कुत्रा

 

गाव बेवारस कुत्र्यांनी भरले असायचे. अोळखीच्या माणसावर ती कधी भुंकत नसायची. अनोळखी दिसला की गप्प बसत नसत. दुसर्‍या आळीचे कुत्रे आले की स्थानिकांना जोर यायचा. सर्व ताकतीने सारी कुत्री एकवटून त्याच्यावर भिडायची. ते माघारी फिरून त्याचा हद्दीत गेले की ते पलट वार करायचे या कुत्र्यांवर. पाळीव कुत्रा गावात चुकून एखादा असायचा. त्याचे चांगले लाड असायचे. त्यावेळेस लाड या व्याखेत पोटभरून आयते अन्न भुकेला मिळावे. बस्स एव्हढेच होते. गावातील या कुत्र्याचा इतर कुत्र्यांना हेवा वाटत जरी असला. तरी ते रास्त होते. इतर कुत्री बिचारी गावभर अन्नासाठी भटकत असायची. प्रत्येकाच्या दारात जाऊन बसायची. जेवतांना ताटातल्या अन्नाकडे एकटक बघत बसायची. आशाळभूत नजर कुत्र्याची जेवणार्‍याच्या ताटावर खिळायची. जबडा वासलेला असायचा, लालभडक जीभ बाहेर लोंबून त्यातून लाळ टपकायची. डोळे त्याचे सांगायचे की. .

 "दे रे मलाही घासभर. ." 

ताटातून तोंडात घास घेतांना कुत्र्याची मान खाली वर होत असायची. घरातल्या एखाद्या माणसाचे लक्ष गेले कुत्र्यावर की ती व्यक्ती जोरात अोरडायची. .

"हाऽऽड् . .साली या कुतारड्यांनी नकोनको केलाया. ." 

तेच जर लहान मुल जेवत असेल तर त्याच्यावर अोरडले जायचे. .

"जा घरात जेव, कुत्र्याची दिष्ट लागल. ."

आज्ञाधारक मुल ताट हातात घेऊन घरात जाऊन बसायचे. . पण गावात गाभण कुत्री बघितली की आनंद होत असे. त्यातले एक आपण पाळायचे असा मनोमन संकल्प करायचो आम्ही. हाच संकल्प गावातल्या इतर लहानग्यात दिसे. ज्याच्या घरी पाळीव कुत्रा असायचा. त्याला चांगले शिक्षण दिले असायचा. तो लहान मुलांच्या जोडीला खेळायचा.  घराचे रक्षण करायचा. मालकाने अाज्ञा दिली की दुसर्‍याला चावायला धावायचा. आणि हे सारे गुण लहान कुत्र्यालाच शिकवता येत होते. म्हणून प्रत्येकाला कुत्रा पाळायचा होता. पण मादी कुणाला नको होती. सर्वांना नर हवा होता. कुत्रीला जर एकच पिल्लू होत असते. तर कदाचित भ्रूणहत्या झाली असती. प्राणी पाळतांना मादी कुणाला नको होती. 

"मला भुरा पायजेय काळा नको. ."

हा दुसरा वादाचा विषय होता आम्हा मुलांत. कधी विषय मारामारीवर पण जायचा. जन्माला न आलेल्या पिल्लासाठी आमच्यात भांडण जुंपायचे. .

शाळेतपण गाभण कुत्रीच्या गप्पा रंगायच्या. आमच्यातला एखादा मित्र मध्येच गुरूजींना करंगळी वर करून दाखवायचा. मुळात त्याला काही लघवी आली नसायची. पण कुत्री नक्की कुठे बसली आहे. हे त्याला शोधायचे असायचे. त्याच्या मागून आमची सर्वांच्या करंगळ्या वर होत. तो पर्यंत आमचं सोंग आहे. हे गुरूजींच्या लक्षात आले असायचे. गुरूजी बोलायचे. .

"सगळ्या वर्गाला कशी एका वेळेस लागली. .आता सुट्टी होइलच. मग जा सगळे. ."

रोज शाळेतून घरी आल्यावर त्या कुत्रीला गावभर शोधायचो आम्ही. घरात जाऊन दप्तर तसेच दारात ठेऊन पळायचो. दप्तर घरात नेऊन व्यवस्थित ठेवायचे काम आजीचे असायचे. कुत्रीला शोधायला गावभर निघायचो. चाैफेर उकिरडा तपासून झाल्यावर. अडगळीचे ठिकाण शोधायचो. एकदा की कुत्री नजरेला पडली मग हायसे वाटायचे. संध्याकाळी घरात काही शिळंपाक उरला की त्या गाभण कुत्रीला शोधून खायला घालायचो. जसे काही तिचे आम्ही डोहाळे पुरवीत होतो. कधीकधी तिला जुने गोणपाट टाकून मी मागच्या गोठ्यात झोपायला जागा करून द्यायचो. या सगळ्यामागे कारण हेच होते की आपल्याला हवे तसे पिल्लू निवडून घेता येईल. म्हणजे थेट पिल्लू लगेच उचलून आणता येणार नाही. पण हक्क सांगायला आपण तयार असू. तिने पिल्लं घातली आणि नेमके त्याच वेळेस आपण गैरहजर असलो तर, गावातली इतर मुलं पिल्ल वाटून घेतील. मग आपल्याला निवडणीचे कसे तरी शिल्लक राहील. त्यात मग माद्याच राहतील. किंवा राहिलाच एखादा नर तर तो लेचापेचा असेल. चांगल गबरू पिल्लू मिळावे. याचसाठी ही सारी मेहनत असायची. सर्वांना कुत्राच हवा कुत्री नको होती. तो पण आवडत्या रंगाचा मजबूत असा. .

एक दिवस ती वेळ यायची. निसर्ग नियमानुसार कुत्री बाळंतीण होई. मागावर असणारी मुलं तिला शोधून काढायची. ती पिल्लांच्या रक्षणार्थ अडगळीची जागा निवडायची. गोठ्याची जागा अडगळीची असायची. नाहीतर लाकडं रचून ठेवलेल्या अोघ्याखाली. बंद डोळ्याची लहानलहान पिल्लं संपूर्ण शरीर हळवून चींचीं करायची. काही पांढर्‍या रंगाची, काही तांबूस, काळीभोर तर काही काळ्या रंगावर पांढरा पट्टा असलेली. पिल्लांची संख्या पाच ते दहा पर्यंत असायची. पण त्या दिवशी व्यालेली कुत्रीची चाैदा पिल्लं होती. संपूर्ण अंगातल्या शक्ती नुसार ती अंग हलवत होती. डोळे बंद होते. सात दिवसात डोळे उघडल्या शिवाय पिल्लू कुणाला घरी नेऊन त्यांचा मालक बनता येत नव्हते. मग रोज जाऊन लांबून कुत्रीच्या पिल्लांना बघायचे. लांबूनच रंगावरून त्यांची मालकी ठरवायची. 

"तो पांढरा दिसतोया, तो म्या घेईन. ."

लगेच दुसरा बोलायचा. ."व्हयं तिकडं, म्या अदुगर हेरलाय त्याले. ते मलेच पायजेल. ."

कधीकधी आपसात कुस्त्यांचा सामना रंगायचा. पण किती काही झाले तरी भांडण घर पर्यंत जाऊन द्यायचे नाही. घरच्या संमती शिवाय कुणाला पिल्लू घरी घेऊन जाता येत नव्हते. घरच्यांची संमती मिळेल असेही नव्हते. न सांगता पिल्लू घरी नेल्यावर फटके पडायचे. घरातून संमती गरजेची असायची. कुत्र्यांनी डोळे उघडले होते. आणि आता घरच्या संमतीची गरज होती. मी वातावरणाचा अंदाज घेतला. लहान असलो तरी समजायचे की आईबाबांचे आज भांडण नाही झाले आहे. दोघं गोडीत बोलत आहेत. .मी मग बाबांना सांगीतले. .

"चलाना बाबा आपल्यालाबी एक पिल्लू आणू."

चुलीत लाकडं सारतांना आई अोरडली जोरात मला. .

"कश्यापायी ?. .आपल्याच वखारी वंड गेल्यात त्याला काय घालशील ?. तसंबी राखायला काय आहे घरात. मातीची गाडगी नि मडकी. मडकी चोरली तर चोरू दे. एखाद्याच्या मड्यावर फोडायला नेतील. काय नको कुत्री नि चित्री. ."

आईच्या बोलण्याने माझी घोर निराशा झाली होती. आता आईने कुत्रा पाळायला विरोध केला म्हणजे कुणाच काही चालणार नव्हते. संसारचे रहाडगाडे हाकलणार्‍या त्या माऊलीचे ते बोल होते. फक्त पोटाला अन्न मिळवण्यासाठी संपूर्ण दिवस खर्च करावा लागायचा. आईबाबा दोघे कष्ट करायचे. आजी आणि आम्ही तिघं भावंड मिळून येव्हढ्या माणसांना त्यांना पोसायचे होते. माझे वाकडे तोंड बघून बाबांनी मला उचलून खांद्यावर घेतले. मला आनंद झाला. आईकडे दुर्लक्ष करून बाबा मला घेऊन निघाले. तरी आईने मागून आवाज दिला. .

"नाय तसले लाड नका करू पोरांचे. त्यांनले काय समजतय ?. ."

बाबांनी ऐकल्या न ऐकल्या सारखे केले. मला बाबांच्या खांद्यावर बसायला त्यावेळेस खूप आवडायचे. बहीण जोडीला असेल तर बाबा माझे बोट पकडायचे. आणि तिला खांद्यावर घ्यायचे. आणि तिघा भावंडांना एकत्र घेऊन निघाले. तर लहान भाऊ खांद्यावर बसायचा. मी बाबांचे बोट पकडायचो. बहीण माझे बोट पकडायची. आता पण लहान बहीण आणि भाऊ आमच्यामागे लागले. पण मी हट्ट केला. .

"म्या नाय जा. .खांद्यावरून उतरणार ?. ."

ती दोघं भावंड माघार घेण्याचे नाव घेत नव्हती. आईने येऊन दोघांच्या पाठीत एकएक टाकल्यावर त्यांनी भोकांड वासायला सुरवात केली. आईने दोघांना अोढत आत नेले. बाबा मागे फिरले. .

"कश्यापायी मारते पोरांना ?. ."

आई काही माघार घ्यायला तयार नव्हती. .

"जा तुम्ही निंघा. मोठे जहागिरी आणायला चाल्लेत ते ?. ."

आईच्या शब्दातून कुत्रा पाळण्यावर सक्त विरोध दिसत होता. आम्ही दोघे दुर्लक्ष करून निघालो. बाबांच्या खांद्यावर बसल्यामुळे मला उंचावर बसल्याचा आनंद झाला होता. रस्त्यात एखादा मित्र दिसलाच तर त्याला मी अोरडून सांगत होतो. .

"बाब्या !. आम्ही कुत्रा आणायले चाल्लो. ."

कुत्री ज्या ठिकाणी पिल्लांना घेऊन होती. त्या जागेवर आम्ही पोहचलो. पण कुत्री तेथे नव्हती. .

"बाबा !. .इथंच होती कुत्री नि पिल्ल. कुठे गेली असेल ?. ."

अनुभवी बाबांनी कुत्री कुठे आणि का गेली ?. .हे अोळखले होते. .

"आता पिल्लांनी डोळे उघडले आहेत. पिल्ल कुत्रीच्या मागे गेली असतील. ."

आमचा मोर्चा कुत्रीला शोधायला निघाला. अगोदर मित्रांच्या जोडीला ज्या कुत्रीला शोधायचो, त्या कुत्रीला आज बाबांच्या जोडीला शोधत होतो. शेवटी कुत्री आम्हाला दिसली. ती पुढे होती आणि पिल्लं मागे होती. कुत्री थांबली की पिल्ल थांबायची. कुत्री उकिरड्यावर तोंड खुपसून हुंगायची. तीच कृती पिल्ल करायची. कधी धावत कुत्रीच्या चाैफेर सडाला बिलगायची. कुत्रीच पोट भरलेलं असल्यास. किंवा तिला वाटले की आपल्याकडे आता पुष्कळ दुध जमा झाले आहे. मग कुत्री छाती वर करून झोपायची. पिल्ल जाऊन कुत्रीच्या सडाला झोंबायची. पिल्ल अंगावर दूध पितांना कुत्रीचा जबडा वासलेला असायचा. जीभ बाहेर काढून ती दीर्घ श्वास घ्यायची. तिच्या डोळ्यात एक आत्मिक समाधान झळकायचे. .

बाबांनी मला खाली उतरवले. पण कुत्री काही पिल्लांच्या जवळ येऊ देईना. बाबांनी बाजूला पडलेली काठी उगारून तिला लांबच उभी केली. मी धावत जाऊन पांढर्‍या रंगाचे गुबगुबीत एक पिल्लू उचलून आणले. पांढरा माझा आवडता रंग होता. आणि मी अगोदर बघून ठेवलेले ते पिल्लू होते. याच पिल्लासाठी माझे आणि बाब्याचे भांडण झाले होते. मघाशी बाब्याला आवाज दिल्यावर त्याने मला काही उत्तर दिले नव्हते. आज एव्हढं सांगून तो आमच्या जोडीला आला नव्हता. काहीतरी नक्कीच त्याचे बिनसले होते. .बाबांनी मी उचलले पिल्लू माझ्या हातातून घेतले. त्याचे पाय व पायाची नखे व्यवस्थित बघितली आणि खाली सोडून दिले. 'हे नंग दुसरं बघू.' मी दुसरे उचलले. बाबांनी पुन्हा तसेच केले. मी पिल्ल उचलत होतो. बाबा पाय नि नखे तपासून खाली ठेवत होते. चाैदा पैकी बारा पिल्ले राहिली होती. त्या सार्‍या पिल्लांना तपासून झाले. बाबांच्या पसंतीला एकही पिल्लू उतरले नाही. मी निराश झालो. बाबांनी हाताला पकडून मला फरफटत घरी आणले. .मी रडकुंडीला आलेल्या चेहर्‍याने गपगुमान त्यांच्या संगे घरी आलो. जेवायची वेळ झाली होती. मी कोपर्‍यात रुसून बसलो होतो. मला लहान बहीण आग्रह करत होती. मी मध्येच माझा राग तिच्यावर व्यक्त करत होतो. .

"जा गं तिकडं. .माझ्या वाट्याचंबी तूच जेव. ."

माझ्या रागावण्याचे कारण सर्वांना माहीत होते. बाबा समजूत काढण्यासाठी जवळ आले. .

"हे बघ बाळा !. .आपण परत कुत्री व्यायले की पिल्लू आणू हा तुला. ."

मी घुश्यातच बोललो. .

"एव्हढी बारा पिल्लं व्हती. त्यातला का नाय घेता आला ?. ."

बाबांचा प्रेमळ आणि समजूतीचा सूर कायम होता. .

"त्यातला एकबी कामाचा नव्हता. ."

मी डोळ्याला आलेले पाणी पुसले. रागाचा पारा पण काहीसा खाली आला होता. .

"म्हणजी कसं काय ?. .आणि तुम्ही पिल्लांच्या पायाले काय बघत व्हता. ."

बाबांनी जवळ येऊन माझा खांदा प्रेमात दाबला. माझ्या केसावरून हात फिरवत म्हणाले. .

"बाळा आपण गरीब मानसं. कुत्रा पाळयचं आपल्याले परवडणारे नाय. पण तुझ्या हट्टामुळं म्या पाळणार व्हतो. म्हणून मग चांगल्या गुणाचे पहायला नंग का ?. ."

"पर बाबा तुम्हाले कसं समजणार गुणाचं कुठलं त्ये. ती पिल्लं तर अजूक लई लहान हायती. ."माझा बालसुलभ प्रश्न होता. .

"ज्या कुत्र्याला वीस किवा जादा नखं असत्यात, ते कुत्रं ईनामदार आणि प्रामाणिक असतया. आता एव्हढी पिल्लं व्हती. पर त्यात सारी वीस नखांच्या खालची व्हती. पुढल्या खेपला आपुन नक्की कुत्र पाळू या. ." 

बाबांच्या उत्तराने माझे समाधान झाले. तरी मला वाटले होते. बाबांनी वेळ मारून नेली असणार. पुन्हा पुढच्या वेळेस कुत्री बाळंतीण झाली. आणि इतिहासाची पुनरावृत्ती झाली. कुत्र तेव्हाही बाबांना मनासारखे सापडले नाही. माझा शेतकरी बाप अजून प्रामाणिक कुत्रं शोधतोय. .

काळचक्र फिरले अन् जसे की नाटकाचा दुसरा प्रयोग व्हावा. तसे घडल्यासारखे वाटले. कलाकार बदलले होते. नाटक जवळजवळ तेच होते. दिग्दर्शनात कालानुरूप बदल झाला होता. कुत्री येथे तीच आणि तसीच होती. मुलांच्या भुमिकेत माझी मुलं होती. त्यांचे संवाद तेच होते. आईच्या भुमिकेत माझी पत्नी होती. आईने अर्थिक परिस्थिती समोर ठेऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. पत्नीने निवार्‍याच्या अपुर्‍या जागेची सबब ठेवली. 'कुत्र्याचे केस गळायला लागले की घाण होते.' हे स्वच्छतेचे कारण पुढे केले. .

अन् मी बापाच्या भुमिकेत आहेच. तसाच तटस्थ अनुवंशात. .

समाप्त. .

प्रभाकर पवार
मुरबाड जि.ठाणे

Post a Comment

0 Comments