पाठ्यपुस्तकातील कोरी पाने वगळून सुधारित पाठ्यपुस्तके पुरण्याचा शासन निर्णय... दि.28/01/2025 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

इयत्ता २ री ते इयत्ता ८ वी च्या पाठ्यपुस्तकांबाबत...
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२२/प्र.क्र.२१६/एसडी-४

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक :- २८ जानेवारी, २०२५

संदर्भ :-

१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२२/प्र.क्र.११६/एसडी-४, दिनांक ०८ मार्च, २०२३

२) संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळ, बालभारती, पुणे यांचे पत्र क्र. ह / भाषा-भाषेतर/६०६०, दिनांक १८.१२.२०२४

प्रस्तावना :-

शिक्षण व शिक्षणाचे साहित्य त्यांचे सार्वत्रिकरण होणे, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे, पाठ्यपुस्तके व वह्या यांच्या वजनाने दप्तराचे ओझे वाढले जाणे, दप्तराच्या वाढत्या वजनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणाम व सोबतच राज्यातील खेडोपाडी असणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत शिकायला जाताना पुरेसे लेखन साहित्य उपलब्ध नसणे; या सर्व मुद्यांचा विचार करून शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून इयत्ता २ री ते इयत्ता ८ वी च्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये घेण्यात आला होता. या शासन निर्णयातील अनु. क्र. ८ मध्ये प्रस्तुत योजनेची यशस्वीता लक्षात घेऊन शालेय वर्ष २०२४-२५ पासून सदर योजना पुढे सुरु ठेवावी, असे नमूद करण्यात आले आहे.

संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळ, बालभारती, पुणे यांनी यासंदर्भात संदर्भ क्र. २ येथील पत्रान्वये शासनाच्या असे निदर्शनास आणले आहे की, सदर योजना प्रायोगिक तत्वावर असल्याने तसेच पुनश्च याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन, ही योजना पुढे सुरु ठेवण्याबाबत मूळ धोरणात विचार असल्याने सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात वह्याची पाने समाविष्ट करुन पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. तथापि सदर योजनेचा आढावा घेतला असता, पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वह्यांच्या कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांकडून शिकविलेल्या घटकांच्या नोंदी घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे उपयोग झाल्याचे दिसून आले नाही. तसेच सदर योजनेचा उद्देश हा दप्तराचे ओझे कमी करणे असा होता, परंतु विद्यार्थी पुस्तके व सोबत वह्या देखील घेऊन येत असल्याचे तसेच पाठ्यपुस्तकांमधील कोऱ्या पानांचा शैक्षणिक नोंदी घेण्याकरिता वापर होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सदर योजनेचा अपेक्षित उद्देश फारशा प्रमाणात सफल झाल्याचे दिसून आले नाही.
उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेऊन, संदर्भ क्र. १ येथील दिनांक ०८ मार्च, २०२३ रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरुन शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय :-

संदर्भ क्र. १ येथील दिनांक ०८ मार्च, २०२३ रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे.

२. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ व त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून देण्यात यावीत.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२५०१२८१६०१०२४०२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

TUSHAR VASANT MAHAJAN
EDUCATION AND SPORTS DEPARTMENT,
(तुषार महाजन) उप सचिव, महाराष्ट्र शासन

Post a Comment

0 Comments