✹ २७ जुलै ✹ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम स्मृतिदिन


जन्म - १५ ऑक्टोबर १९३१
स्मृती - २७ जुलै २०१५

भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम. ते जनतेचे राष्ट्रपती होते. मुलांबद्दल त्यांना विशेष प्रेम होते आणि देशातील युवकांना प्रेरित करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. शास्त्रज्ञ, प्रशासक, शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक म्हणून त्यांनी या दोन गोष्टींसाठी त्यांनी आपले जीवन वेचले. २००२ ते २००७ या काळात राष्ट्रपतीपदाची धुरा अत्यंत यशस्वीरीत्या संभाळून डॉ.कलाम यांनी त्या पदावर आपल्या चमकदार कामगिरीची मोहर उमटविली. साधी राहणी आणि ऋजू स्वभावामुळे ‘जनतेचे राष्ट्रपती’ म्हणून ते लोकप्रिय ठरले. त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या आणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बीएस्‌सी झाल्या नंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

अब्दुल कलाम यांनी आपल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर विज्ञानाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात डाव्यांचा अपवाद वगळता, डॉ.कलाम यांची राष्ट्रपतिपदासाठी एकमताने शिफारस करण्यात आली होती. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉरलॉजी मधून हवाई अभियांत्रिकी शाखेचे अभियंता असलेले डॉ.कलाम भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक ठरले. वाजपेयी यांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आणि त्यांच्याच कारकिर्दीत १९९८ मध्ये पोखरणची अणुचाचणी झाली. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ.कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ.कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.

राष्ट्रपति पदावर विराजमान झाल्यावर डॉ.कलाम यांनी मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे काम केले. मोठी स्वप्ने पाहा आणि त्यासाठी भरपूर कष्ट करा, असे ते सांगत. ते उत्तम वीणावादक होते. डॉ.कलाम यांना कर्नाटक संगीतात रुची होती. ‘विंग्ज ऑफ फायर’, ‘इंडिया २०२०’ आणि ‘इग्निटेड माइंड्‌स’ ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. राष्ट्रपति पदावरून निवृत्त झाल्यावर डॉ.कलाम विविध संस्था मध्ये व्याख्याने देत असत.

Post a Comment

0 Comments