रायगड जर राजगृह तर लिंगाणा हे कारागृह. इथला बेलाग सुळका आणि निसरडी माती या गोष्टी त्यासाठी अतिशय अनुकूल आहेत.
या अशा अवघड दुर्गावर स्वराज्याच्या शत्रूंना कैदेत ठेवत असत. वर अतिअवघड असा वाट नसलेला सुळका आणि खाली घसरड्या वाटा, त्यामुळे येथे कैद्यांना ठेवल्यावर त्यांच्या मनावर या अवघड स्थितीचा परिणाम होऊन कैदी अगदी खचून जात असत. पळून जाण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नसे. जर कोणी कैद्याने पळण्याचा प्रयत्न केला तर त्याला जीव गमवावाच लागे. गडावरचे दोर आणि शिडा काढून घेतल्या की गडावरून पळण्याच्या वाटा बंद.
मोऱ्यांचा पराभव केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाजवळ हा किल्ला बांधला. इथल्या गुहेत, जे जुने कारागृह होते, त्यात एका वेळेस ५० कैदी ठेवत. १६६५ सालच्या पुरंदर तहामध्ये रायगड आणि त्या परिसरातले किल्ले लिंगाणा व बाणकोट महाराजांकडेच राहिले. लिंगाण्याच्या गिर्दनवाहीचे जननी व सोमजाई हे देव होते. त्यांच्या नवरात्राच्या उत्सवाची रायगडाच्या जमाखर्चातून तरतूद होत असे. या देवतांना बकरे बळी देण्याची प्रथा होती. लिंगाणा किल्ला रायगडचा पूरक होता. त्याच्या डागडुजीचे काम रायगडाबरोबरच चालत असे. १७८६ सालापर्यंत त्यावरील वास्तूंची देखभाल केली जात असे असा उल्लेख आढळतो. त्यामध्ये गडावरील सदर, बुरूज, दरवाजे आणि धान्यकोठार यांचा समावेश असे. तेथे पर्जन्यकाळात एक मनुष्य गस्त घाली.रायगड नंतर लिंगाणा पडला. रायगडाच्या खोऱ्यात थोडी विश्रांती घेऊन इंग्रजांचे विजयी सैन्य २३ मे रोजी पाली पलीकडील मार्गास लागले.





0 Comments