॥ मोबदला ॥
“एका निवृत्त शिक्षिकेला संगणकाचे अगदी बेसिक धडे द्यायचे आहेत. तुला जमणार असेल तर कळव”.
१९९९ सालच्या मे महिन्यात माझ्या एका मित्राचा ‘पेजर’वर संदेश आला.
माझा व्यवसाय सुरू करून दोनेक वर्षं झाली होती. पैसे कमावणे आणि खरंतर त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, ‘माणसं मिळवणे’, हे एक प्रमुख उद्दिष्ट नेहमी डोळ्यांसमोर असायचं. आमच्या घरात धंद्याची पार्श्वभूमी नव्हती. घरच्या सर्वांना जमेल तसं पटवून आणि वेळ पडली तर भांडूनही मी संगणकासंबंधीची सेवा देण्याच्या धंद्याला सुरुवात केलेली होती. समोर येतील आणि करायला जमतील अशी सर्व कामं करताना मला जाम मजा यायची. त्या सगळ्या कामांमधलंच हे एक नवं काम नुकतं सुरू केलेलं होतं - गरजूंना घरी जाऊन संगणकाचा वापर करायला शिकवणे!
घरी आल्यावर त्या मित्राला फोन केला. त्याने बाईंचा दूरध्वनी क्रमांक दिला. फोन करण्याची वेळही सांगून ठेवली. त्या काळी आजच्यासारखे मोबाईल्स नव्हते, म्हणजे बाजारात तर आले होते पण त्याच्या वापराचे दर परवडणारे नव्हते. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी बाईंना फोन फिरवला. हो, म्हणजे त्या काळी त्या काळ्या लॅंडलाईन फोनवरचं चक्र फिरवूनच संपर्क साधला जायचा.
रिंग तर वाजून गेली पण फोन कुणी उचलला नाही. परत दहा मिनीटांनी प्रयत्न केला आणि या वेळी मात्र तो उचलला गेला. पलीकडून लगेचच, मी कसं त्यांना दहा मिनीटं फोनजवळ बसवून ठेवलं, अशी तक्रार करून झाली. मी इकडे आवंढा गिळून गप्प बसलो. हे प्रकरण एकूणच वेगळं वाटत होतं. माझी, माझ्या शिक्षणाची व्यवस्थित चवकशी करून मग त्यांनी त्यांची गरज सांगितली. मी ती पूर्ण करू शकेन की नाही याची खातरजमा करून घेतल्यावरच त्यांनी त्यांचा पत्ता दिला. मी तो बरोबर लिहून घेतलाय की नाही हे देखील बाईंनी तोंडी परिक्षा घेऊन, तपासून पाहिलं.
सायंकाळी पाच वाजता त्यांच्याकडे पोचायचं होतं. मी त्या फोनवरच्या संभाषणाचाच इतका धसका घेतला होता की विचारू नका! दिलेल्या वेळेच्या बऱ्याच आधी मी तिथे पोचलो. पुणे कॅम्प परिसरात पदमजी पोलीस चौकीच्या जवळ बाईंचं भलं थोरलं कौलारू घर होतं. घरासमोर मोठं अंगण होतं. अंगणभर पसरलेलं हिरवंकंच गवत छान कापणी करून राखलेलं होतं. भर उन्हाळ्यात तो हिरवा रंग डोळ्यांना गारवा देऊन जात होता. अंगणातल्या सर्व झाडाझुडपांची चांगली निगा ठेवलेली दिसत होती. त्यातला गुलाबांचा ताटवा लक्षवेधक होता. प्रत्येक झाडाभोवती छान आळी केलेली होती. रंगवलेल्या वीटा नीट दुतर्फा लावून घराच्या पायऱ्यांपर्यंत जाणारी एक स्वच्छ रेखीव पायवाटही होती.
माझी बजाज स्कूटर बाहेर रस्त्याच्या कडेला लावून घराच्या अंगणात गेलो आणि जागच्या जागी थबकलो. घरातून पियानोचे स्वर ऐकू येत होते. या वाद्याचा आवाज मला तसाही एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातो आणि कानावर पडणारी ही धून तर माझ्या चांगलीच ओळखीची होती. ‘साऊंड ऑफ म्यूझिक’मधली ‘फेव्हरिट थिंग्ज’! मी चकित झालो. तेवढ्यात आतून कुणी तरी कुणावर ओरडल्यासारखा एक तारस्वर ऐकू आला आणि त्या पियानोचा तो आवाज खट्कन थांबला. मी घाईघाईने पुढे झालो, दारावरची घंटा वाजवली.
एका सुंदर पारशी मुलीने दार उघडलं आणि “केम..?” अशी पृच्छा केली. मला ते “कम्” वाटलं. मी आपला सरळ पाय दाराच्या आत ठेवला तर ती घाबरून मागे झाली. गर्रकन् वळून घाईघाईने त्या दिवाणखान्याच्या कोपऱ्यातल्या मोठ्या पियानोपाशी ताठ बसलेल्या आजींकडे जाऊन तिने घरात कुणी आंगतुक घुसल्याची वर्दी दिली. आजींनी तिथूनच गरागरा डोळे फिरवत, “गेट् आऊट..” करून मला परत दाराबाहेर हाकललं. मला माझं काय चुकलं हे कळायच्या आधीच तो दरवाजा आपोआप बंद झाला.
मोठी बिकट परिस्थिती! मला काय करावं तेच कळेना. परत घंटी वाजवावी की नाही अशा विचारात असतानाच तब्बल अर्ध्या मिनीटानंतर त्या आजींनी स्वतः दरवाजा किलकिला केला. या वेळी दरवाज्याची चेन लावलेली होती. मी इथे एका ‘टीचर’ना संगणक शिकवायला आलोय असं त्यांना सांगितलं. अतिशय गंभीर चेहऱ्याने त्यांनी माझ्यावरून नजर फिरवली अन् दार उघडून मला आत बोलावलं. एका खुर्चीकडे बोट करून तिथे बसायचं सुचवलं. मी जरा तिथे टेकतोय तोपर्यंत त्या पारशी मुलीने हळूवारपणे परत पियानोवर बोटं फिरवायला सुरुवात केली..
“दिज आर अ फ्यू ऑफ माय फेव्हरिट थिंग्ज”..
इकडे मला त्या खुर्चीत बसून घाम फुटला होता!
रिकामं बसणं झालं की सर्वसाधारणपणे सगळेजण जे करतात तेच मीही केलं. दिवाणखान्यातल्या जाजमापासून ते छताला लावलेल्या झुंबरांच्या हंड्यांपर्यंत सगळी नोंद घेऊन झाली. भिंतीवरचं मदर मेरी आणि बालख्रिस्ताचं सुरेख तैलचित्र, तिथलं जुनं काळपट शिसवी फर्निचर, खिडकीतून आत आलेल्या मावळतीच्या उन्हात छान दिसत होतं. सर्व वातावरण भरून उरलेले ते पियानोचे स्वर ऐकताना नकळत ते सूर वाजवणारी ती लांबसडक बोटं, त्या मुलीचा बॉबकट, लेस लावलेला फ्रॉकमधून दिसणारा तिचा पाठमोरा नाजूकसर बांधा बघत बघत माझी नजर नेमकी त्या आजीबाईंवर गेली आणि मी चपापलो. कदाचित इतका सर्व वेळ त्या माझ्याकडेच बघत होत्या की काय, असं वाटून वरमलो.
थोड्या वेळाने त्यांनी त्या मुलीला थांबायला सांगितलं. ती मुलगी पटकन उठली आणि त्यांचा निरोप घेतल्यासारखं करून दाराच्या दिशेने जाताना, “थॅंक्यू टीचर” असं म्हणाली. अरे देवा! या टीचर आजीबाई म्हणजेच माझ्या शिष्या होणार होत्या की काय! त्या तिथूनच माझ्याकडे बघून किंचितशा हसल्या. मला बसायला सांगून आतमध्ये गेल्या. त्यांच्या त्या हास्याने मी जरा स्थिरावलो. मनात, आत कुठेतरी बरं वाटून गेलं. आत्तापर्यंत आलेले वेगवेगळे तणाव क्षणात निमाले. काय ताकद असते नाही, साध्याशा स्मितहास्यातही!!
पाचेक मिनीटांत एक ट्रे घेऊन त्या सावकाश बाहेर आल्या. ट्रेमध्ये दोन रिकामे कप्स, मारी बिस्किटं आणि एक टीकोझी ठेवलेली होती. तो नक्षीदार ट्रे समोर ठेवून त्या माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसल्या. “शुगर?” असं विचारून माझ्यासाठी चहा तयार करू लागल्या. मी चहा घेत नसलो तरी काही न बोलता त्यांनी समोर केलेला कप पकडून सावरून बसलो. अतिशय सुंदर सुवासाचा हलका तपकीरी चहा दिसायला तरी मस्त दिसत होता. पहिला घोट घेतला आणि तो चवीतही तितकाच सरस असल्याचं जाणवलं.. अगदी दररोज चहा न पिताही!
त्यांनी स्वतःबद्दल सांगायला सुरुवात केली. आजी मूळच्या गोव्याच्या होत्या. कॅथलिक ख्रिश्चन. जुन्या वळणाच्या गोव्यातल्या खेड्यातून लग्न होऊन त्या इथे पुण्याला आल्या. त्यांचे सासरे ब्रिटिशांच्या पदरी कामाला होते. त्यांच्या नवऱ्याबद्दल त्या फारसं काही बोलल्या नाहीत. आता परदेशी स्थायिक झालेली त्यांची मुलं-बाळं वगैरेंची माहिती देऊन त्या थेट शाळेबद्दल बोलायला लागल्या. पुणे कॅम्पमधल्या एका प्रख्यात शाळेत त्या मुलांना संगीत शिकवीत होत्या. तिथून त्या निवृत्त झालेल्यालाही वीसेक वर्षं होऊन गेली होती. आजही जवळपासच्या मुलामुलींना त्या पाश्चात्य संगीत शिकवत होत्या. नुसता पियानो शिकायलाच त्यांच्याकडे सहाजणं येत होते. हे सगळं करणाऱ्या या बाईंचं आत्ताचं वय ‘फक्त’ ब्याऐंशी वर्षं होतं!
परदेशी राहणाऱ्या मुला-नातवंडांशी सहजगत्या संपर्क करता यावा म्हणून त्यांना कॉम्पूटर शिकायची इच्छा होती. अरोरा टॉवर्स समोरच्या ‘ॲपटेक’मध्ये त्यांनी नाव नोंदवलं होतं पण तिथली संगणक शिकवण्याची गती त्यांना झेपत नव्हती. त्या वर्गामधली ही सर्वात वयस्कर विद्यार्थिनी आणि तिच्या शंकासमाधानासाठी तिथे कुणाकडे वेळ नव्हता. ते लोक उडवाउडवी करायचे जे यांना आवडत नव्हतं. पाच-सहा वेळा तिकडचे वर्ग करूनही कॉम्पूटर सुरू करून, ‘विंडोज-९८’मध्ये लॉग-इन करण्यापलीकडे प्रगती झालेली नव्हती. थरथरणाऱ्या हातामुळे ‘माऊस’वर हात ‘बसत’ नव्हता. एकूणच प्राथमिक समस्या बऱ्याच दिसत होत्या.
“मला कॉम्पूटर खरंच नीट वापरता येईल का?” या प्रश्र्नाचं होकारार्थी उत्तर मी त्यांना दिलं आणि त्या मला त्यांच्या निजायच्या खोलीत घेऊन गेल्या. खिडकीलगतच्या विशाल मेजावर एक कॉम्पॅक कंपनीचा अद्ययावत संगणक विराजमान झालेला होता. माझा अगदीच आ वासला गेला नाही पण तरीही मला वाटलेलं आश्चर्य त्यांनी सहज ओळखलं. त्यांच्या मोठ्या मुलाने मागच्या ख्रिसमसची भेट म्हणून त्यांना तो दिला होता. पेन्टियम-२ प्रोसेसर आणि अधिकृत विंडोज-९८ची कॉपी असलेला, इंटरनेटसकट सर्व सेटअप् तयार असलेला परदेशी संगणक, मी प्रथमच पाहात होतो.
“फर्स्ट आय विल शो यू द थिंग्ज आय हॅव लर्न्ड सो फार.. ॲन्ड प्लीज टेल मी, व्हॉट शुड आय कॉल यू? सर ऑर सिद्धार्थ”?
डोंबल..!! ‘काहीही हाक मारा हो.. नावात काय असतं’ वगैरे नेहमीचे पाचकळ विनोद करण्यात अर्थ नव्हता. आजीबाई चांगल्या कडक शिस्तीच्या वाटत होत्या आणि त्यात परत त्या माजी शिक्षिका! मी गप्पच बसलो. तिकडे संगणक सुरू करण्याची त्यांची झटापट सुरू झाली. त्यांनी पहिला स्टॅबिलायझर सुरू केला. त्याचे चित्रविचित्र आवाज थांबेपर्यंत त्यांनी वाट बघितली. मग त्यांनी थरथरत्या बोटाने संगणकाचं बटण दाबलं. ‘डॉस’चा स्क्रीन जाऊन ‘विंडोज’चा पडदा समोर आला आणि त्यांनी विजयी मुद्रेने माझ्याकडे बघितलं. मी सुद्धा कौतुकाचा ‘वाह् वा’ असा भाव दाखवला. आजी खूष झाल्या पण नंतर ‘युजर लॉग-इन’वर अडखळल्या. की-बोर्डवरच्या कीज् शोधून-सवरून त्यांनी ते एकदाचं इनपुट केलं आणि विंडोज डेस्कटॉप समोर आला.
“नाऊ टेल मी, व्हॉट शुड आय डू नेक्स्ट?”
...
“इट डिपेन्ड्स ऑन व्हॉट यू वॉन्ट टू डू.. राईट”?
मी चेंडू उलट टोलवला. त्यांना त्यावर उत्तर सुचेना. मग मी त्यांना समजेल अशा भाषेत सर्व ॲप्लिकेशन्सची जुजबी माहिती दिली. वर्ड प्रोसेसर कसा वापरायचा ते दाखवलं. पत्र अर्थात् इ-मेल, वर्ड ॲप्लिकेशनमध्ये पहिल्यांदा लिहून कशी ठेवता येते, मग ती साठवून कशी ठेवता येते, परत उघडून माऊसच्या सहाय्याने ‘कॉपी’ करून दुसरीकडे कुठेही ‘पेस्ट’ कशी करता येते ते दाखवलं.
“टीं टीं टीं टिडीक्.. टिक् टिक्.. टिर्र ऽऽ इं इं..”
असा कर्कश खंग्री आवाज करणारं फोनलाईनशी जोडलेलं मोडेम कसं ‘डायल’ करायचं तेही दाखवलं. बाईंना ‘हॉटमेल’चा नवा अकाऊंट उघडून दिला. डब्लू डब्लू वगैरे टायपून हॉटमेल कसं उघडायचं ते दाखवलं. त्या खूष झाल्या. लगेच स्वतःची छोटी डायरी काढून त्यांनी मुलाचा, दोन मुलींचा इ-मेल पत्ता मला दाखवला. मग तो कसा अन् कुठे टाकायचा, मेसेज कुठे लिहायचा, ते सगळं त्यांना सांगितलं.
सुमारे दहा मिनीटं खपून त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला तीन ओळींचा इ-मेल लिहिला. तो ‘सेन्ड’ करून झाल्यावर त्यांनी जग कवेत आल्यासारखा अविर्भाव करून दाखवला. आम्ही दोघेही वेगवेगळ्या कारणांनी आनंदलो. त्यांना त्यांचं साध्य गवसलं होतं आणि मी फारसा प्रयास न करता त्यांना तिथपर्यंत घेऊन जाऊ शकलो होतो. त्यांचं “ब्लेस यू” वगैरे करून झाल्यावर मी त्यांचा निरोप घेतला. आता दोन दिवसांनी भेटायचं होतं.
पुढच्या महिन्याभरात सुमारे बारा ते तेरा वेळा मी त्यांच्याकडे गेलो असेन! त्यांची शिकण्यातली प्रगती केवळ थक्क करणारी होती. त्या ‘एम.एस.ऑफिस ९७’चं वर्ड शिकल्या. एक्सेल वापरून त्यांचे रोजचे जमाखर्च लिहायला लागल्या. पॉवरपॉईंट त्यांच्या फारसं उपयोगाचं नसतानाही, माझं डोकं खाऊन, त्यांनी ते देखील शिकून घेतलं. परदेशातून येणाऱ्या इ-मेल्स त्या सराईतपणे हाताळू लागल्या. इ-मेल्सवर नातवंडांसोबत त्या आता रोज संपर्कात राहात होत्या. त्यांच्या सर्व शंकांना मी समर्पक उत्तरं द्यायचो. निव्वळ आत्मविश्वासाच्या आणि मिळवलेल्या ज्ञानाच्या जोरावर आजीबाईंनी मला न सांगता ॲपटेकची परिक्षाही दिली आणि त्यात त्या चक्क प्रथम श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाल्या. वर तिथल्या स्टाफला माझं गुणगान सांगून आल्या. त्या लोकांनी माझ्याकडून ‘कसं शिकवावं’ हे शिकणं कसं गरजेचं आहे हेही वर सांगून आल्या.
हे सगळं झालं, विद्यार्थिनी संगणकात पारंगतही झाली, आल्यागेल्याकडून स्वतःची आणि माझी कौतुकंही करून घेतली गेली पण आजी काही केल्या माझ्या शिकवणीच्या मोबदल्याबद्दल बोलायला तयार नव्हत्या. किंबहुना त्यांनी ते कधी साधं विचारलंही नाही. ‘ब्याऐंशी वर्षांच्या आजीबाईंना काय पैसे मागायचे’, असं वाटून मी पण त्यांना कधी काही बोललो नाही. संगणकासारखं आधुनिक विज्ञान शिकण्याची, त्याचा रोज उपयोग करून घेण्याची त्यांची विजिगीषु वृत्ती मलाही खूप भावली होती. त्यांचं उदाहरण मी माझ्या काही ग्राहकांना आवर्जून सांगायला सुरुवात केली होती. ती कथा ऐकून माझ्याकडून संगणक तयार करून घेणाऱ्यांची, त्याचं ट्रेनिंग घेणाऱ्यांची संख्या चांगली वाढलेली होती. मी त्याच्यातच बऱ्यापैकी समाधानी होतो.
डिसेंबर महिन्याच्या मध्यावर त्यांनी मला फोन केला. मला वाटलं, आता या ‘वाय टू के’ समस्येबद्दल विचारणार! पण नाही, तसं काही नव्हतं. त्यांचे परदेशातले नातेवाईक ख्रिसमसच्या सुट्टीसाठी आले होते. त्या सगळ्यांनी मला भेटण्याची इच्छा दाखवली होती. मी प्रथमतः थोडे आढेवेढे घेतले पण आजी ऐकायला तयार नव्हत्या. ‘उद्या संध्याकाळी येतो’ असं सांगून मी फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी जरा उशीरानेच त्यांच्याकडे जाणं झालं. अंगण अजूनही तसंच नीटनेटकं होतं. झाडांवरचे टप्पोरे गुलाब मस्त फुललेले होते. दाराच्या डाव्या बाजूचं ख्रिसमस ट्री छान सजवलेलं दिसत होतं. त्यावरच्या दिव्यांच्या माळेआड लपलेलं घंटीचं बटन मी दाबलं. उगाचच, पहिल्या दिवशी तिथे दिसलेली आणि नंतर परत कधीही न दिसलेली ती देखणी पारशी कन्यका आठवून मला हसू फुटलं.
मी स्वतःशीच हसत असताना दार उघडलं गेलं. दारातल्या त्या अवाढव्य माणसाने माझ्याकडे बघून प्रश्र्नार्थक चेहरा केला. माझी ओळख दिल्यावर त्यांनी मला घट्ट मिठी मारली. हाताला धरून मला आत नेलं. “गाईज, ममाज् टीचर इज हियर...” असं जोरात ओरडलेच ते! घराच्या प्रत्येक दारातून लोक बाहेर आले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य विलसत होतं. सगळ्यांनी माझ्याशी हस्तांदोलनं केली. माझी ओळख करून घेतली. हे सगळं कौतुक सुरू असताना माझी प्रगल्भ विद्यार्थिनी एका आरामखुर्चीवर बसून माझ्याकडे बघत मंद हसत होती.
मी हात जोडून त्यांना नमस्कार केला. त्यांनी चॉकलेट्सची एक छोटी पिशवी आणि एक चपटा पण वजनदार खोका माझ्या हातात दिला. मला ‘ब्लेस्’ करून नाताळच्या शुभेच्छा दिल्या. गिफ्ट रॅप केलेला तो खोका मी आत्ताच उघडावा असा त्यांच्या धाकट्या मुलीने आग्रह केला. आजींची पाचही नातवंडं माझ्याभोवती उत्सुकतेने उभी राहिली. मी अगदी सावकाश, घाई न करता खोक्यावरचं ते सोनेरी वेष्टन काढलं आणि मला काय बोलावं सुचेनासं झालं. डोळे नकळत पाणावले. हात कापायला लागले...
माझ्या हातात नवा कोरा कॉम्पॅकचा लॅपटॉप होता!
© सिद्धार्थ अकोलकर
२५.१२.२०२०
0 Comments