महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
माझा मोबाईल सार्वजनिक मालमत्ता नाही.
Apss, Portal, Links च्या अतिरेकी जाचामुळे मला आता "हे" करावेच लागेल...
सन्मा. शिक्षक बंधू-भगिनी,
सप्रेम नमस्कार...
शाळेतील वेगवेगळ्या योजना, उपक्रम, प्रत्यक्ष शिक्षणाशी संबंधित व असंबंधित ऑनलाइन माहिती संबंधाने आपल्या स्वतःच्या मोबाईलवर कामास जुंपून घेण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आपला मोबाईल Hang होत आहे. मोबाईल व डाटाही आपला आणि त्यावर काम करणारेही आपणच..
सतत माहिती भरण्याच्या जाचामुळे दैनंदिन अध्यापन प्रभावित होत आहे. गुणवत्ता संवर्धनाच्या तथाकथित व कपोलकल्पित हासासाठी शेवटी आपल्यालाच जबाबदार धरल्या जाते व आपली शिक्षक म्हणून सातत्याने पद्धतशीर बदनामी केली जाते. शाळेत ही कामे करत असताना विद्यार्थ्यांनाही असे वाटते की; आपले शिक्षक मोबाईलवरच आहेत. पालकांनाही असं वाटते की; शिक्षक शिकवत नाही तर केवळ मोबाईलवर खेळतात, मग्न असतात. आणि या बदनामीत अधिकच भर पडत जाते.
शिक्षक संघटना म्हणून या गोष्टीला संघटनेने नाही म्हटलं पाहिजे किंवा विरोध केला पाहिजे ही प्रत्येक शिक्षक बांधवांची अपेक्षा मुळीच चुकीची नाही.
परंतु मोबाईल उपकरण सार्वजनिक नसताना, माझ्या मालकीचे अर्थात खाजगी असताना मी स्वतः शाळेतील मोबाईलच्या वापराला कमी का करू शकत नाही..? हे स्वतःला विचारले पाहिजे. आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर येणाऱ्या लिंकद्वारे मागितली जाणारी माहिती ही प्रामुख्याने व्हाट्सअॅपरूनच
मागितली जाते. पर्यवेक्षकीय यंत्रणेतील घटकांनी स्वतःच्या सुविधेसाठी आणि केवळ माहिती मागण्यासाठी तयार केलेल्या सर्व WhatsApp ग्रुप वरून प्रत्येक शिक्षकाने बाहेर पडावे व कुणी कितीही आग्रह धरला तरी पुन्हा त्या ग्रुपवर जॉईन होऊ नये, आपल्या मित्र समूहाच्या, संघटनेच्या WhatsApp ग्रुप वर कुणीही पर्यवेक्षकीय अधिकारी ठेवू नयेत आणि जे शिक्षक बांधव आपल्या ग्रुपवर सहभागी आहेत त्यांनी कटाक्षाने पर्यवेक्षकीय यंत्रणेकडून आलेला माहिती मागण्याचा संदेश या ग्रुपवर शेअर करू नये. असे होत असल्यास अशा लोकांना समज देऊन आणि पुन्हा न ऐकल्यास ग्रुप वरून Remove करावे अशा प्रकारचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व अन्य काही लोटांगण न घालणाऱ्या समविचारी संघटनांनी दोन एक वर्षांपूर्वी आवाहन केले होते.
सुरुवातीला अनेक शिक्षक बांधवांनी अशा या तथाकथित पर्यवेक्षकीय ग्रुप वरून बाहेर पडण्याचे धाडस दाखवले. त्याचा परिणाम असा झाला की; रात्री-अपरात्री येणारे मेसेज बंद झाले. आपले काम आपण शांततेने करू लागलो. आपली वैयक्तिक/कौटुंबिक कामे/जबाबदाऱ्या व शरीर स्वास्थ्यासाठी अत्यावश्यक झोप खराब करण्याचा धंदा बंद झाला. परंतु काही दिवसांनी पुन्हा येरे माझ्या मागल्या ही स्थिती निर्माण झाली.
जे शिक्षक बंधू अशा व्हाट्सअप ग्रुप मधून बाहेर पडले; त्यांना कोणताही कारणे दाखवा नोटिस आला नाही, त्यांच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई झाली नाही. मग पुन्हा आपले बांधव अशा तथाकथित प्रशासकीय नसलेल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर पुन्हा का जॉईन झाले.? याचे कारण म्हणजे वैयक्तिक संबंध... साहेब काय म्हणतील... अशी अनेक भीती वाटणारी अनाकलनीय कारणे आहेत.
आता हा पराकोटीचा जाच अधिकच वाढला असून.. वाढतच आहे... असह्य झाला आहे.
आम्ही संघटना म्हणून शासन स्तरावर सतत याबाबतीत आवाज उठवित आहोत, अशा धोरणाला विरोध करीत आहोत.
परंतु शाळेमध्ये शिक्षणाच्या व्यतिरिक्तच नव्हे तर शैक्षणिक बाबतीत सुद्धा आपल्या खाजगी मोबाईल मधून ऑनलाइन कामास नकार दिलाच पाहिजे. ऑनलाइन राहून राबवायचे वेगवेगळे उपक्रम शाळेत बंद केलेच पाहिजे. त्यासाठी आवश्यक आहे; आपण आपल्या मोबाईलवर इंटरनेट शालेय कामकाजाच्या वेळेत बंद करावे. स्वतःच्या खाजगी कामासाठी सुद्धा दिवसभर इंटरनेट वापरू नये. त्यामुळे फक्त एकच होईल की; आपल्याला व्हाट्सअपच्या माध्यमातून कोणताही संदेश दिवसभर येणार नाहीत. परंतु परिवाराला, मित्रांना अत्यंत आकस्मिक परिस्थितीमध्ये दूरभाष (Telephone) करून संपर्क साधता येईल, त्यासाठी इंटरनेट सुरू असण्याची आवश्यकता नाही हे सर्वांना माहीत आहे. तसेच आपल्या मोबाईलच्या व्हाट्सअप सेटिंग वर जाऊन Read Option दिवसभरासाठी बंद ठेवल्यास सुद्धा आपला जाच कायमचा बंद होऊ शकतो.
अध्यापन कार्य प्रभावित होत असल्याने आम्ही शाळेत मोबाईल वापरत नाही, वापरणार नाही. मोबाईलच्या अतिवापरामुळे मलाही स्वास्थ्याच्या दृष्टीने त्रास होतो हे ध्यानात घेऊन अशाप्रकारे शालेय कामकाजाच्या वेळी केवळ प्रशासनिकच नव्हे; तर वैयक्तिक सुद्धा WhatsApp वापरण्याचा मोह आवरल्यास तसे स्वतःच स्वतःवर बंधन लावल्यास या जाचातून सुटका होण्याचा मार्ग प्रशस्त होईल आणि आपल्यालाही मनःशांती मिळेल व विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेसा अवधी मिळेल.
त्याचप्रमाणे शालेय कामकाजाची वेळ संपल्यानंतर मला कोणताही प्रशासनिक मेसेज पाठवायचा नाही अर्थात Write to Disconnect स्वतःचा अधिकार वापरणे आता अधिक गरजेचे झाले आहे.
परंतु त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे म्हणजे मला साहेब काय म्हणतील हा अविचार न करता, तकलादू भीती न बाळगता शालेय कामकाजाच्या वेळेत इंटरनेट बंद ठेवून मी व्हाट्सअप वापरणार नाही अशा प्रकारचा निर्धार, संकल्प प्रत्येक शिक्षक बांधवांनी करणे व त्यावर ठाम राहणे गरजेचे आहे.
विजय कोंबे
राज्याध्यक्ष
महाराष्ट राज्य प्राथमिक शिक्षक समिती
0 Comments