20 वर्षानंतराचा भारत दाखवणारी, आंतरराष्ट्रीय जि.प.प्रा.शाळा वाबळेवाडी :-
~~~~~~~~~ *srk* ~~~~~~~~~
संकलन:-सतीश कोळी भद्रा मारुती खुलताबाद(औरंगाबाद)
*वर्गविरहीत वर्गरचना* :-
वाबळेवाडी शाळेत मुलांना शिकण्यासाठी इयत्ताचे बंधन नाही.
प्रत्येकाच्या अध्ययन पातळीनुसार अन गरजेनुसार मुलं एकत्र बसून अभ्यास करतात.
त्यातूनच विषयमित्र ही 'अफलातून' पद्धत वाबळेवाडीत विकसित केली गेली.
*काय आहे ही विषयमित्र पद्धत?*-
१) मुलांचे त्यांच्या इच्छेनुसार अन अध्ययन पातळीनुसार गट तयार होणार.
२)- त्या गटाला शिकवण्यासाठी वरच्या वर्गातील मुले मदत करणार. शाळेच्या वेळात आणि शाळेच्या वेळेनंतर ही या मुलांना ते मदत करणार.
३) विषयमित्र या योजनेसाठी गावातील पालकांची मोठ्या प्रमाणावर मदत घेतली गेली.
या पद्धतीचा परिणाम असा दिसला की शिक्षकांपेक्षाही विषय मित्राकडून मुले जास्त वेगात आणि चांगलं शिकू लागली.अन या परिणामाच्या अवलोकनातून वारे गुरुजी अन खैरे गुरुजी अधिकाधीक "विद्यार्थी प्रिय " असे घडत गेले.
*30सप्टेंबर पर्यंत शालेय अभ्यासक्रम पूर्ण* 🤔
होय ! ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे.पण तितकीच खरी आहे . वाबळेवाडीत पारंपारिक/ पुस्तकी शालेय शिक्षण अभ्यासक्रम 30 सप्टेंबरपर्यंत मुलं पुर्ण करतात .यामध्ये वर सांगितल्याप्रमाणे विषयमित्र या पद्धतीचा खूप मोठा वाटा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणातील वारे विचार .
*काय आहे हा वारे विचार?*
प्राथमिकच्या वर्गातील सर्व विषयातील समान, किंवा साधर्म्य असलेले भाग एकत्र करणे.
मग त्या सर्व वर्गांना एकत्रितपणे तो विषयभाग वेगवेगळ्या प्रकारे समजावणे.
उदा:- पाणी .
पाणी या घटकाला धरून मराठी, परिसर अभ्यास ,विज्ञान. इंग्लिश. इतिहास, भूगोल, गणित या सर्व विषयाला कसा स्पर्श करतात बघा. ..
पावसावर - पाण्यावर आधारित मराठीतील सर्व इयत्तेतील कविता वाचन ,गायन समजून घेणे- कविता शिकत असतांनाच वारे सरांनी खालील विषय कसे हाताळले ते बघा--
आपल्याला पाणी कोठून मिळते ?
पाण्याचे उपयोग मुलाकडून काढून घेणे-
कोरडा दुष्काळ म्हणजे काय ?
शुद्ध पाणी कसे मिळवतात?
पाणी शुद्ध ( फिल्टर) का करावे लागते?
पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय ?
पाणी प्रदूषण टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी.?
घरी ,शेतात ,उद्योगात ,हॉटेलात पाण्याची बचत कशी करता येईल ?
शेतात आधुनिक जल नियोजन कसे करता येईल ?
एक व्यक्तीला दिवसभरात किती लिटर पाण्याची आवश्यकता असते ?
एक व्यक्ती एका वर्षात एक व्यक्ती किती पाणी वापरतो ?
कमी पाण्यावर येणारी पिके कोणती ?
जास्त पाण्याची आवश्यकता असणारी पिके कोणती ?
दुष्काळी भागात कोणती पिके घेतली जातात ?
पाणी संकट टाळण्यासाठी सध्या लोक काय उपाय करत आहेत ?
दुष्काळ टाळण्यासाठी भूतकाळात काय उपाय केलेले आहेत ?
फिल्टर मधून वाया जाणाऱ्या पाण्याचा कसा चांगला उपयोग करता येईल ?............
नदी पुनर्जीवन म्हणजे काय?
पृथ्वीवर पाण्याची विभागणी कशी ?
या प्रकारे एकत्रित अन समग्र अध्ययन झाल्याने मुलाचा अभ्यासक्रम 30 सप्टेंबर पर्यंत संपतोच. करण इतर विषयातील हा भाग नव्याने शिकावा -शिकवावा लागत नाही .
*मुलं कशी प्रेरित झाली* ?
शाळेत -
1)रोबोटिक्स,
2)इलेक्ट्रिक कार.
3)साऊंड इंजिनियरिंग.
4)डिझायनिंग.
5)थ्रीडी प्रिंटिंग,
6)शॉर्ट फिल्म मेकिंग,
7)एडिटिंग,
8)म्युझिक रेकॉर्डिंग
9) वेस्ट मॅनेजमेंट
या सारख्या प्रोजेक्टवर काम केले जाते . ( यात मुले दिवसरात्र यात रमलेली असतात .त्यांना दिवसभरात वेळेचं बंधन नाही) ज्यांना ज्या प्रोजेक्ट मध्ये सहभागी व्हायचं असेल त्या सर्व मुलांनी आपला अभ्यासक्रम 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करावा. तरच त्यांना त्या प्रोजेक्टमध्ये सहभागी केलं जातं. ही एकच गोष्ट मुलांना दिवस-रात्र मेहनत करून आपला अभ्यासक्रम 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याची प्रेरणा देते.
वाबळेवाडीतील मुलं आपला अभ्यासक्रम 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करतातच आणि वेगवेगळ्या प्रोजेक्ट मध्ये भाग घेऊन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये देखील जातात.
*एका विषयातून अनेक विषय शिकणे-शिकवणे* :-
इयत्ता पहिलीच्या वर्गात--
मुलांना एक विषय देतात.त्या विषयाची पुढील चार ते पाच दिवस वर्गात चर्चा होते.शिक्षकही मुलासोबत चर्चा करतात,प्रश्न विचारतात,चर्चेला आणखी व्यापक रूप देतात. एक विषय चार ते पाच दिवस चालतो.
उदाहरणार्थ ' आंबा '
आंबा या विषयाला धरून मुलांनी सर्व प्रकारची माहिती गोळा करावी त्याने ती सांगावी.
आता या विषयावर मुलं काय सांगतात बघा-
१) आंब्याच्या विविध जाती जसे- केशर, हापूस, लंगडा, पेवंदी, तोतपरी, पायरी,गोटी.
२) आंब्याच्या चवी.
३) आंब्याचे अनेक उपयोग.
४)आंब्याचा सध्याचा बाजारभाव.
५)आंब्यासाठी लागणारी जमीन.
६)वेगवेगळ्या भागातील प्रसिद्ध आंब्याच्या जाती.
७) आंब्याच्या फळाचा मोहोर ते कैरी ते आंबा हा प्रवास त्यातील बदलांचे सुक्ष्म निरीक्षण ते मांडतात.
८) मग कैरीचे उपयोग काय? आंब्याचे उपयोग काय? तेही सांगतात.
९) आंब्याच्या फळाचे निरीक्षण सांगतात. उदाहरणार्थ- आंब्यात एक बी असते . कोय.कोयीत आणखी एक छोटे बी असते. पिकलेल्या आंब्याचा रंग हिरवा ,पिवळा ,लाल असे देखील असतो.
अशाप्रकारे एका विषयावर विविध अंगाने चर्चा होऊन, तो विषय परिपूर्ण माहीत करून घेतला जातो. अन हे सगळं इयत्ता पहिलीच्या वर्गात घडतं.
*अर्थनियोजनातील वारे विचार* :-
"प्रत्येक पालकाचे योगदान(थोडे का होईना) घ्यायचेचं. जो कोणी योगदान देत नाही ,असा तो उगीचच चालू कार्यातील चुका शोधत असतो. योगदान देणारा मात्र कार्य पूर्ण कसे होईल ? यासाठी विचार करत असतो. "
कोण" किती" मदत करतो ,यापेक्षा "मदत करतो" ही गोष्ट जास्त महत्वाची मानली. त्यामुळे काही लाखाची मदत करणारा अन पन्नास ,शंभर रुपयांची मदत करणाराही समान पातळीवर समाधानीत आणि स्वसन्मानीत झाला.
*पर्यावरण विचार*
कागदाचा अपव्यय टाळण्यासाठी लहान वर्गातील मुले पाट्या वापरतात.
शाळेत प्लास्टिक नाहीच
*शाळेला मिळणाऱ्या प्रचंड समाजसहभागाचे नियोजन* :-
सूत्र:-
गावच्या बाहेरील लोकांची मदत घ्यायची नाही.
1) खर्च हा फक्त मुलांच्या गरजा अन सुविधेवर करायचा.
2)मुलाच्या समितीने गरजा निश्चित करायच्या.
3) शिक्षक- पालक समितीला कळवायच्या.
4)सर्व समाज सहभाग बँकेत जमा करायचा.
5) शिक्षक आणि पालक यांचे जॉईंट खाते.
6)या खात्यावरील खातेधारकाला खर्च करण्याची परवानगी नाही.
7) त्यांनी फक्त मागणी आलेली रक्कम काढून खरेदी समितीला द्यायची.
8)खरेदी समितीने मुलांशी चर्चा करून खरेदी करायची.
9)पावती आणि वस्तू मुलांच्या समितीकडे सुपूर्द करायच्या.
10) या संपूर्ण व्यवहाराचा हिशेब अन रेकॉर्ड मुलाच्या समितीने राजीष्टर मध्ये मेंटेन करायचा.
या पद्धतीने आतापर्यंत एकही रुपयांचा अपव्यय ,अन अविश्वास या शाळेत झालेला नाही.
*का मदत केली वाबळेवाडीकरांनी शाळेला* ?
1) वारे सर आणि खैरे सर यांची मुलाच्या शिक्षणासाठी चाललेली तळमळ अन ओढाताण
2) दोनीही सरांनी गावकऱ्यांशी जुळवलेले आपुलकीचे नाते.
3) मुलाच्या शिक्षणात प्रत्यक्ष पालकाची घेतलेली मदत.
4)*शाळेतूनच गावचा होऊ शकतो विकास*. हा विचार रुजवला.
5) विषयमित्र. पालक -शिक्षक यासारख्या उपक्रमातून केले पालकांचे विचार परिवर्तन.
6)कोणालाही पदाच्या नावाने हाक मारायची नाही. सर्वासाठी एकाच संबोधन ते म्हणजे "अण्णा " अन "ताई".
7) पदापेक्षा व्यक्ती महत्वाची मानली.
8)गावातील सर्व गटांना अन सर्व पालकांना शाळेच्या कामात सहभागी केले.
*काय मदत केली वाबळेवाडीकरांनी शाळेला?*:-
1) गावातील शेतकऱ्यांनी 10 लाख रु प्रति गुंठा भाव असलेली 3 एकर जमीन शाळेला दान दिली. यात ग्रामपंचायतितील सत्ताधारी आणि विरोधक दोघांचाही वाटा.
2)गावच्या जत्रेसाठी आणावयाचा तमाशा बंद करून ,त्याचे सुपारीचे तिनलाख पंचवीस हजार रुपये शाळेला दिले.
3)गावातील क्रिकेट टीमने जिकलेली बक्षिसाची रक्कम शाळेला दिली.
4) गावातील जत्रा बंद करून ,जत्रातील जेवणावळीवर खर्च होणारी रक्कम प्रत्येकाने शाळेला दिली.(जत्रेच्या निमित्ताने प्रत्येक घरी पाहुण्यांच्या जेवणावळी व्हायच्या)
5) फक्त आर्थिक मदत नाही तर श्रमदान देखील केले.
6)गावच्या मंदिराचे " कलशारोहन " रद्द करून जमा झालेली सर्व रक्कम शाळेला दिली.
7) गणपती मंडळाने वायफळ खर्च न करता उरलेली सर्व रक्कम शाळेला दिली.
8) गावातील प्रत्येक मुल दिवाळीला फटाके न वाजवता फटाक्यांची रक्कम शाळेला देतात.
9) शाळेतील दोन अंगणवाडी ताईचे मानधन, काही स्वयंसेवकाचे मानधन गावकरी दर महिन्याला देत आहेत.हा खर्च महिन्याला 50 हजाराच्या आसपास आहे.
*पालकांचे श्रमदान* :-
1) शाळेच्या विकासासाठी पालक शाळेत येऊन आपल्याला जमेल ती शाळेची कामे करतात.
2) गावातील कारागीर आपली कौशल्ये शाळेत येऊन मुलांना शिकवतात.
3)काही पालक शाळेच्या वेळेव्यतिरिक्त वेळेत मुलांना अभ्यासात मदत करतात.
4) शाळेत साफसफाई, खोल्यांची देखभाल यासारख्या कामात रोज मदत करतातच.
5)शाळा बघण्यासाठी आलेल्या पाहुण्यांना शाळेविषयी माहिती पालकच देतात.(मुलाचा अन शिक्षकांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून)
*वाबळेवाडी ची अंगणवाडी* :-
अंगणवाडी म्हणजे मुलांच्या पुढील शिक्षणाची ची तयारी. वाबळेवाडीत अंगणवाडी पूर्णवेळ शाळेला जोडली आहे.अंगणवाडी दिवसभर चालते .अंगणवाडीत वयाच्या तिसऱ्या वर्षापासून मुले येतात. मुलांची शाळापूर्व तयारी करून घेतली जाते .अंगणवाडीवर गावकरी आणि शिक्षक यांचे विशेष लक्ष असते. अंगणवाडीत येणाऱ्या मुलांचा मुलांचे शालेय कौशल्ये विकसित केली जातात. या अंगणवाड्यांमध्ये गावकऱ्यांनी 2 मदतनीस मानधनावर कामाला घेतलेल्या आहेत .त्यांचा पगार गावकरी दर महिन्याला करतात.
*वाबळेवाडीतील मुलांचे शिक्षण विचार* :-
इयत्ता सहावी ,सातवी ,आठवी चे विद्यार्थी स्वयंप्रेरणेने अनेक अशक्य अशा प्रोजेक्टवर काम करत आहेत .सध्या ते कचरा वेचणाऱ्या मशीनवर काम करत आहेत .अशी मशीन त्यांना तयार करायची आहे, जी स्वतः कचरा वेचून कचराकुंडीत टाकेल.या सर्व गोष्टी ते कोणाच्याही मदतीशिवाय पूर्ण करत आहेत.
*समस्या वर स्वतः उपाय शोधणे, हा विचार मुलांच्या मनात कसा रुजला?*
याचे मूळ वाबळेवाडी 2012 मध्ये सापडले. 2012 ची वाबळेवाडी शाळा. वारे सर नव्यानेच बदलीने आले .
दोन शिक्षक , 32 विद्यार्थी ,2 वर्गखोल्या.
अशी होती वाबळेवाडीची शाळा.
दोन्ही शिक्षकाच्या अपार मेहनतीने शाळेत विद्यार्थी संख्या वाढत गेली.
एक वेळ अशी आली की 232 विद्यार्थी 7 वर्ग अन दोनच शिक्षक.
*मग मुलांचा अभ्यास पूर्ण कसा करायचा?*
येथे *"वारे विचार "* उदयाला आला.
1) सरांनी , मुलांना स्वतःचा अभ्यास स्वतः पूर्ण करायची सवय लावली.
2) अडचण आली तरच शिक्षकांना विचारायचं असं ठरलं .
3) विचारण्या अगोदर मुलाने अडचण सोडवण्यासाठी स्वतः संपूर्ण मार्ग हाताळावेत हेही ठरलं .
यातूनच मुलं स्वयंप्रेरणेने वेगाने शिकती झाली .
याच पद्धतीतून गेलेली आठवी नववी ची मुलं सांगतात की - त्यांना भविष्यात संशोधक शास्त्रज्ञ ,उद्योगी असे वेगवेगळे व्यवसाय/क्षेत्र निवडायचे आहेत.
मुलांचे स्पून फिडिंग कायमचे बंद केले. 'समस्या निराकरण ' व चिकित्सक विचार हे एकविसाव्या शतकातील महत्वाचे कौशल्य मुलात रुजवले.त्यासाठी--
1)समस्या समजून घेणे.
2)इतरांसोबत समस्येवर चर्चा करणे.
3)गटात तिची उकल शोधणे.
अशा सवयी लहानपणापासूनच वारे गुरुजी आणि खैरे गुरुजी यांनी मुलाला लावल्या.
सप्टेंबर शेवटपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण झाला की मग मुले इतर विषयांच्या विविध प्रोजेक्टवर काम करतात .
त्यात विज्ञान ,खेळ ,संगीत, यासारखे विषय असतात.
भाषेमध्ये विविध प्रकारची पुस्तके वाचणे, त्यावर चर्चा करणे(कथा,कादंबरी,कविता,ललित,लेख, प्रवासवर्णन,आत्मचरित्र,परीक्षणे)
विविध ठिकाणच्या स्पर्धेत भाग घेणे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणे .
यासारख्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करत असतांना वर्ष कधी सरते हे कळतही नाही.
*रमेश ठाकूर*
सह
*दादासाहेब नवपुते*
बीट गारखेडा ,औरंगाबाद.
0 Comments