गोरगरीबांचे शिक्षण वाचविणे हिच जयंती दिनी खरी आदरांजली ठरेल !! 👏👏👏👏👏
-----------------------------------------------
आज ३ जानेवारी ..... माय सावित्रीचा आज जन्म दिवस ! झगडे पाटील घराण्यात जन्माला आलेल्या सावित्रीबाईंनी सामाजिक सुधारणांचा पाया घालताना आयुष्यभर कर्मठ , प्रतिगामी आणि समाजकंटकांच्या कुकर्माशी झगडून बहुजन समाजातील गोरगरीबांच्या अंगणी फुलांचा सडा टाकला . *माहेरच्या झगडे आणि सासरच्या फुले या दोन्ही आडनावांभोवती* कर्तृत्वाची सुंदर रांगोळी रेखाटली.
फुले दांपत्याने *जातीभेद व लिंगभेदाची दरी* नष्ट करुन शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांच्या झोपडीपर्यंत पोहचविली. प्रयत्नपूर्वक हलविलेले परिवर्तनाचे हे चक्र आज पुन्हा एकदा उलट्या दिशेने फिरु पाहतयं ..... *जातीभेद व लिंगभेद यामुळे शिक्षण नाकारणारा काळ संपुष्टात आला* असला तरी आर्थिक विषममतेची रुंदावणारी दरी पुन्हा एकदा ' *नाही रे वर्गाचे* ' शिक्षण उध्वस्त करु पाहत आहे .
मोबाईल विश्वात आकर्षक व सवंग जाहीरातींचा भडीमार करुन ग्राहकांचा ओघ जिओ ( GIO ) कडे वळता करुन BSNL सारखी कंपनी जवळपास बुडविण्यात आली . अनेक सार्वजनिक उद्योगांच्या बाबतीत देखील असेच काहीसे घडत आहे . अशातच आज विविध सोशल मिडीयांतून महाराष्ट्रातील सर्व वीज कर्मचारी ३ दिवस संपावर जाणार असल्याची पोस्ट फिरत आहे . *महावितरण सारखा सार्वजनिक उद्योग खाजगी भांडवलदारांच्या खिशात गेला तर सर्वसामान्य ग्राहकांच्या घशाला कोरड पडायला फारसा वेळ लागणार नाही* . म्हणूनच हा संप केवळ वीज कर्मचारी बांधवांच्या हक्कांसाठी असेल असे मानून नेहमीप्रमाणे अंग काढून घेण्याचा कोरडेपणा दाखवून चालणार नाही ......अन्यथा गरजेची ही सुविधा परवडण्या पलिकडे जाऊन पोहचलेली असेल .
शिक्षण क्षेत्राची देखील याच मार्गाने वाटचाल सुरु आहे . स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे अनेक प्रश्न जाणिवपूर्वक रखडवून ठेवले जात आहेत . पुरेशा प्रमाणात वर्गखोल्या आणि शिक्षक उपलब्ध नाहीत , *वीज आणि पाणी शाळांना मोफत मिळाले पाहिजे* ही वर्षानुवर्षे केली जाणारी मागणी दुर्लक्षित केली जात आहे . वेळेवर पाठ्यपुस्तकांची उपलब्धता होत नाही . १००% विद्यार्थ्यांना मोफत गणवेष उपलब्ध करुन देण्याऐवजी जातीपातीच्या भिंती उभ्या केल्या जात आहेत . *माहिती तंत्रज्ञानाचा पुरस्कार करण्याच्या जमान्यात औद्योगिक दराने आकारले जाणारे विद्युत बिल भरण्यासाठी तरतूद नाही म्हणून खंडीत झालेल्या वीज पुरवठ्यांमुळे लाखो रुपयांचे साहित्य आणि संगणक धूळ खात पडले आहेत* . अशैक्षणिक कामांच्या ओझ्याखाली वाकलेला शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आस पूर्ण कशी पूर्ण करेल ? व्यवस्थेमधील प्रश्नांची सोडवणूक न करता ही व्यवस्थाच मोडून टाकण्याचे षडयंत्र खुबीने रचले जात आहे .
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत शिकून *आपली मुले उद्याच्या स्पर्धेत टिकू शकणार नाहीत* ......या गृहीतकांभोवती पालकांना फिरवले जात आहे . त्यातूनच इंग्रजी माध्यम व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांकडे पालक आकृष्ठ होत आहेत . हरियानामध्ये तिथले राज्य सरकार खाजगी शाळांत शिकणार्या विद्यार्थ्यांना दरमहा अनुदान देत आहे .साहजिकच तिथल्या सरकारी शाळा जवळपास संपुष्टात येत आहेत . *सरकारी शाळा पूर्णतः नामशेष होईपर्यंत सरकारी तिजोरीतून अनुदानाची सलाईन सुरु राहील*. सर्व सरकारी शाळा बंद झाल्या की खाजगी शाळांची मनमानी पद्धतीने वाढलेली शैक्षणिक फी पालकांना स्वतःच्या खिशातून भरावी लागेल. मात्र त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल ...... *हा शैक्षणिक खर्च पेलण्याच्या पलिकडे जाऊन पोहचलेला असेल* !
याचा सरळ साधा अर्थ आहे ..... सावित्रीबाईंनी जातीभेद आणि लिंगभेदाची दरी नष्ट करुन शिक्षणाचा प्रसार केला ......परिवर्तनाचे चक्र सुलटे फिरविले......पण आर्थिक विषमतेच्या दरीमुळे गोरगरीब समाज पुन्हा एकदा शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका आज व्यवस्थेतील दोषांमुळे निर्माण झालाय. तो टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतून दिले जाणारे शिक्षण वाचविण्यासाठी ज्ञान पंढरीच्या उपासकांनी पुढे आले पाहिजे . *आपण ज्या गोरगरीबांच्या झोपडीतून शिक्षण घेत पांढरपेशी , मध्यमवर्गीय म्हणून समाजात उजळ माथ्याने वावरतोय अशा सर्वांनीच आपलीच भावंडे शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे* हिच सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी आदरांजली ठरेल !
*म्हणूनच माय सावित्रीने दिलेला लढा अजून संपलेला नाही तर बदलते संदर्भ विचारात घेऊन अधिक नेटाने लढावा लागेल इतकेच* !






0 Comments