपंतांच्या नुकसानीवर उपाय??

क्रमशः
--------------------------------------
घराणं भाग 13

दिगंबरपंत हॉस्पिटलमध्ये आहे हे ऐकताच घरातले सर्वजण हॉस्पिटलमध्ये धाव घेतात. दिगंबरपंतांची स्थिती अत्यंत गंभीर होती. त्यांना ऑक्सिजन वर ठेवण्यात आलेलं. पुढील काही दिवस इंस्पेक्शन केल्याशिवाय काहीही समजणार नव्हतं. घरावर फार मोठं संकट कोसळलं. ऋग्वेद, विनायक आणि संतोष हॉस्पिटलमध्ये थांबले. बाकीचे घरी आले. घरी येताच बँकेच्या माणसांनी घेरा घातला. जमीन अनाधिकृत असल्याची बातमी एव्हाना सगळीकडे पोहोचली होती. तेव्हा हे 15 कोटीचं कर्ज कसं फेडणार याचीच चौकशी करायला बँकेचे काही कर्मचारी आलेले. कालपर्यंत अगदी मानाने जे घरासमोर मान झुकवत होते ते आता पैसे नाहीत म्हटल्यावर अरेरावीची भाषा करायला लागले. 15 कोटी फेडायचे म्हणजे घरदार सगळं विकावं लागणार होतं. मेघना सुद्धा आपल्या ओळखीतल्या लोकांशी संपर्कात होती पण इतकी मोठी रक्कम कुणीही देऊ करत नव्हतं. संकट फार मोठं होतं, अक्षरशः रस्त्यावर यायची वेळ आलेली. त्यात दिगंबरपंत हॉस्पिटलमध्ये, काय करावं कुणालाही सुचत नव्हतं.

"आपले हे 5 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत, या काळात पेशन्ट स्थिर राहिले तर ते धोक्याच्या बाहेर असतील, नाहीतर.."

डॉक्टर विनायकला सांगत होते. एकंदरीत दिगंबरपंत कधीही सोडून जाऊ शकतात, पुढील 5 दिवस कसे घालवावे हेच संकट सर्वांना होतं.

शुभदा तिच्या खोलीत दिगंबरपंतांच्या पहिल्या भेटीपासूनच्या आठवणी आठवू लागली, कॉलेजमध्ये हसतमुखाने बोलणारे, सासरी आल्यावर वडीलांसारखी माया करणारे दिगंबरपंत.. ते म्हणजे घराचा प्राण आहेत, त्यांना काही झालं तर?? नाही, कल्पनाही करवत नाही..

"शुभदा. आत येऊ??"

रेखा बाहेर उभी असते, शुभदा तुला खुनेनेच या असं सांगते.

"शुभदा..मी कलंक आहे या घराण्याला..मला माफ कर, मला कसलाही खजिना नकोय, माझ्या मुलींनाही नकोय, पण त्याचा शोध घे अन घराला वाचव गं..." हात जोडून रेखा शुभदापुढे विनंती करते.

"आई, ही वेळ अशी आहे की एकमेकांचे अपराध अगदी नगण्य वाटू लागतील. आणि खरं सांगते तुम्हाला, हा खजिना वगैरे सगळं खोटं आहे. आपल्या पूर्वजात दुर्गावती नावाची एक स्त्री होती, तिने 1800 च्या शतकात आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी काही संदेश दिलाय, तोच या पुस्तकात आहे, आणि खरं सांगते त्यामुळेच घराण्याचं आज इतकं नाव आहे कारण त्यांचे अनुभव आणि सल्ले आज आपल्याला यशस्वी बनवताय.."

"मी खरोखर स्वार्थी झालेली गं, इतका अमूल्य ठेवा दूर सारून फक्त खजिना खजिना म्हणून ओरडत राहिले..पण.."

"पण काय रेखा आई??"

"पण मग, अरुंधती आई असं का म्हणायच्या की वेळ आली की मगच ते पेपर बाहेर काढ म्हणून..?"

"कसले पेपर??"

"मी विचारण्याचा प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ.. काहीही समजलं नाही मला, कदाचित मला वाटायचं की एखाद्या मोठ्या जमिनीचे किंवा घराचे पेपर असतील.."

"दुर्गावती देवीने लिहिल्याप्रमाणे असल्या खरेदीचा काहीही उल्लेख नाहीये, आणि त्याकाळात त्यांच्याकडे इतके पैसे येणेही शक्य नव्हतं.."

"माझा स्वार्थ म्हणून नाही शुभदा, पण माझी ही गोष्ट खरंच ऐक, दुर्गावती देवींनी खूप मोठी संपत्ती आपल्यासाठी राखून ठेवलीय.. त्याचा फक्त शोध घे अन घराला कर्जातून मुक्त कर.."

रेखा निघून जाते, शुभदाचा अजूनही विश्वास बसत नाही, दुर्गावती ज्या परिस्थितीत जगत होती त्या परिस्थितीत तिच्याकडे पैसे असणं शक्यच नव्हतं..आणि त्याकाळात मूल्य तरी किती होतं? त्याची किंमत आज अगदी नगण्य.. मग अरुंधती आजी कसल्या पेपर बद्दल बोलत होती??

शुभदा शेवटची काही पानं वाचायला घेते, त्यात लिहिलेलं असतं..

"आयुष्याचा खूप मोठा अनुभव मी लिहून टाकलाय, काहीतरी केलंय पुढील पिढीसाठी याचं खूप मोठं समाधान मला वाटू लागलंय. मी आता माझं लिखाण अंतिम टप्प्यात आणते. पांडुरंग आणि कांता राजस्थान ला आहेत. सुखाने संसार करताय, पद्मिनीचा नवरा तिला सोडून गेलाय, ती अधूनमधून जाऊन येते राजस्थानला अन खबर आणते. जगदीशपंतांना माझ्यावर संशय येऊ लागलाय, त्यांना जर पुस्तकाविषयी समजलं तर ते माझ्यासकट त्याला जाळून काढतील. पुढच्या महिन्यात पांडुरंग येतोय म्हणे मला भेटायला, कांताला चौथा महिना सुरुय..नातवाच्या नावाने तरी जगदिशपंत माफ करतील अशी आशा करते. आमचे बनलेले चित्र तो चित्रकारही येणार आहे म्हणे लवकरच. जेनीबाई अन माझी खूप छान गट्टी जमली. पण आता त्या परत जायचं म्हणताय, पुन्हा कधी भेट होईल माहीत नाही, पण तिची खूप आठवण येईल मला. शेवटच्या दिवशी तिच्यासोबत फिरले मी, ती मला कुठेकुठे घेऊन गेलेली. शेवटी आम्ही बॉम्बे ऑफिसात गेलो, यावेळी पहिल्यांदा मी ऑफिसच्या आत पाऊल ठेवायचं धाडस केलं, इतरवेळी भीती वाटायची, जेनीच आत जायची. काय समाधान वाटलं म्हणून सांगू. जेनीबाई परत गेल्या, पद्मिनी होती सोबतीला, पण जगदिशपंत असताना तिलाही समोर येता येईना, तिला म्हटलं मी, लेकीकडे राहायला जा..पण लेकीच्या घरचं पाणीही पिणार नाही म्हणे. काय हे नियम, कुणी आणलेत देव जाणे. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली, संकटं ही माणसाला घडवतात, धीट बनवतात, नव्याने उभी करतात, संकटाच्या डोळ्यात डोळे घालून बघा, पहा आपल्या एकाच कटाक्षाने कसं नामोहरम होतं ते. आपली इच्छाशक्ती ही भल्याभल्या संकटांना गारद करते, हे नेहमी लक्षात असुद्या, आयुष्यात जर कुणी खचलाच, निराश झाला किंवा अंथरुणाला खिळलाच.. तर माझे हे वाक्य त्याला सूनवा.. बघा कसा ताडकन उठून बसतो ते. बरं, माझं लिखाण आता मी अंतिम टप्प्यात आणते. शेवटच्या काही गोष्टी फक्त सांगून जाते, ते उद्या लिहीन.."

दिगंबरपंतांमध्ये सुधारणा दिसत नाही, याक्षणी काहीही सांगणं कठीण होतं, पण दिगंबरपंत शुध्दीवर यायच्या आधी 15 कोटीची सोय करणं आवश्यक होतं. पुस्तकात लिहिल्याप्रमाणे दुर्गावतीची वाक्य दिगंबरपंतांना ऐकवायची होती, पण कशी?? मध्ये कुणालाही जाऊ देत नव्हते, शुभदाने खूप विनंत्या केल्या पण कुणीही ऐकेना. अखेर तिने एक शक्कल लढवली, काही स्तोत्र रेकॉर्ड केले अन स्तोत्राच्या शेवटी दुर्गावतीची वाक्य स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून ठेवली. एका नर्सला सांगितलं की हळू आवाजात दिगंबरपंतांना ऐकू जाईल अशी ही स्तोत्र लाव. डॉक्टरांची परवानगी घेऊज नर्स ते हळू आवाजात दिगंबरपंतंजवळ लावते.

शुभदा पुढची काही पानं चाळते, 2 पानांचं लिखाण झाल्यानंतर काही आकडेमोड असलेले कागदपत्रे तिला दिसतात, इंग्रजीत असतं ते सगळं अन त्यावर सही म्हणून एक अंगठा असतो.

"ही कुठली कागदपत्रे आहेत?? चुकून तर आली नसतील ना?? नाही, जीर्ण झालेल्या पानांवरून नक्कीच ही दुर्गावतीची कागदपत्रे आहेत. पण याचा उल्लेख पुस्तकात कुठेही नव्हता. दुर्गावती ने जाणूनबुजून तो उल्लेख टाळला नसावा ना?? कागदोपत्र चुकीच्या हाती लागू नये म्हणून? आणि अरुंधती आजी सांगायची त्याप्रमाणे खरंच यात खजिना होता का?? काय असेल त्या कागदपत्रात??

घराला वाचवण्यासाठी शुभदाला ती कागदपत्र कसली आहेत यांचा शोध लावणं खूप गरजेचं होतं, घरातील इतर मंडळी दिगंबरपंतांच्या कारभारात व्यस्त असल्याने शुभदाने हे काम स्वतःच करायचं ठरवलं. तिने ती कागदोपत्र वकिलाला दाखवली, पण वकिलही ते ओळखू शकला नाही. मग तिने काही CA लोकांना भेट दिली, त्यांनाही त्याचा अर्थ उमजेना. विचित्र अशी आकडेमोड, टक्केवारी, प्रति मूल्य, एकूण मूल्य अशी नावं त्यावर होती. शुभदा खूप फिरली, अखेर दमून एका मंदिरात जाऊन बसली. मंदिरात कुणीही नव्हतं. सावली अन गार वाऱ्याने तिचा थकवा जरा कमी झाला. ती उगाचच इकडे तिकडे बघू लागली, देविमायला नमस्कारही करून झाला. इतक्यात मागून एक वृद्ध आजोबा, जवळपास 90-92 वर्षाचे असतील त्यांनी हाक दिली,

"बेटी, काही मदत हवीय का??"

"नाही आजोबा. ठीक आहे मी.."

जे काम मोठमोठ्या वकिलांना अन CA ला जमलं नाही ते यांना थोडीच जमणार?

"तुझ्या हातात काय आहे बघू??"

शुभदा हातातले पेपर दाखवते, आजोबा चमकतात..

"तुला पैशांची गरज आहे??"

"हो..पण तुम्हाला कसं कळलं??"

"माझ्या आजोबांचा एक मित्र होता, पांडुरंगदादा..त्यांच्याकडे असेच पेपर होते.."

"पांडुरंगदादा?? म्हणजे दुर्गावती चा मुलगा?? आजोबा..मी त्यांचीच वंशज, कसे होते पांडुरंगदादा?? त्यांची आई दुर्गावती.. कशी होती सांगा ना.."

शुभदाला अगदी त्या पुस्तकातुन 1800 चा काळ बाहेर आलाय असं वाटू लागलं. पुस्तकातील एकही पात्र आज हयात नसताना त्या पात्रांना स्पर्शून गेलेलं केवळ एक व्यक्तिमत्त्व सापडलं अन शुभदाला जणू देवच भेटला असं झालं...

"फार काही आठवत नाही, हा पण हे पेपर आठवताय, माझे बाबा हे काम करायचे.."

"मग याची उकल कुणाकडे मिळेल??"

"एक काम कर, मी एक ऑफिसचा पत्ता देतो तिथे जा.."

शुभदाला मुंबईतील एका ठिकाणचा पत्ता दिला जातो अन ती प्रवास करून मुंबईला पोचते.

खूप मोठया प्रतीक्षेनंतर शुभदाला आत घेण्यात येतं, ती ते पेपर दाखवते. ते बघताच अधिकारी चमकतो..

"तुम्हाला कल्पना आहे का? तुम्ही 500 करोडच्या संपत्तीचे मालक आहात??"

क्रमशः
--------------------------------------
घराणं भाग 14

"काय? 500 करोड? कसं शक्य आहे??"

"शक्य आहे..हे ज्यांनी कुणी केलं आहे त्यांनी खूप हुशारीने दूरदृष्टी ठेऊन हे सगळं केलंय.."

"मला अजून समजलेलं नाही, काय आहे हे नक्की??"

"साधारण 1890 ते 1950 मधला काळ असेल, काही उद्योजकांनी मिळून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची म्हणजेच BSE ची स्थापना केली. शेयर मार्केट म्हणतात ना ते हेच, त्याकाळी याची नुकतीच सुरवात झालेली, आजही लोकं शेयर मार्केट म्हटलं की घाबरतात, नाक मुरडतात.. त्याकाळी तर काय परिस्थिती असेल सांगणही अवघड आहे. त्याकाळी मोजक्या लोकांनी 1-1 रुपया इन्व्हेस्ट केला होता. अर्ध्या लोकांनी घाबरून ते काढूनही घेतले, पण तुमच्या ज्या कुणी पुर्वजांनी हे केलं आहे त्यांनी फार विचारपूर्वक इन्व्हेस्ट केले होते, बऱ्यापैकी रक्कम त्यांनी इन्व्हेस्ट केली..मधल्या काळात कुणीही ते शेयर विकलेल्याची नोंद दिसत नाहीये, आणि त्यामुळेच आज त्याची किंमत 500 करोड झालीये. काही कागदपत्रांची पूर्तता करा, सगळे शेयर विकायला काढा, 500 करोड तुमच्या खात्यात जमा होतील.."

शुभदा हे ऐकून अक्षरशः घडाघडा रडायला लागते, अधिकाऱ्याला हात जोडून ती बाहेर निघून येते. बाहेर जमलेली मंडळी तिला रडताना पाहून कुजबुजायला लागतात..

"पैसे बुडले वाटतं.."

"शहाण्याने शेयर मार्केट ची वाट धरू नये हेच खरं.."

"एक तर शेयर मार्केटचा जुगार, त्यात ह्या बाईने गुंतवणूक केली असणार..आता रडणार नाही तर काय.."

शुभदा काय सांगणार होती त्यांना, आम्ही 500 करोड चे मालक झालोय असं?? लोकांना तरी काय कळणार, शुभदाला किती अनोख्या दिव्यत्वाचं दर्शन झालेलं ते.. शुभदाच्या मनात दुर्गावती विषयी असलेला आदर अन जिव्हाळा अजूनच द्विगुणीत झाला.

परतत असतांना शुभदा विचारात पडते,

"दुर्गावती देवींनी कुठेही उल्लेख केलेला नाहीये की त्यांनी शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक केली आहे ते, इतकं मोठं पुस्तक लिहितांना त्याचा उल्लेख करणं का टाळलं असावं? दुर्गावती हुशार होती, चलाख होती, पुस्तक कुणा दुसऱ्याच्या हाती पडलं असतं अन त्याचा दुरुपयोग झाला असता तर? यात इतकी मोठी संपत्ती आहे हे जर कुणाला समजलं असतं तर पुस्तकासाठी भांडणं झाली असती, मालकी हक्कासाठी भावंडात वाद झाले असते,दुर्गावतीने हे कागद त्यांनाच मिळण्याची सोय केली होती ज्यांनी या पुस्तकाचा शेवटपर्यंत अभ्यास केला अन पुस्तकातलं मर्म जाणून घेतलं.

शुभदाला आठवलं, दुर्गावतीने काही संकेत दिले होते. ती जेनीचा उल्लेख करायची,तिला सगळी माहिती असायची असा उल्लेख दुर्गावतीने केलेला, तसंच ती खूप हुशार होती असंही म्हटलं गेलं होतं. तिच्या सोबत मी बॉम्बे ऑफिसला जायचे असा 3 वेळा उल्लेख केला गेलेला, आणि शेवटी शेवटी "मी पहिल्यांदा ऑफिसच्या आत गेले, अंगठा दिला" असा काहीसा संकेत दिला होता. बॉम्बे ऑफिस म्हणजेच BSE, bombay stock exchange चं ऑफिस. आजही जिथे शेयर मार्केटला लोकं घाबरतात, तिथे 1800 च्या शतकात दुर्गावतीने ती गोष्ट समजून घेऊन आपल्या पुढील पिढ्यांना भरघोस आर्थिक फ़ायदा कसा होईल याचा विचार केला होता. तिची जमापुंजी तरी किती असावी? 50 रुपये? 100 रुपये?? यांची किंमत पुढे कमी होणार हेही ती जाणून होती, म्हणूनच मूल्य वाढवणारी गुंतवणूक त्या काळातल्या गुलामीत वावरणाऱ्या अशिक्षित स्त्रीने इतकी मोठी दूरदृष्टी ठेऊन करावी याहून मोठं दिव्यत्वाचं दर्शन ते काय असेल?

"आज जर दुर्गावती सारखी हुशार अन चलाख स्त्री असती तर? तिने कधीच जगावर राज्य केलं असतं.." शुभदाच्या मनात हा विचार तरळून गेला.

तिकडे दिगंबरपंतांच्या वार्ड मध्ये नेहमीप्रमाणे नर्स त्यांची सलाईन रिफिल करायला गेली. तिच्या कानावर रेकॉर्ड केलेली वाक्य पडली अन शुभदाची चलाखी तिला समजली. दिगंबरपंतांशी जे बोलायचं होतं ते तिने स्तोत्राच्या शेवटी टाकलेलं..पण नर्सने काहीही आक्षेप घेतला नाही, कारण जेव्हा जेव्हा ही वाक्य कानी पडायची तेव्हा तेव्हा माशीनवरील आकडे नॉर्मल व्हायचे. असं बऱ्याचदा झालेलं नर्सने पाहिलं. अखेर तिने एक शक्कल लढवली, रेकॉर्डिंग मधली फक्त ती शेवटची वाक्य सलग सुरू ठेवली, ती संपली की पुन्हा फास्ट फॉरवर्ड करत नर्स ती वाक्य पुन्हा चालू करे..

"संकटं ही माणसाला घडवतात, धीट बनवतात, नव्याने उभी करतात, संकटाच्या डोळ्यात डोळे घालून बघा, पहा आपल्या एकाच कटाक्षाने कसं नामोहरम होतं ते. आपली इच्छाशक्ती ही भल्याभल्या संकटांना गारद करते, हे नेहमी लक्षात असुद्या"

या वाक्यांनी दिगंबरपंतांमध्ये एक शक्तीच संचारे. ते प्रतिसाद देऊ लागले. नर्सने ही गोष्ट डॉक्टर च्या कानावर घातली..डॉक्टर म्हणाले..

"काही वेळा शारिरीक आजारांवर उपाय हा माणसाच्या subconscious mind मध्ये असतो, माणसाची इच्छाशक्ती भल्या भल्या आजारांना दूर करते. हे ज्या कुणी केलं आहे त्याने फार विचारपूर्वक केलं आहे..त्यांना खबर द्या याची.."

दिगंबरपंतांमध्ये त्या वाक्यांमुळे जबरदस्त सुधारणा होऊ लागते. घरच्यांना जेव्हा हे समजतं तेव्हा ते ऋग्वेदला विचारतात..ऋग्वेद पुस्तक अन त्याच्या शोधा बद्दल सगळं काही सांगतो..

"पुस्तक?? अरे त्यामुळेच अरुंधती आई देवाला मिळाली..अन आज दिगंबरपंत त्यामुळेच.."

"नाही नाही..पुस्तकाची चूक नाही..काही वेळा माणसाची बुद्धी भ्रष्ट होते अन तो नको त्या गोष्टी करून बसतो.."

नर्स अन डॉक्टर बाहेर येतात..

"तुमच्यापैकी कुणी ती रेकॉर्डिंग दिगंबरपंतांना ऐकवली होती??"

"शुभदाने...का? काय झालं??"

"काय चमत्कार आहे माहीत नाही, पण त्यामुळे दिगंबरपंत फार लवकर recover होताय.."

"पुस्तकाची कमाल आहे ती..पूर्वजांनी दिलेलं ज्ञान कामात येतंय. "

शुभदा मागून केव्हा आली कुणाला कळलंच नाही. ती काय बोलतेय याचा अर्थ फक्त ऋग्वेद अन रेखालाच माहीत होता. इतरांना किती मोठं रामायण झालं याची काहीही कल्पना नव्हती.

"डॉक्टर... पेशन्ट शुध्दीवर आलेत..शुभदा म्हणून हाक मारताय.."

शुभदा तडक आत जाते..

"पोरी...कशी आहेस??"

"हे मी विचारायला पाहिजे आजोबा.. "

"माझ्या एका चुकीने घरदार पणाला लागलं गं.. एवढी मोठी आपली व्याप्ती क्षणार्धात मातीमोल झाली...माझ्यामुळे.."

दिगंबरपंतांचा BP हे बोलता बोलता वाढू लागला..

"कोण म्हटलं आजोबा?? तुम्हाला एक सांगू? तुमच्या 15 कोटीच्या नुकसानीची आपल्याला 500 कोटी भरपाई मिळाली आहे.."

"काय काहीही बोलतेस.."

"हे बघा..500 करोड.."

दिगंबरपंत अवाक होतात..

"कसं? कुठे?कुणी?"

"सगळं सांगेन..सर्वांना सांगेन..आधी तुम्ही बरे होऊन घरी चला मग.."

"आत्ताच सांग..इतकी मोठी रक्कम??"

"घाबरू नका..वाईट मार्गाने आलेले नाहीयेत, आणि मी दरोडा वगैरे टाकलेला नाहीये बरका आजोबा.."

दिगंबरपंत खूप दिवसांनी खळखळून हसले..

क्रमशः
--------------------------------------
घराणं भाग 15
*अंतिम भाग*

___

एव्हाना पूर्ण घरात या 500 करोडची माहिती समजली. वीणा आजोबांना भेटायला तातडीने दवाखान्यात आली. आजोबांना भेटल्यावर ती आधी शुभदाला भेटली,

"वहिनी..कमाल केलीस हा.."

"कमाल मी कसली, या पुस्तकाने केलीय..बघ ना, रश्मीला या पुस्तकानेच मार्ग दाखवला..मिनलच्या चित्राचा श्राप यानेच दूर केला..दिगंबरपंतांना बरं केलं अन आर्थिक प्रश्न सोडवला तेही यानेच.."

"खरंच गं.. वहिनी पण हेही तितकंच खरं की तू जर या घरात आली नसती तर त्या पुस्तकाची उकल कुणीही केली नसती, ते पुस्तक तसंच पडून राहिलं असतं कित्येक वर्षे, आणि अखेर एखाद्या नास्तिकाच्या पिढीत पूर्णपणे हद्दपार झालं असतं.."

"देवाचा संकेत..दुसरं काय.."

"बरं आता आजोबांना आज घरी सोडताय, सर्वजण घरी जाऊ, जरावेळ आराम करू..संध्याकाळी सर्वजण जमले की पुस्तकाचं सगळं घरच्यांना सांगून टाक.."

दिगंबरपंत घरी येतात. घरातील सर्वजण सुटकेचा निःश्वास टाकतात. दुहेरी संकटातून सर्वजण सुखरूप बाहेर पडले होते. सर्वजण संध्याकाळची आतुरतेने वाट बघत असतात, कारण शुभदाच्या तोंडून या पुस्तकाची उकल सर्वांना ऐकायची असते. यावेळी शुभदा तिच्या आई वडिलांनाही बोलावून घेते.


संध्याकाळ होते, रेखा देवासमोर दिवा लावते. घरातले गडी स्वयंपाकाच्या तयारीला लागतात. विनायक दिगंबरपंतांना घेऊन दिवाणखान्यात येतो. जानकी, रेखा, मेघना, संतोष, परशुराम, मीनल, रश्मी, स्वरा, वीणा, ऋग्वेद सर्वजण एकत्र जमतात. सर्वांचे कान आतुर असतात देव्हाऱ्यातल्या त्या वस्तुबद्दल ऐकायला. शुभदाचे आई वडीलही येतात अन तेही सर्वात जाऊन बसतात.

घरात एक पवित्र शांतता असते, वादळ शमल्यावर मागे कित्येक ओरखडे ठेऊन निसर्ग निपचित पडून असतो तशी अवस्था सर्वांची झालेली असते. मनात अनेक प्रश्न होते, अन सर्वांची उकल शुभदाच्या तोंडून मिळणार होती.


शुभदा मधोमध पुस्तकाचे दोन्ही भाग एकत्र करून ठेवते. हात जोडून नमस्कार करते आणि सांगायला सुरुवात करते.


"आता मी जे तुम्हाला सांगणार आहे, ते आजवर कधी घडलेलं नाही. आपण अश्या एका तेजाचे साक्षीदार आहोत जे तेज पिढ्यानपिढ्या या पुस्तकाच्या रूपाने आपल्याकडे आपल्याजवळ आहे. घराण्याला आज खऱ्या अर्थाने दिव्यत्व प्राप्त झालंय. समोर जे पुस्तक बघताय ना, ते पुस्तक नसून आपल्या घराण्याचा पवित्र आणि अमूल्य असा खजिना आहे. साधारण 1800 चा काळ असेल. आपल्या पूर्वजांमधील एक, दुर्गावती देवी याच शतकातल्या. इंग्रजांच्या गुलामीचा तो काळ, स्त्रियांच्या बंधनाचा काळ. त्या काळात दुर्गावती देवीने गपचूप लिहायला वाचायला शिकून घेतलं. मोडी लिपी तेव्हा अस्तित्वात होती. त्या लिपीत दुर्गावतीने तिच्या काळातल्या सर्व गोष्टी लिहून ठेवल्या.तिला जे स्वातंत्र्य मिळालं नाही ते येणाऱ्या पुढील पिढ्यातील स्त्रियांना मिळावं म्हणून घराण्यासाठी त्यांनीच नियम घालून दिलेत जे आजवर आपण तंतोतंत पाळतोय. जगदिशपंत, दुर्गावतीचे पती. त्यांच्यापासून लपून दुर्गावतीने पुस्तक लिहिले, त्या काळात जेनी नामक एका इंग्रज अधिकाऱ्याच्या बायकोशी तिची ओळख झाली. तिच्या मदतीने दुर्गावतीने BSE मध्ये आपल्याकडे असलेले सर्व पैसे गुंतवले. तिचा मुलगा पांडुरंग, समाजाच्या नियमांना झुगारून आंतरजातीय विवाह तिने लावून दिला. जगदीशपंतांनी पुस्तक जेव्हा फाडून टाकलं तेव्हा मुलगा पांडुरंग अन मैत्रीण पद्मिनी यांनी प्रत्येकी एकेक भाग जतन करून ठेवला. दुर्गावती देवींनी अशी सोय केलेली की पुस्तक योग्य व्यक्तीच्या हातातच पडेल आणि हे शेयर्स योग्य पिढीकडेच जाईल. पद्मिनी, दुर्गावतीची जवळची मैत्रीण, तिच्या मुलाचे वंशज म्हणजे नारायनकर कुटुंब.. आई बाबा, ते आपण. आई तू सांगत होतीस ना की घराण्यात दोन्ही कुटुंबात एकेकाळी आंतरजातीय विवाह झालेला म्हणून? तो विवाह पांडुरंग आणि कांताचा. आपले रुद्रशंकर गुरुजी आणि त्यांचे पूर्वज पिढीजात आपले धार्मिक कार्य बघत आले, पुस्तकाच्या दुसऱ्या भागाच्या संवर्धनासाठी पद्मिनीने त्यांना हे सुपूर्द केलं आणि दोन्ही कुटुंब एक होतील तेव्हाच हे द्यायला लावलं. कारण पुस्तकांचं सामर्थ्य आणि किंमत फक्त या दोन कुटुंबांना होती आणि ती रक्तातच असावी हा यामागचा उद्देश. हे सर्व मी थोडक्यात सांगितलं. पण पुस्तकात इतके गहन विचार आहेत की त्याचा अनुवाद सर्वांनी एकदा तरी वाचावा असं मी सर्वांना सांगेन.."

दिगंबरपंत डोळ्यात पाणी आणून म्हणतात,

"पोरी.. आजवर घराण्याला फक्त दुर्गावती देवीच्या विचारांनी तेजस्वी बनवलं होतं.. पण इतिहास आपल्या पुढच्या कित्येक पिढ्यांना साक्ष देईल..की दुर्गावती देवी नंतर अजून एक स्त्री घराण्यात होती जिने या तेजस्वीतेवर मानाचा तुरा रोवला.."

सर्वजण ऐकून अगदी भारावून गेलेले.

"शुभदा, आता हे एवढंच पुस्तक पुढच्या पिढयांकडे जाणार नाही, यासोबत तू केलेला अनुवादही जोडला जाईल.. आणि त्याचं पालन आपल्या पुढच्या पिढ्या करतील.."

"दुर्गावती देवींची बरोबरी सात जन्मात मला कधी जमणार नाही आजोबा.." शुभदा हात जोडून नम्रपणे सांगते.


सर्वजण आपापल्या खोलीत जातात. ऋग्वेद कौतुकाने आपल्या बायकोकडे बघत असतो.

"काय बघताय.."

"माझा वीक पॉईंट.."

"डाव्या गालावरची तीळ ना?? किती वेळा ऐकवशील.."

शुभदाच्या अचानक ध्यानात येतं. दिगंबरपंतांच्या हॉस्पिटल च्या गडबडीत पुस्तकाच्या शेवटच्या चार ओळी वाचायच्या राहूनच गेल्या.. ती पुन्हा पुस्तकाकडे वळते.

"माझ्या पुढील पिढ्या याचा नीट सांभाळ करतील अशी आशा करते, भाषा बदलेल..पण माझं मन सांगतंय.. कुणीतरी तेजस्वी स्त्री येऊन याचा अनुवाद करून पुन्हा पुस्तकाला जोडेल.."

शुभदा ते वाक्य ऐकून थक्क होते. अगदी तंतोतंत भाकीत दुर्गावतीने केलं होतं..

"कदाचित... मीच पुन्हा जन्माला येउन याची उकल करेन. पुनर्जन्म घेऊन..कुठल्या ना कुठल्या मार्गाने याच घराण्याची सून बनेन..एकदा आरशात बघून घेतेय स्वतःला. पुढच्या जन्मात ओळख पटावी म्हणून माझ्या या डाव्या गालावरची तीळ एक खूण म्हणून लिहून ठेवते. जन्मजात असलेली माझ्या ही डाव्या गालावरची तीळ, जगदिशपंत म्हणायचे, या तिळामुळेच तुझं सौंदर्य खुलून दिसतंय... काय माहित, उद्या कदाचित मीच जन्माला येईल या पुस्तकासाठी.."

शुभदाच्या हातून पुस्तक गळून पडतं. समोर आरसा असतो, आरशात तिच्या डाव्या गालावरची तीळ आज प्रकर्षाने चमकत असते.

समाप्त
लेखिका-संजना इंगळे

(तुम्हा सर्वांना एक वेगळ्या धाटणीची कथा वाचायला मिळावी म्हणून या कथामालिकेचा प्रपंच. कसा होता पूर्ण कथेचा प्रवास? वाचून तुम्हाला काय वाटलं? कुठली गोष्ट सर्वात जास्त भावली??
------------------------------------
संकलन-@सतीश#कोळी@खुलताबाद#

Post a Comment

0 Comments