➖➖➖➖➖➖➖➖➖
नाव - पुरंदर
उंची - १५०० मी.
प्रकार - गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी - सोपी
ठिकाण - पुणेजिल्हा,महाराष्ट्र,भारत
जवळचे गाव - सासवड
डोंगररांग - सह्याद्री
स्थापना - १३५०
पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगरसोण्डेवर वसलेले असले तरी ते दोन स्वतन्त्र किल्ले आहेत.
बिनी दरवाजा: पुरन्दर माचीवरील हा एकमेव दरवाजा. नारायणपूर गावातून किल्ल्यावर जाताना हा दरवाजा लागतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर पहारेकर्याच्या देवड्या आहेत. समोरच पुरन्दरचा खन्दकडा आपले लक्ष वेधून घेतो. आत शिरल्यावर दोन रस्ते लागतात, एक सरळ पुढे जातो तर दुसरा डावीकडे मागच्या बाजूस वळतो. आपण सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर उतारावर लष्कराच्या बराकी आणि काही बंगले दिसतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी एक मन्दिर दिसते. त्याचे नाव 'पुरन्दरेश्वर'.
पुरन्दरेश्वर मन्दिर: हे मन्दिर महादेवाचे आहे. मन्दिरात इन्द्राची सव्वा ते दीड फुटापर्यंतची मूर्ती आहे. हे साधारणपणे हेमाडपन्ती धाटणीचे असावे. थोरल्या बाजीरावाने या मन्दिराचा जीर्णोद्धार केला.
रामेश्वर मन्दिर: पुरन्दरेश्वर मन्दिराच्या मागील कोपर्यात पेशवे वंशाचे रामेश्वर मन्दिर आहे. हे पेशव्यांचे खाजगी मन्दिर होते. या मन्दिरापासून थोडे वरती गेल्यावर पेशव्या च्या दुमजली वाड्याचे अवशेष दिसतात. पेशवाईच्या आरम्भी बाळाजी विश्वनाथने तो वाडा बान्धला होता. या वाड्याच्या मागे विहीर आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते तर दुसरी खाली भैरवखिण्डीच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या दिशेने वर गेल्यावर १५ मिनिटातच माणूस दिल्ली दरवाजापाशी येतो.
दिल्ली दरवाजा: हा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाज्याच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे. आत गेल्यावर उजवीकडे आणखी एक दरवाजा दिसतो. डावीकडची वाट बालेकिल्ल्याच्या दुसर्या टोकापर्यन्त जाते. या वाटेने पुढे गेल्यावर काही पाण्याची टाकी लागतात.
खंदनकडा: दिल्ली दरवज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक कडा थेट पूर्वेकडे गेलेला दिसतो. हाच तो खन्दकडा. या कड्याच्या शेवटी एक बुरूज आहे. बुरूज पाहून आल्यावर परत दरवाज्यापाशी यावे. येथून एक वाट पुढे जाते. या वाटेतच आजूबाजूला पाण्याची काही टाकी लागतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक उंचवटा लागतो. त्याच्या मागे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत. येथेच अम्बरखान्याचे अवशेष दिसतात. थोडे वर चढून पाहिल्यास वाड्याचे अवशेष दिसतात. वाटेवर पुढे गेल्यावर काही पाण्याचे हौद लागतात. या वाटेवरून पुढे जाताना एक वाट डावीकडे खाली गेली आहे. या वाटेने गेल्यावर केदार दरवाजा लागतो.
पद्मावती तळे: मुरारबाजींच्या पुतळ्यापासून पुढे गेल्यावर पद्मावती तळे लागते.
शेंंद-या बुरूज: पद्मावती तळ्याच्या मागे बालेकिल्ल्याच्या वायव्येस, तटबन्दीच्या बरोबरीने एक बुरूज बान्धला आहे. त्याचे नाव शेन्दर्या बुरूज.
केदारेश्वर: केदार दरवाजा पाहून मूळ वाटेने १५ मिनिटे चालून गेल्यावर काही पायर्या लागतात. त्या आपल्याला थेट केदारेश्वर मन्दिरापर्यंत घेऊन जातात. पुरन्दरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्वर. मन्दिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. मन्दिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे. सभोवती दगडी फरसबन्दी आहे. केदारेश्वराचे मन्दिर म्हणजे किल्ल्यावरील अत्युच्च भाग. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर, रोहिडा, मल्हारगड, कर्हेपठार हा सर्व परिसर दिसतो. या केदार टेकडीच्या मागे एक बुरूज आहे त्याला कोकण्या बुरूज असे नाव आहे.
पुरंदरची माची: आल्या वाटेने माघारी फिरून दिल्ली दरवाज्यातून जाणार्या वाटेने थेट पुढे यावे म्हणजे आपण माचीवरील भैरवखिण्डीत जाऊन पोहोचतो. वाटेत वाड्याचे अनेक अवशेष दिसतात.
भैरवगड: याच खिण्डीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. खिण्डीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या खिण्डीपर्यन्त गाडी रस्ता आलेला असल्याने त्या रस्त्यावरून गेल्यावर वाटेतच उजवीकडे राजाळे तलाव लागतो. पुरन्दरमाचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते.
वीर मुरारबाजी: बिनी दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे गेल्यावर समोरच मुरारबाजीचा पुतळा दिसतो. इ.स. १९७० मध्ये हा पुतळा उभा केला आहे.
पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.
पुण्याहून: पुण्याहून ३० कि. मी. अन्तरावर असणार्या सासवड या गावी यावे लागते.
सासवडहून: सासवडहून सासवड - भोर किंवा सासवड नारायणपूर ही गाडी घेऊन नारायणपूर गावाच्या पुढे असणार्या 'पुरन्दर घाटमाथा' या थाम्ब्यावर उतरतात. हा घाटमाथा म्हणजे पुरन्दर किल्ला आणि समोर असणारा सूर्यपर्वत यामधील खिण्ड होय. या थाम्ब्यावर उतरल्यावर समोरच डोंगरावर एक दोन घरे दिसतात. या घरामागूनच एक पायवाट डावीकडे वर जाते. ही वाट पुढे गाडी रस्त्याला जाऊन मिळते. या वाटेने पाऊण तासात पुरन्दर माचीवरील बिनीदरवाजा गाठता येतो.
नारायणपूर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावातूनच गाडीरस्ता थेट किल्ल्यापर्यन्त गेलेला आहे. पुणे ते नारायणपूर अशी बस सेवा देखील आहे. नारायणपूर गावातून गडावर जाण्यास दोन मार्ग आहेत. एक म्हणजे गाडीरस्ता. या रस्त्याने चालतचालत गड गाठण्यास २ तास पुरतात. तर दुसरी म्हणजे जंगलातून जाणारी पायवाट. या पायवाटेने एका तासात माणूस पुरन्दर माचीवरच्या बिनी दरवाज्यापाशी पोहोचतो.
किल्ल्यावर मिलिटरीचे बंगले आहेत. यामध्ये राहण्याची सोय होऊ शकते. मात्र त्यासाठी तेथे असणार्या त्यांच्या अधिकार्यांची अनुमती घेणे आवश्यक आहे.येथे जाताना कोणतेही ओळखपत्र घेऊन जावे (आधार ,पॅन पत्र, मतदान ओळखपत्र इत्यादी)
जेवण्याची सोय स्वतः करावी लागते. पिण्याचे पाणी मात्र नेहमी सोबत ठेवावे कारण केदारेश्वर मन्दिरात पाण्याची सोय नाही .गडावर जेवण करण्यासाठी आपण केदारेश्वर मन्दीराच्या आवारात बसू शकतो .
हे ठिकाण गडावरील सर्वात उंच असल्यामुळे इथे वातावरण खूप छान आहे. एकत्रित स्नेहभोजन करण्यासाठी आपण याठिकाणी नक्की यायला हवे.
गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून १ तास लागतो.
🎯 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🎯

0 Comments