'ती' भाकरी....

_*'ती' भाकरी.....*_

 _लेखिका- स्मिता मिलिंद_

       टम्म फुगलेला, वाफाळता, गोल भाकरीचा चांदवा.... ताटात आल्यावर खायची इच्छा न होणारा भारतिय माणूस विरळाच... वरून खरपूस, कुरकुरीत आणि खाली मऊसुत... दोन स्वभाव वैशिष्ट्यांचे अचूक मिश्रण..
       पिठामधे पाणी घालून छान एकजीव करून, रगडून घ्यावे लागते. आयुष्याचेही असेच असते ना ...
       किती चांगले- वाईट अनुभव, व्यक्ती, घटना आपण आयुष्यात सामावून घेतो. त्यांच्या मिश्रणातून तर जीवन बनते. सर्वांमधे गुंतून पुढे चालत असतो. 
        पीठाच्या गोळ्याला आकार देत, थापत.... *परिस्थितीच्या थपडा खात* आयुष्य घडत जाते.... 
         तापलेल्या तव्याचा चटका बसतो आणि चर्रकन आवाज होतो.  मग पाणी लावून त्याला जरा शांतवायचे. भाकरी दोन्ही तळव्यावर अलगद तोलून तव्यावर टाकताना; कधी कळत नकळत चटका बसतो.  *वागताना तोल सांभाळत,  तारतम्य बाळगावेच लागते.* अन्यथा *अनुभव चटके देतोच*....
             जुने पिठ असेल तर , जुनी जखम उकलल्या सारखी, भाकरी चिरते. मग हळूवार हातांनी पाणी लावून *आई* हि फट, हि जखम इतकी अचूक सांधायची की बघणाऱ्याला हे लपवलेले दु:ख लक्षात देखिल यायचे नाही. *नेहमीच स्वतःची दु:खे, अशी हसण्याने लिंपून काढायची.* 
        जुने पिठ छान जुळून यायला एक उपाय म्हणजे, पिठ मळतानाच त्यात, तव्यात पाणी गरम करुन घालायचे. 'उतवणी' म्हणतात त्याला. *प्रत्येक समस्येवर उपाय शोधलेला.* त्या ऊबदार मायेने पिठाला कुरवाळले, मिसळले की भाकरी देखिल हसायला लागते. 
        जी बाजू आधी तव्यावर टाकलेली असते. ती आता आणखी पुढे बसणाऱ्या चटक्यासाठी सज्ज झालेली असते. मग तिला पलटायचे. *पुढे जायलाच हवे ना. आयुष्यात असे किती चटके सोसावे लागतात. म्हणून थांबून तर नाही रहाता येत ना .....*
        आता पाणी लावून शांतावलेली बाजू तव्यावर येते. ती अगदी व्यवस्थित भाजली तरी मऊच रहाते. 
*मन असते ना ते.... अनुभवाचे पोळणे, परिस्थितीच्या थपडा  कितीही पडू दे .... गाभा हळवा, मऊच रहातो.*
         आता तव्याचा आडोसा, आसरा दूर होतो. आणि भाकरीची दुसरी बाजू,  निखाऱ्याच्या प्रत्यक्ष धगीसाठी सामोरी जाते. तावून- सुलाखून तिला कडक व्हावेच लागते. 
     *सामोऱ्या येणाऱ्या संकटांना तोंड देत. हृदयातील हळवेपणाचे रक्षण करण्यासाठी; दणकटपणाचा, खंबीरपणाचा भाव तिला जागवावाच लागतो.* 
        *आगीने, परिस्थितीने शेकत- शेकत ती सशक्त होते आणि गाभ्याला जपत जाते.* 
      आगीची धग वाढली की तिला थोडे मागे सरकवावे लागते. अन्यथा करपण्याचा धोका असतो. *त्यावेळी मान- पानाचा बडेजाव न दाखवता,  दोन बोटे मागे हटणे,* पुढचे जीवन सुसह्य करते. योग्य वेळी घेतलेले अचूक निर्णय. अनुभवाचे शहाणपण.... हेच..
       हि ताजी- ताजी, गरमागरम भाकरी प्रसन्न हसत हसत सामोरी येते. आणि जिव्हालालित्य तृप्त करते. 
    पण हि शिळी झाली ना की, हिची  सांधणी गळून पडते. सुटीसुटी, एकेकटी होते. *मायेचे पाणी वेळोवेळी उडून गेलेले असते ना.... जे ते ज्याच्या त्याच्या विश्वात मग्न....*   आणि मग तिचे तुकडे पडायला सुरुवात होते. *अपरिहार्य.....* 
       पण तशातही... जर तिच्यावर मायेचे तेल- तूप माखून दिले तर, तेंव्हा देखिल ती स्वतःच्या सगळ्या कपारी, भेगा बुजवते. त्यावर लसणाच्या चटणीचे आवरण भरुन .... दुसऱ्याला आनंद देते. 
         हेच तर जीवनाला शिकवत असेल ती. आहे त्या स्थितीत आनंदी रहा. तोडले- मोडले सांधून घ्या. चटके बसले तर योग्य तिथे पाण्याने, शब्दांने शांतवा... प्रेमाचा गिलावा करा. प्रत्येक परिस्थितीला कणखरपणे, ताठपणे सामोरे जा. पण ....

     हे सर्व करताना अंत:करणातील ओलावा, माया आटू देऊ नका. स्वतःच्या वागण्याने इतरांना नेहमी आनंद देत रहा. 
        धग जास्त झाली की थोडी माघार घ्या. राग आपोआप शांत होतो. कटू बोलाने, आयुष्य कायमचे करपायचा, न भरता येणाऱ्या जखमा व्हायचा धोका असतो. *योग्य वेळी शांत बसणे* हा स्वतःचाच सन्मान आहे. आणि तसे वागायला हिंमत लागते.... 
      *थोडी माघार घ्यायचा, तापलेल्या डोक्यावर शांतपणाचा हात फिरवायचा* एक छोटासा प्रयोग करुन बघू.... *प्रत्येकानेच.....* 
आणि स्वतःच स्वतःला शाबासकी देऊ .. *पुढे उद्भवणारे वादळ शमवल्या बद्दल* .......

_*©️®️स्मिता मिलिंद🍁*_
(आवडल्यास शेअर करतांना लघुलेखात कुठलाही बदल न करता कृपया मुळ लेखिकेच्या नावासहच शेअर करा ही विनंती-मेघःशाम सोनवणे. 9325927222)
*श्री. किशोर दाते, नागपूर,* यांच्या सौजन्याने.  
_*C/P.*_

Post a Comment

0 Comments